ज्या घरी मूल दत्तक जातं तिथले संस्कारच आपोआप त्याच्यावर होतात तसं आपण देहाच्या पोटी जन्माला येऊन ‘देवा’ला दत्तक गेलो तर या संकुचित मनावर व्यापकत्वाचे संस्कार आपोआप होतील, असं हृदयेंद्र म्हणाला, तरी ज्ञानेंद्रचं पूर्ण समाधान झालेलं नाही, हे त्याला जाणवल्याशिवाय राहीलं नाही. त्याचं लक्ष अभ्यासिकेतील काचेच्या कपाटाकडे गेलं. ज्ञानेंद्रनं पुस्तकं अगदी नीटपणे लावली होती. तोवर सखारामही कॉफीचे मग घ्यायला आला आणि जेवायची तयारी कधी करायची, याबाबत ज्ञानेंद्रशी बोलू लागला. कर्मेद्रलाही बहुधा ख्यातीचा दूरध्वनी आल्यानं तो समुद्रदर्शन घडविणाऱ्या प्रशस्त व्हरांडय़ात गेला होता. हृदयेंद्र हळूच कपाटाशी गेला आणि त्यानं एक पुस्तक काढून चाळायला सुरुवात केली. तोवर सखारामही खाली गेला. कर्मेद्रही परतला आणि हृदूच्या हातातल्या पुस्तकाकडे ज्ञानेंद्र आणि योगेंद्र कुतूहलानं पाहात असतानाच हृदयेंद्रनं एक पान न्याहाळलं. मग खुर्चीत बसत आपल्या मित्रांकडे नजर टाकत तो म्हणाला..
हृदयेंद्र – ‘देव’ कोण आहे, ‘देव’ आहे की नाही, ‘देवा’चा अनुभव नसताना त्याला मानावंच का, हे प्रश्न ज्ञान्या तुझ्या मनात उद्भवले ना? मला हे पुस्तक चाळताना दुसरीच बाजू लक्षात आली..
योगेंद्र – कोणतं पुस्तक आहे?
हृदयेंद्र – श्रीनिसर्गदत्त महाराजांचं..
ज्ञानेंद्र – ओहो.. श्रीनिसर्गदत्त महाराजांचा साधकांशी सुखसंवाद! पूर्वी चार भागांत ही संवादांची पुस्तकं होती, त्याचं हे एकत्रीकरण आहे.. इंग्रजीत ‘आय अ‍ॅम दॅट’ या नावे हे पुस्तक जगद्विख्यात झालं आहे.. जगातल्या बहुतेक सर्वच भाषांत ते भाषांतरित झालं आहे..
कर्मेद्र – प्रस्तावना पुरे.. मुद्दय़ाचं बोला..
हृदयेंद्र – हे पुस्तक वाचताना मला जाणवलं, ‘देव’ आहे की नाही किंवा तो कसा आहे, हा मुद्दाच दूर, आपण आपल्याला तर मानतो ना? आपल्या अस्तित्वावर तर आपला अनुभवसिद्ध विश्वास आहे ना?
कर्मेद्र – मीही तर तेच म्हणतो, जे नाही त्याच्या मागे कशाला लागता? हे आयुष्य मिळालाय ते संपेपर्यंत संपूर्णपणे भोगा.. स्वत:पुरता विचार करून स्वत:ला सुखी केलंत तरी खूप झालं..
हृदयेंद्र – कर्मू तू अत्यंत प्रामाणिक आहेस म्हणून मनात आहेस ते बोलून टाकलंस. कित्येकदा माणसं साधना करतात पण मनात खरा हेतू हाच असतो की आपण निर्धोक सुखी व्हावं! मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की आपला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, आपण आहोत, यावरही आपला पूर्ण विश्वास आहे, पण आपण नेमके कोण आहोत, हे आपण जाणतो का?
कर्मेद्र – ते जाणायची काय गरज आहे? आपण आहोत, हेच पुरेसं नाही का? जाणून काय फरक पडणार आहे?
हृदयेंद्र – बराच फरक पडेल.. निसर्गदत्त महाराजांना एका साधकानं विचारलंय पाहा की, मी नेमका काय आहे? महाराज सांगतात, ‘‘तुम्ही काय नाही, हे जाणणं पुरेसं आहे. तुम्ही काय आहात, हे जाणण्याची तुम्हाला गरज आहे. कारण बुद्धी आणि पूर्वधारणा यांच्या आधारे जे जाणलेले आहे, त्याचे वर्णन म्हणजे ज्ञान, असा समज जोपर्यंत आहे, तोपर्यंत स्वरूपज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.’’ पुढे महाराज म्हणतात, ‘‘ तुम्ही वस्तुत: जे काय आहात, त्याचे वर्णन संज्ञांनी करायचेच असेल तर त्या सर्व संज्ञा अभावसूचक असतील. ‘मी हे नाही, मी ते नाही’, असेच तुम्ही म्हणू शकता. ‘मी असा आहे,’ असं तुम्ही यथार्थपणे म्हणू शकत नाही.. जे पहाता येते किंवा ज्याची कल्पना करता येते, असं काहीच तुम्ही नाही. तरीही तुमच्याशिवाय पहाणे किंवा कल्पना करणे संभवत नाही. हृदयाची भावना, मनाचा विकार, देहाची हालचाल तुम्ही पहाता, पण ही पहाण्याची क्रिया स्पष्टपणे दर्शविते की जे तुम्ही पहाता ते तुम्ही नाही..’’ हे वाचून मनात आलं की खरंच आपण स्वत:ला तरी खरं कुठे जाणतो? ‘मी’चं खरं स्वरूप आपण जाणत नाही, ज्या देहाला आपण आपलं रूप मानतो तो देह तर नष्ट होणार आहेच, पण जे जीवन आपण आपलं म्हणून जगत आहोत, त्यातल्या सुख-दु:खात रुतलो आहोत, ते जगणं, ती सुख-दु:खं तरी बरोबर येणार आहेत का? तरी जणू आपण आपल्याला मृत्यू नाहीच, अशा भावनेनं वावरतो. जे नष्ट होणार आहे, ते कायमचं मानून जगत असतो. म्हणजे जे भ्रामक आहे, फसवं आहे, त्याचंच चिंतन हृदयात सदोदित नसतं का?
चैतन्य प्रेम