खरे सद्गुरू जीवनात येऊनही मग त्यांना पूर्ण समर्पित का होता येत नाही? हृदयेंद्रनं हा प्रश्न विचारला आणि ‘बहुत सकृतांची जोडी म्हणुनि विठ्ठलीं आवडी’चे स्मरणही करून दिलं.
हृदयेंद्र – सद्गुरू जीवनात आले तरी त्यांच्या बोधानुरूप चालण्याची आवड लागणं सोपं नसतं! कारण त्यांच्यापेक्षा जगावर आपलं प्रेम असतं. शाश्वत सद्गुरूंना सोडून आपण अशाश्वत जगातच गुंतलो असतो. हाच भाव ‘‘आवडी आवडी कळिवरा कळिवरीं। वरिली अंतरीं ताळा पडे।।’’ या दुसऱ्या चरणात आहे! आपण कसे आहोत? जन्मापासून मरणोन्मुख आहोत..
ज्ञानेंद्र – हो.. पंतमहाराज बाळेकुंद्रीकर म्हणत की, देहाला नित्य प्रेतावस्था पाठीस लागली आहे..
हृदयेंद्र – प्रेत म्हणजे कलेवरच ना? आपला हा देह कोणत्या क्षणी प्रेतवत होईल, सांगता येत नाही. असं असूनही आपलं आपल्या या देहावर किती प्रेम आहे! एवढंच नाही, दुसऱ्यावरही आपलं असंच प्रेम आहे. दुसऱ्याला आपण देहरुपातच तर पाहतो, शरीरानंच तर जाणतो! माझे सद्गुरू म्हणतात, शरीराला दुसरं शरीर पाहूनच आनंद होतो, दुसरं शरीर पाहूनच दु:ख होतं! आपल्या आवडीचा माणूस दिसला की आपण सुखावतो आणि आपल्या नावडीचा माणूस दिसला की तीव्र नाराजीनं मन व्यापतं.. प्रत्यक्षात त्या माणसाला त्याच्या शरीरावरूनच तर आपण ओळखतो.. म्हणून प्रेतावस्था लागलेल्या माझ्या या शरीराचं प्रेतावस्था लागलेल्या दुसऱ्या शरीरांवरच प्रेम आहे, शरीरांशीच नातं आहे, शरीरांचाच आधार आहे, शरीरांचाच संयोग-वियोग आहे, शरीराचीच वाट पाहणं आहे, शरीरासाठीच तळमळणं आहे.. आवडी आवडी कळिवरा कळिवरीं! सारं शारीरिक पातळीवरच तर आहे! म्हणूनच शरीर जन्मल्याचा आनंद आहे, शरीर मेल्याचं दु:खं आहे! अशा वेळी केवळ देहबुद्धीत जखडलेल्या मला त्यापलीकडच्या आत्मबुद्धीचं भान तरी कुठे आहे? त्या आत्मस्वरूपाची आवड कुठे आहे? जणू त्याला कुलूपच लागलं आहे! वरिली अंतरीं ताळा पडे!!
ज्ञानेंद्र – ओहो! किती वास्तविक आहे हे..
योगेंद्र – आता तिसरा चरण.. अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी। रडे मागे तुटी हर्षयोगें।।.. त्याचा अर्थ काय?
हृदयेंद्र – सद्गुरूंच खरं रूप शब्दांत सांगता येत नाही, तरी अखेर शब्दांचाच आधार घ्यावा लागतो ना? या संपूर्ण सृष्टीत आई आणि मूल, हेच रूपक निस्वार्थ आणि परस्पर समर्पित नात्याचं एकमेव उदाहरण आहे. केवळ मनुष्य योनीच नव्हे, पशु-पक्ष्यांतही वात्सल्याचं हेच पूर्ण नातं आहेच.. म्हणून ही ओवी हेच रूपक वापरते. जेव्हा शारीरिक पातळीच्या वर साधक जाईल आणि त्याला सद्गुरू प्रेमाची खरी जाणीव होईल तेव्हा काय होईल? तर ‘अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी!’ जणू आई आणि मुलाची भेट.. ती अपूर्व आहे, पूर्वी कधी अशी भेट झालेली नाही, बरं का! सद्गुरूंचं खरं दयासिंधु, वात्सल्यसिंधु, करुणासिंधु स्वरूप जाणवल्यानंतरची ही भेट आहे! या भेटीत काय होईल? तर ‘‘रडे मागे तुटी हर्षयोगें।।’’ मागचं, सद्गुरू स्वरूपाचं आकलन झालं नव्हतं तोवरचं जे रडणं होतं ना ते तुटून जाईल.. केवळ हर्षांचा योग होईल!
ज्ञानेंद्र – फार सुरेख.. हृदू तू इतक्या ओघवत्या शैलीत हे सारं सांगतोयस ना, की ते सारं या क्षणी पटत आहे. जणू हाच या अभंगाचा खरा अर्थ आहे.. खरंच गाथेतल्या अर्थात चार ओळींचा एकमेकींशी जणू ताळमेळच बसत नाही, तुझा अर्थ एकाच सूत्राला धरून आणि प्रवाही आहे..
हृदयेंद्र – पण तरी गाथा संपादित करणाऱ्याचे परिश्रमही अतुलनीयच आहेत. त्यांनी अर्थ सांगितला म्हणून तर त्या वाटेनं आपल्याला आणखी गूढ अर्थ शोधता येतोय..
योगेंद्र – खरंच आहे.. आता शेवटचा चरण.. तुका म्हणे एकें कळतें दुसरें। बरियानें बरें आहाचें आहाच।।
हृदयेंद्र – हा म्हणजे जणू कळसबिंदूच आहे! सद्गुरू नेमका कसा आहे, हे अनुभवता येतं, सांगता येत नाही. हा अनुभव यायला हवा असेल तर आधी देहबुद्धीतून सुटलं पाहिजे, देहाच्या आसक्तीपलीकडे जाता यायला पाहिजे म्हणजे गुरुमाउलीचं दर्शन होईल.. पण जोवर आपण मूल होत नाही तोवर ही गुरुमाउलीही दिसणार नाही, उमजणार नाही, बरं का! एके कळते दुसरे!!
चैतन्य प्रेम