30 October 2020

News Flash

बेभरवशी ‘अर्थमंत्री’!

पाऊस लहरीच नव्हे, बेभरवशी होतो आहे.. तडाखे देतो आहे, तेही अनेकदा अवकाळी. पावसाची तीव्रता वाढते आणि मग कोरडे महिने सुरू होतात. ही दुही सांधण्यासाठी, नवा

| September 10, 2014 01:01 am

पाऊस लहरीच नव्हे, बेभरवशी होतो आहे.. तडाखे देतो आहे, तेही अनेकदा अवकाळी. पावसाची तीव्रता वाढते आणि मग कोरडे महिने सुरू होतात. ही दुही सांधण्यासाठी, नवा विचार आणि नवी स्पष्टता आवश्यक आहे..  
आजकाल ‘नेमेचि’ येणाऱ्या गोष्टी म्हणजे, एक तर दुष्काळ किंवा मग पूरच! महिनोन्महिने पाण्याविना राहणारे भाग आणि अनेक ठिकाणी पुराच्या संकटात सापडणारे भाग, हे दोन्ही भारताच्या हवामानाचा भागच बनत आहेत. दुष्काळ आणि पूर या नित्यनेमाला यंदाचा (२०१४) पावसाळा हाही अपवाद ठरलेला नाहीच. उलट, हा पावसाळा आणि त्याआधीचे काही पावसाळे पाहिलेल्यांना एक नवीन आणि विचित्र गोष्ट लक्षात आली आहे- वर्षांगणिक पुराची तीव्रता वाढत जाते, पावसाचे तडाखे आणि त्याचा लहरीपणा दरवर्षी अधिकाधिक अतक्र्य होत राहतो, हेच भारतीय लोक गेल्या काही वर्षांत पाहत आले आहेत. या लहरीपणामुळे, वर्षांगणिक आर्थिक नुकसानीचे आकडे वाढत जात आहेत आणि विकासाचे फायदे, एकेका मोसमात पूर अथवा दुष्काळामुळे विरून जात आहेत.
शास्त्रज्ञांनीच आता हे स्पष्ट केलेले आहे की, हवामानातील नैसर्गिक बेभरवशीपणा निराळा आणि ‘वातावरणीय बदलांचे परिणाम’ निराळे. वातावरणीय बदलांची कारणे अर्थातच मानवनिर्मित (प्रदूषक, वातावरणास घातक कर्बवायूंचे उत्सर्जन) आहेत आणि त्यांच्या परिणामी वातावरणातील उष्णता प्रमाणाबाहेर वाढत आहे. पावसाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की, ‘नेहमीचा पावसाळा’ निराळा आणि सध्या बसू लागलेले पावसाचे तडाखे निराळे. तसा फरक त्यांनी त्यांच्या अभ्यासांतही करण्यास सुरुवात केलेली आहे. एरवीसुद्धा पाऊस हा लहरी असतोच आणि निसर्गाचा पक्का अंदाज सहसा येत नाही, हे आपल्याला माहीत आहेच; पण शास्त्रज्ञांचे म्हणणे त्याहीपेक्षा निराळे आहे.. पावसाच्या नित्यचक्रात बेभरवशाचे बदल होत आहेत आणि ते आम्ही अभ्यासतो आहोत, असे.
केवळ एकाच कारणाला दोष देण्याचा हेतू येथे नाही. मोठय़ा हानीची कारणे नेहमीच अनेक असतात आणि ती गुंतागुंतीचीही असतात, हे लक्षात ठेवलेले बरे. दुष्काळात अथवा पुरात नुकसान होते नैसर्गिक तडाख्यामुळे, त्या तडाख्याची तीव्रता वाढण्यास निसर्गाच्या बरोबरीने अन्य घटकही जबाबदार असू शकतात. उपलब्ध स्रोतांचे, साधनसामग्रीचे पुरेसे व्यवस्थापन नसणे, नियोजनच ढिसाळ असणे, या कारणांचादेखील त्यात समावेश असतो.
याचे ताजे उदाहरण जम्मू-काश्मीरमध्ये, श्रीनगर शहरातही सध्या आलेल्या पुराचे. अशी संकटे येतात, तेव्हा पाऊस प्रचंड झालेला असतो, हे कारण खरेच आहे; परंतु नद्यांची पात्रे आक्रसली आहेत, की पुराचा लोंढा नदीपात्रात सामावू शकत नाही. आपणच ही पात्रे दगड-सिमेंटने बांधून टाकली आणि नदीवर नियंत्रण मिळवता येते अशा भ्रमात राहिलो, परंतु पूर आल्यास नदीतून जास्तीचे पाणी शहरांतच शिरणार, पात्रे बुजवून उभारलेल्या वस्त्यांमध्ये हाहाकार होणार, हेही आपण पाहतो आहोत.
त्यातच, भारतीय शहरे सांडपाण्याबाबत बेफिकीर आहेत, या कारणाची भर पडते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाले काही ठिकाणी तर नाहीतच, पण जेथे ते आहेत, तेथेही तुंबलेले किंवा गाळ साचून मद्दड झालेले आहेत. तळय़ांभोवती किंवा तळी बुजवूनच ‘रीअल इस्टेट’वाल्यांनी हातपाय पसरलेले आहेत. शहरांत किंमत कसली.. जमिनीचीच.. पाण्याला कितीसा भाव येणार? या अशा विचारामुळेच पाणी शहरांत शिरू लागले आहे आणि शहरे दर पुरात बुडताहेत.
