चहावाल्याच्या ‘चाय गरम’च्या तारस्वरानं वरच्या बर्थवर झोपलेल्या हृदयेंद्रला किंचित जाग आली. पडदा दूर करून तो खाली डोकावला. तिघे मित्र गप्पा ठोकत फराळ करीत होते. हृदयेंद्रकडे कर्मेद्राचं लक्ष गेलं.
कर्मेद्र – या.. सुप्रभात! प्रवासात तुम्ही फक्त शेंगदाणे, फळं खाता म्हणून आम्ही सुरू केलं.. चहा सांगू ना? की तोंड धुणार आधी?
हृदयेंद्र – तोंड पहाटेच धुतलंय. चहाच घेईन..
चौघांच्या हाती चहाचे छोटे प्याले आले. दिवाळीतल्या मातीच्या पणतीपेक्षा किंचित मोठय़ा व उभट अशा त्या ‘कुल्हड’मधील चहाला मातीचाही गंध होताच! हृदयेंद्रच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होता. ज्ञानेंद्रनं कुतूहलानं त्याच्याकडे पाहिलं. ‘काय झालं?’ असा मूक प्रश्न त्या नजरेत होता. हृदयेंद्र हसला आणि म्हणाला..
हृदयेंद्र – बराचसा अर्थ कळला..
योगेंद्र – कोणी सांगितला?
हृदयेंद्र – भिकाऱ्यानं!
ज्ञानेंद्र – काय? भिकाऱ्यानं? वेड लागलाय का?
प्रश्न ज्ञानेंद्रनं केला खरा, पण योगेंद्र आणि कर्मेद्रचं मनही त्याच प्रश्नानं विस्फारलं होतं! त्या तिघांकडे मंद स्मितकटाक्ष टाकत हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – ऐका तर! काल मध्यरात्रीनंतर झोप चाळवली. एक भिकारी डब्यात गात येत होता.
कर्मेद्र – या वातानुकूलित डब्यात? मध्यरात्री? आम्ही कुणीच नाही ऐकलं त्याला.
योगेंद्र – ऐकलं असतं तर हाकललं नसतं का?
हृदयेंद्र – मलाही हेच सारं वाटलं की हा डब्यात आलाच कसा आणि गाण्याची हिंमत करतोच कसा? मग ऐकलं की गातोयही मराठीत..
कर्मेद्र – (आश्चर्यानं) मराठीत?
हृदयेंद्र – हो एवढंच नाही तर तेसुद्धा ‘पैल तो गे काऊ’च!
‘काय?’ हा प्रश्न तिघांच्या मुखी उमटला. कर्मेद्रनं तर कुल्हडमध्ये चहाच आहे, याचीही खात्री करून घेतली!
हृदयेंद्र – हो रे.. आणि तेसुद्धा अगदी अशुद्ध स्वरांत.. शब्द मोडून तोडून.. त्या झोपेतच चरफडत ऐकलं.. जसजसं नीट ऐकू लागलो ना तसा अंगावर काटाच आला! त्या मोडतोडीतून अभंगाचा अर्थ सळसळत बाहेर पडत होता. ‘‘आगे आगे बढोगे तो अर्थ अपने आप समझ में आएगा,’’ या गुरुजींच्या शब्दांचंही प्रत्यंतर आलं. मी लगेच खाली उतरलो आणि डब्यात, दाराशी जाऊन सगळीकडे पाहिलं. कुठेच दिसला नाही तो.. पण काय गाऊन गेला!
ज्ञानेंद्र – असं काय गायला तो?
हृदयेंद्र – पैल तो गे काऊ कोऽहं कहता है! मग जाणवलं, ऐलतटावरच्या प्रपंचात मनसोक्त रुतलेल्या जिवाच्या मनात ‘कोऽहं’ हा मूळ प्रश्न उमटणं यापेक्षा सर्वात मोठा शुभशकुन कोणता? संकुचिताच्या हृदयात व्यापकाच्या आगमनाची ती खूणच नाही का? शुभसंकेतच नाही का?
योगेंद्र – व्वा!
ज्ञानेंद्र – पैल तो गे काऊ! ऐलतट आणि पैलतट!! मंडकोपनिषदातला प्रसिद्ध मंत्रच आठवतो..
कर्मेद्र – आता हे उपनिषद कोणतं?
ज्ञानेंद्र – हे अथर्ववेदात आहे. ‘मुंडक’ हा शब्द ‘मुण्ड’ धातूपासून बनला आहे.  मुण्ड म्हणजे मुंडन करणं. मनाचं मुंडण करून त्याला अज्ञानापासून सोडवणं. आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आणि ते मिळवणं हाच मानवी जन्माचा हेतू आहे, हा या उपनिषदाचा घोषच आहे जणू. यातला प्रख्यात मंत्र आहे, ‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते..’ पुढचं आठवत नाही..
कर्मेद्रनं तोवर लॅपटॉप सुरू केलाही होताच. सर्वज्ञता किती ‘क्लिकसाध्य’ झाली आहे! तिघांकडे पाहात संस्कृत शब्दांशी झटापट करीत कमेंद्र म्हणाला, ‘‘शोधलंय मी! तयोरन्य: पिप्पलं स्वादु अत्ति अनश्रन अन्यो अभिचाकशीति।।’’
ज्ञानेंद्र – म्हणजे दोन पक्षी एकाच वृक्षावर राहातात. खालच्या फांदीवरचा पक्षी मधुर फळं खातो. वरच्या फांदीवरचा पक्षी स्वत: फळ न खाता नुसताच पाहातो. वृक्ष म्हणजे शरीर. दोन पक्षी म्हणजे जीव आणि शिव. जीव सुख-दु:खंरूपी फळं खातो तर आत्मा साक्षित्वानं राहातो.
कर्मेद्र – पण पैल तो गे काऊशी याचा काय संबंध?
ज्ञानेंद्र – सांगतो.. थोडा धीर धर..