हातात एखादा महागडा किमती कॅमेरा आला की कुठे तरी उभे राहून किंवा भटकंती करून छायाचित्रे खेचणे म्हणजे फोटोग्राफी या आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यातील छायाचित्रणाच्या संकल्पनेला लाज वाटावी अशा ज्या काही मोजक्या छायाचित्रकारांची नावे घेतली जातात, त्यामध्ये गोपाळ मधुकर बोधे यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. हवाई छायाचित्रण हा प्रकार देशात अजिबात माहीतदेखील नसताना, गोपाळ बोधे यांनी हा छंद जपला तो एका ध्यासातून.. केवळ हेलिकॉप्टरमध्ये बसणे आणि छायाचित्रे काढणे म्हणजे हवाई छायाचित्रण नाही, तर त्यामागचे तंत्र जाणून घेणे, विषय समजून घेणे आणि विषय निवडण्यामागील उद्देश स्पष्ट असणे, या त्रिसूत्रीचा समावेश असतो. बोधे यांच्या छायाचित्रणाचे हेच वैशिष्टय़ ठरले. बोधे यांच्या मते, हेलिकॉप्टर ही हवेतील बैलगाडी होती. याचा नेमका अर्थ लक्षात घेतला, तर हवेत हादरे बसत असताना प्रसंगी जिवावर उदार होऊन स्थिर छायाचित्रण करणे किती अवघड आव्हान असते, ते सहज स्पष्ट होते. वयाच्या दहाव्या वर्षी पोटाची गरज म्हणून दहा रुपये पगारावर नोकरी पत्करून हाती कॅमेरा घेतलेल्या या कलावंत छायाचित्रकाराला अवकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या रूपाने भुरळ घातली. नौदलाच्या एका अधिकाऱ्याच्या भेटीसाठी हेलिकॉप्टरमधून जाताना गेट वे ऑफ इंडियाच्या आकाशातून घेतलेल्या एका छायाचित्रात या वास्तूचे एक गुपित आढळले. या वास्तूला असलेले घुमट समोरून कधीच कुणाला दिसलेले नाहीत. ते बोधे यांना या हवाई छायाचित्रात दिसले आणि मुंबईचे विहंगम रूप टिपण्याचा ध्यास त्यांनी घेतला.  १९९६ मध्ये  मुंबईच्या हवाई छायाचित्रांचे देशातील पहिले प्रदर्शन लोकांनी रांगा लावून पाहिले आणि शब्द किंवा छापील अक्षरेदेखील जे सांगू शकत नाहीत, ते या दृश्य माध्यमांतून सहज सांगता येते, याची जाणीव बोधे यांना झाली. इथे या कलेचे रूपांतर ध्यासात झाले. आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला जगासमोर अभिमानाने ठेवता येईल असा संपन्न ऐतिहासिक, नैसर्गिक सौंदर्याचा वारसा आहे, पण आपण मात्र त्याबाबत उदासीनच आहोत, ही जाणीव त्यांना छळू लागली आणि या रूपाचे दस्तावेजीकरण करण्याचा ध्यास गोपाळ बोधे यांनी घेतला. केवळ भिंतीवर टांगण्यापुरते प्रसन्न छायाचित्र टिपण्यापलीकडे जाऊन, लोकशिक्षण करणारे आणि पर्यटनाला चालना देणारे तेच नेमके टिपण्यात त्यांनी आपल्या सेवाकाळात आणि निवृत्तीनंतरच्या काळातील सारा वेळ व्यतीत केला. बोधेंच्या छायाचित्रांत हिमालयाची उत्तुंग शिखरे दिसतात आणि कणखर सह्य़ाद्रीच्या रांगांमध्ये लपलेले गडकिल्लेही दिसतात. सुंदर समुद्रकिनारे दिसतात आणि वेगवेगळी दीपगृहे दिसतात. मरिन ड्राइव्हवरील राणीच्या कंठहाराच्या नेत्रदीपक अशा भव्य छायाचित्राने बोधे यांचे नाव विक्रमवीरांच्या यादीत कोरले गेले. गोव्याच्या सौंदर्याचे दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या हवाई छायाचित्रणामुळे गोव्याच्या पर्यटनाला नवी चालना मिळाली. हवाई छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांची संख्या अजूनही देशात मोजकीच, जेमतेम तीन-चार एवढीच आहे, पण बोधे यांच्या हवाई चित्रीकरणामागे ध्यास होता आणि त्यांनी प्रत्येक मोहीम एक प्रकल्प म्हणून राबविली. दस्तावेजीकरण हा त्यांच्या हवाई छायाचित्रणाचा ध्यास होता. आज पुस्तकी पानापानांतून इतिहासाचे शाब्दिक पोवाडे गायिले जातात, पण या इतिहासाच्या आजच्या साक्षीदारांचे वास्तव मात्र विदारक आहे. छायाचित्र कधी खोटे बोलत नाही, ही बोधे यांची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रांनी हे विदारक वास्तवही टिपले आणि यंत्रणांना जागेही केले. बोधे यांनी केवळ छायाचित्रणाचा छंद जपला नाही, तर इतिहास जपण्याचेही महान काम केले आहे.