आपल्यापुढील संकट दुहेरी आहे.. एक तर आपण आपल्या हातातील जलस्रोतांचे गैरव्यवस्थापनच करतो आहोत, त्यामुळे दुष्काळ वा पुरांचा धोका वाढतो आहे. दुसरीकडे, वातावरणीय बदलांच्या परिणामी आपल्या देशापुढील नैसर्गिक संकटांची तीव्रता अधिकाधिक वाढते आहे.
म्हणजे काय, हे कळण्यासाठी जरा मागे जाऊ. उत्तराखंडमध्ये, चारधाम यात्रेदरम्यान २०१३ च्या जून महिन्यात झालेला संहार. तो संहारदेखील या दोन्ही प्रकारच्या संकटाचा परिपाक होता. हिमालय हा जगातला सर्वात ‘तरुण’ पर्वत आहे, भौगोलिक वय कमी असल्याने हिमालयात दरडी कोसळण्याचा आणि हिमालयीन नद्यांना पूर-लोंढे येण्याचा धोका नेहमीच अधिक असतो, हे तर आहेच; पण यात वरची दोन कारणे मिळवा, म्हणजे उत्तराखंडात झालेल्या संहाराची  तीव्रता का वाढली, हे समजेल. वातावरणीय बदलांमुळे हवामान अधिकच बेभरवशी ठरले असून त्यातून पावसाच्या तडाख्यांची तीव्रता वाढू लागलेली आहे. पाऊस अवकाळी कोसळतो, अतक्र्य तीव्रतेने पडतो. हेच उत्तराखंडात १६ जून २०१३ रोजी घडले. पाऊस मुसळधार कोसळत होता, थांबतच नव्हता.. काही तासांतच केदारनाथसारख्या काही ठिकाणी २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, इतका तो कोसळला. यामुळे हिमालयाचे कडेही खचले. ही अवकाळी वृष्टीच होती. जून हा उत्तराखंडात तरी पावसाचा महिना गणला जात नाही.. त्यामुळेच तर तीर्थयात्रा करणाऱ्यांची आणि पर्यटकांची संख्या  तिथे त्या वेळी अधिक होती. या साऱ्यांना पावसाने अवचित गाठले, घेरले.
मग यातून मार्ग काय काढायचा? उपाय हाच की, त्या-त्या प्रदेशातील धोके ओळखून या प्रदेशांतील धोकाप्रवणतेचा मान आपण राखणे! हिमालयात यापुढे मोठे रस्तेच नको, धरणे आणि जलविद्युत प्रकल्प तर नकोच नको, ही भूमिका अर्थातच हटवादी ठरणार आहे आणि ती आपल्याला नकोच आहे; पण हे सारे आणि हिमालयीन गावांना आर्थिक बळ देणारे पर्यटन यांनी निसर्गाच्या विरुद्ध जाता कामा नये, इतपत आग्रह गरजेचा आहे. पाऊस बेभरवशी होतो आहे, त्याची तीव्रता अतक्र्य होते आहे, हे खरेच; पण त्यामुळेच तर यापुढे आपण पाण्याचे- पाणी साठवण्याचे आणि वाहू देण्याचे- नियोजन योग्यरीत्या केले पाहिजे. तसे झाले तरच चारधामसारखी अवकृपा टळेल, हिमालयीन संकटांवर ताबा मिळवता येईल.
भारतीय माणसांना हे चांगलेच ठाऊक आहे, की ‘पाऊस’ हाच या देशाचा खरा अर्थमंत्री.. त्याच्या मर्जीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. मात्र तडाख्यांमधून का होईना, पाऊस पडतो आहे हे लक्षात घेऊन आपण आतापासून एकेक थेंब साठवण्यास, त्याचा योग्य वापर करण्यास सुरुवात केली, तर पुढल्या दुष्काळी झळांपासून आपलाच बचाव होईल. अशा लहरी पावसासाठी कदाचित आपली अभियांत्रिकी बदलावी लागेल.. कारण इथेच आणि इतकाच पाऊस पडणार हा भरवसा आता देता येत नाही अशा स्थितीत आपण आहोत. त्यामुळेच पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी प्रवाहांची व्यवस्था आणि ते योग्यरीत्या साठवले जावे यासाठी साठवण व्यवस्था असे दोन्ही आपणास उभारावे लागेल. या पाण्याची लाभक्षेत्रे आणि भूजल संधारण क्षेत्रे कोठे कोठे उभी राहू शकतात याचाही निराळा विचार करावा लागेल. पाणी अडवणे, जिरवणे तसेच पाणी साठवणे आणि वळवणे हे आपले राष्ट्रीय ‘मिशन’ असायला हवे.
पाणी जेथे जेथे आहे, तेथे तेथे ते सांभाळायचे आहे. तळी, नद्या, लाभक्षेत्रे.. ही सारीच आधुनिक भारताची मंदिरे.. पर्जन्य-पूजेसाठी ती आपणच सज्ज-सिद्ध ठेवायला हवीत.
*  लेखिका दिल्लीतील विज्ञान व पर्यावरण केंद्र  (सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट- सीएसई) या संस्थेच्या संचालक आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2014 1:01 am

Web Title: an unexpected heaviest rain disaster
टॅग Flood
Next Stories
1 कोंबडी? जरा जपून..
2 आपण स्मार्ट असू, तर..!
3 पाणथळीचे धडे..
Just Now!
X