गुण्यागोविंदाने नांदणारी आणि पाहुण्यालाही परके  न मानणारी घरे, काश्मीरसारखे भूतलावरील नंदनवन किंवा ‘गुंडांचे गाव’ म्हणून कुख्यात असलेले एखादे गाव.. सारेच पालटू शकते.. बदल घडणारच, प्रश्न आहे तो निवडीचा!.. हैदराबादला आमच्या एका मित्राचा मोठा वाडा होता. एकत्र कुटुंब असल्याने घर सतत गजबजलेले असे. दिवाळीला त्यांच्या घरी जायला मला फार आवडे.

सगळ्या वयाची मुले-माणसे एकत्र नांदताना दिसत. एक आजी होत्या. त्यांचा मोठाच दरारा होता. गृहस्वामिनीचा मान त्यांना दिला जाई. त्या वागायला कडक असल्या तरी अतिशय प्रेमळ होत्या. सधन कुटुंब असल्याने दूरच्या नातेवाईकांना आसरा दिला जाई. इतकी मुले, नातवंडे घरात असायची की त्यांची नाती काय, कशी ते ध्यानातच राहात नसे. लग्नसमारंभात तर आणखी नातेवाईक गोळा होत. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडत असे.
एक वडीलधारे लांबचे काका घरात होते. त्यांना तत्त्वज्ञानाचा आणि उर्दू शायरीचा फार नाद होता. त्यांच्याशी बोलायला मला फार आवडे. त्यांच्या खोलीत पुस्तकांनी भरलेली कपाटे होती. सारे टापटिपीने व्यवस्थित मांडलेले असे. मुलांना त्यांच्या खोलीत जाऊन दंगा करायला परवानगी नव्हती. माझ्या वाचनाच्या आवडीमुळे मला मात्र तिथे मुक्त प्रवेश होता. त्यांच्या लिहिण्याच्या टेबलाच्या पाठीमागच्या भिंतीवर उर्दूत लिहिलेले चार शब्दांचे वाक्य होते.
‘‘हमीनस्त फरदोस बरुऐ जमीनस्त.’’
मी त्यांना त्याचा अर्थ विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, पृथ्वीवर स्वर्ग याच ठिकाणी अवतरला आहे. पुढे मला समजले की काश्मीरला पहिल्या प्रथम गेल्यावर एका कवीने असे उद्गार काढले की, गर फरदोस बरुऐ जमीनस्त, हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्त. म्हणजे पृथ्वीवर जर स्वर्ग उतरला असेल तर तो इथे, इथेच आणि फक्त इथेच! मग मी त्या काकांना विचारले की, त्या कवीने इतक्या खात्रीने स्वर्ग फक्त इथेच अवतरला असल्याचे त्रिवार सांगितले. मग तुम्ही तसे एकदाच का म्हटले? त्यावर ते मिष्किलपणे म्हणाले, त्या कवीची खात्री कमी प्रतीची होती म्हणून त्याला त्रिवार उच्चार करावा लागला. माझी अगदी पक्की खात्री आहे. म्हणूनच मला एकदाच म्हणणे पुरेसे वाटते.
त्यांच्या घरी एका समारंभाला गेलो होतो. फक्त जवळच्या मंडळींनाच आमंत्रण होते. पण संख्या इतकी मोठी होती की ग्रुप फोटो एक पुरुषांचा आणि एक स्त्रियांचा असे वेगवेगळेच काढावे लागले. सगळ्याच वयाची मुले-माणसे खेळीमेळीने वागत होती, थट्टामस्करी करत होती. माझाही तो दिवस फार आनंदात गेला. त्यामुळे मला काकांच्या खोलीतल्या त्या ओळीची प्रचीती आल्यासारखे वाटले.
बऱ्याच वर्षांनी त्या घरात जायचा योग आला तेव्हा सारे सुखसमाधान नाहीसे झालेले दिसले. तीन-चार वयस्कर व्यक्तींशिवाय घरात कोणीच नव्हते. काकांच्या खोलीतही पहिली टापटीप राहिली नव्हती. ते तर आजारीच होते. पूर्वी गुण्यागोविंदाने एकत्र  नांदलेले नातेवाईक आता वेगळे झाले होते आणि इस्टेटीसाठी कोर्टकज्जे चालू होते. थोरल्या कर्तबगार आजी केव्हाच देवाघरी गेल्या होत्या. काकांच्या जवळ बसलो तेव्हा मला भडभडून आले. ते मला म्हणाले, ‘‘त्या स्वर्गाच्या संकल्पनेबरोबर हुमायूनचे एक वाक्य लिहायचे विसरलो. ‘ये भी दिन जायेंगे.’’’
इतिहासात अत्यंत दुर्दैवी ठरलेल्या हुमायून बादशहाने आपला आशावाद शाबूत ठेवण्यासाठी ते वाक्य आपल्या महालात लिहून ठेवले होते असे म्हणतात. वाईट गोष्टी घडत असल्या म्हणजे तो काळ लवकर संपावा असे वाटते. चांगला काळ मात्र संपू शकेल हा विचारसुद्धा सहन होत नाही. नशिबाचे भोग आहेत म्हणून वाईट काळ सहन करायचा आणि चांगला काळ आला तर दैव प्रसन्न आहे असे समजणे म्हणजे पराभूत मनोवृत्तीचे लक्षण आहे. वाईटपणाची तीव्रता आपल्या विचारांनी, वृत्तीने आणि वर्तणुकीने कमी करायची तर चांगला काळ येऊन तो टिकूसुद्धा शकतो. आपले प्रयत्न योग्य दिशेने व्हायला हवेत आणि ते केव्हाही कमी पडता कामा नयेत.
मी आणि अविनाश धर्माधिकारी स्वाध्याय परिवारातला एक प्रयोग पाहण्यासाठी एका खेडेगावात गेलो होतो. चोर, दरोडेखोर, सगळे अवैध धंदे करणारे अशी त्या गावातल्या लोकांची ख्याती होती. खून-मारामाऱ्या तर नित्याच्याच होत्या. कलेक्टर किंवा जिल्हाधिकारीसुद्धा गाडीभर पोलीस सोबत घेतल्याशिवाय त्या गावात शिरण्याचे धाडस करत नसत. अशा त्या गावात स्वाध्याय परिवाराची माणसे पोहोचली. त्यांना काम करण्यात अडथळा होतो आहे असे कळल्यावर पूज्य दादाजी स्वत: तिथे गेले आणि त्यांनी आपल्या वागण्याने, विचारांनी त्या लोकांवर छाप पाडली. त्या गावात स्वाध्यायाचे काम उत्तम सुरू झाले, एवढेच नाही तर स्वाध्याय परिवाराचे काम असलेल्या सर्वोत्तम गावांमध्ये त्याची गणना व्हायला लागली आणि अशा उत्तम गावांसाठी असलेला प्रयोग त्या गावात केला जात होता. म्हणून माझ्या मनातही त्या गावाला भेट द्यायची उत्सुकता होतीच.
आम्ही त्या गावातल्या स्वाध्याय परिवाराच्या मुख्य माणसाला भेटलो. त्याचे किराणा आणि जनरल स्टोअर्सचे दुकान होते. त्याने स्वाध्याय येण्यापूर्वीचा गाव आणि आताचा गाव यात केवढा फरक पडला होता ते आम्हाला समजावून सांगितले. पूर्वी सवर्ण व दलित यांच्यामध्ये केवढी तरी दरी होती. दलितांना आणि स्त्रियांना अत्यंत वाईट वागवले जाई. घुंगट घेऊनही एकटय़ादुकटय़ा स्त्रीला गावात फिरता येणे अशक्य होते. गुंड लोक त्यांच्यावर अत्याचार करीत, पण तक्रार करण्याचीही कोणामध्ये हिंमत नव्हती. पण दादाजी स्वाध्यायाचे विचार घेऊन आले आणि पाच वर्षांत गावाचा कायापालट झाला. अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले. वैध मार्गाने गावात समृद्धी यायला लागली. जातीवरून कोणाचीही मानहानी करणे बंद झाले. गावात सलोखा नांदायला लागला. पाच वर्षांत या गावातून किंवा गावातल्या कोणाविरुद्ध एकही तक्रार पोलीस ठाण्यात गेली नाही. पोलीस तर आश्चर्यचकित झाले.
आम्ही त्या माणसाशी बोलत असताना संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली. आम्ही स्वाध्याय परिवाराच्या अमृतालयम् या मंदिरात गेलो. स्वाध्यायाच्या पद्धतीप्रमाणे तीन वेगवेगळ्या घरातल्या व्यक्ती पुजारी म्हणून आल्या. तिन्ही वेगळ्या जातीमधल्या होत्या. त्यातली एक तर महिला होती. कोणतीही घंटा वगैरे न होता अख्खा गाव पूजेसाठी लोटला होता. कोणत्याच महिलेने बुरखा वगैरे घेतलेला नव्हता. त्यापैकी काही येऊन आमच्याशी मोकळेपणाने बोलल्यासुद्धा. निघायच्या आधी मी अविनाशला विचारले, ‘‘कसे वाटले हे सारे?’’ तो म्हणाला, ‘‘अगदी स्वर्गात असल्यासारखे वाटले. जिथे माणसे आपसात इतक्या सलोख्याने वागून प्रगती साधतात तो स्वर्गच असणार!’’ त्यावर त्या प्रमुखाने उत्तर दिले ‘‘स्वर्गच आहे हा. पण दादाजींनी स्वाध्यायाचा विचार आणला म्हणून स्वर्ग झाला. नाहीतर आम्ही नरकातच राहात होतो.’’ त्या गावातल्या एका कुप्रसिद्ध आणि खतरनाक गुंडाचे नाव मला ऐकलेले आठवले. मी त्या मुखियाला विचारले की तो सध्या कोठे असतो. त्याने हसत हात जोडले आणि सांगितले, ‘‘मीच तो.’’
स्वार्थ बाजूला ठेवून सर्वाशी स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध जोडणे म्हणजेच इथे स्वर्ग निर्माण करणे आहे. नाहीतर नरकच वाटय़ाला येत असतो, तोही इथेच!
यापैकी काय निवडायचे आपण?