13 July 2020

News Flash

परिवारापोटी प्राण घेतलं हाती

सामान्यत: पशू जिवाला सांभाळत भांडतात; अगदी जीवघेणा संघर्ष दिसतो तो केवळ परिवारासाठी टोकाचा स्वार्थत्याग करायला सज्ज असलेल्या मुंग्यांसारख्या जातींत !

| April 25, 2014 01:04 am

सामान्यत: पशू जिवाला सांभाळत भांडतात; अगदी जीवघेणा संघर्ष दिसतो तो केवळ परिवारासाठी टोकाचा स्वार्थत्याग करायला सज्ज असलेल्या मुंग्यांसारख्या जातींत !
हत्तींच्या कळपांचा गाभा असतो माद्या-आज्ज्या, आया, मावशा, लेकी, भाचरे. या स्त्रीसेनेचे एकमेव ध्येय असते कच्च्या-बच्च्यांचा बचाव. काही धोका वाटला की हत्तींच्या आया-मावश्या किचाटून पिल्लांना सावध करतात. धोक्याच्या दिशेला तोंड करून, खांद्याला खांदा लावत एक छात्यांचा कोट उभारतात. मग पिल्ले धावत जाऊन त्यांच्या छाती-पोटाखाली आसरा घेतात. हत्तींच्या कळपांचे विशिष्ट संरक्षित टापू वगरे काही नसतात, त्यांचा मुक्तसंचार चालतो. कळपा-कळपांत कसलाच संघर्ष नसतो. चुकून-माकून भेटले तर एकमेकांना सलामी देतात आणि आपापल्या वाटेने भटकत राहतात. सुळे फुटेपर्यंत नर बच्चे कळपांत नांदतात, मग होते त्यांची हकालपट्टी. सुळेवाले नर एकटय़ा-दुकटय़ाने भटकत राहतात. योगायोगाने भेटले की टकरा देत एकमेकांची ताकत अजमावतात. एखादी माजावर आलेली मादी आढळली की तिच्याशी समागम करण्याचा अटीतटीचा प्रयत्न करतात. त्यासाठी झगडतात. पण हात राखून. त्यांच्या लढतीचा हेतू असतो प्रतिस्पध्र्याची कुवत अजमावणे. तो प्रबळ वाटला, तर मुकाटय़ाने माघार घेतात. कोणालाच इजा होऊ देत नाहीत.
३५ वर्षांपूर्वी मी म्हैसूरच्या पठारावर बंडीपूरच्या जंगलात हत्तींच्या खानेसुमारीच्या उपद्व्यापात गढलो होतो. संध्याकाळी तलावांजवळ हत्तींचे कळप पाणी प्यायला, डुंबायला येतात, त्यांची शिरगणती करायला मचाणावर बसून होतो. एकदम एक मोठा अडतीस हत्तींचा कळप दाखल झाला. त्यातली मोठी हत्तीण माजावर होती आणि कळपातला सर्वात मोठा सुळेवाला नर तिच्या मागे-मागे येत होता. उघड होते की बाकीच्या नरांनी तो सगळ्यांहून भक्कम हे मानलेले होते. ते दोघे सर्वाच्या पुढे तळ्यात उतरले. इकडे तळ्याच्या कडेला, वीस नरांच्या उंचीसे एक कतार अशा दहा जोडय़ा जमल्या. भल्या मोठय़ा हत्तींपासून ते अगदी छोटय़ा पिल्लांपर्यंतच्या एका जोडीतले दोन हत्ती, जवळजवळ सारख्या आकाराचे अशी विभागणी करून. मग तळ्यात त्या जोडीचे प्रियराधन चालू असताना, या वीस नरांच्या आपापल्या तोलाच्या नरांशी रेटा-रेटय़ा सुरू झाल्या. सुळ्यात सुळे गुंतवून, गंडस्थळावर गंडस्थळे टेकवून सारी शक्ती पणाला लावून प्रतिस्पध्र्याला ढकलायला पाहू लागले. यातल्या सगळ्यात छोटय़ा तीन जोडय़ा होत्या, अजून सुळे न फुटलेल्या पिल्लांच्या. बाकीचे हत्ती खऱ्या चुरशीने झुंजत होते, ती पिल्ले केवळ दांडगाई करत होती. पण हत्तीच्या नरांच्यात अगदी लहानपणापासून एकमेकांची ताकत अजमावण्याचा असा उद्योग अविरत चालू असतो.   
हत्तींची सामाजिक बांधीलकी एका मर्यादेत असते. कोणीच नर-माद्या ब्रह्मचर्य पत्करत नाहीत. पण याच्या जोडीनेच त्यांचे कळप एकमेकांशी सलोख्याने वागतात. उलट अतीव समाजनिष्ठ मुंग्या/मुंगळ्यांचे परिवार आपापले टापू सांभाळत शेजाऱ्यांशी सतत भांडत-तंडत असतात. प्रत्येक समूहाची एक राणी मुंगी आई, बाकी सगळ्या कामकरी, लष्करी मुंग्या एकमेकींच्या बहिणी-बहिणी. सगळ्यांनी मिळून अन्न गोळा करायचे, चावून चावून एकमेकींना भरवायचे. शिवाय राणी मुद्दाम पाझरते असे रस सगळ्यांनी चाटत राहायचे. यातून प्रत्येक परिवाराचा एक विशिष्ट गंध साकारतो. आपला तो सुगंध, परक्या परिवारांचे झाडून सारे दरुगध. कोणी मुंगी भेटली की तिला हुंगायची, आपल्या साऱ्या भगिनी सुगंधा. दरुगधी असली तर ती आहे आपली हाडवैरीण. शक्य तो त्यांना आपल्या टापूतून हाकलून द्यायचे, जमेल तेव्हा तेव्हा त्यांचा मुलूख काबीज करायचा, त्यासाठी ‘आम्ही मुंगळ्यांच्या पोरी नाही भिणार मरणाला’ अशी शर्थीची लढाई करायची. पण अशा स्पध्रेत मुंग्या काही एकदम हातघाईवर येत नाहीत. सुरुवात होते नुसत्या शक्तिप्रदर्शनाने. मुंग्यांचे गाढे अभ्यासक एडवर्ड विल्सन आपल्या वारूळपुराण कथेत याचे रसभरीत वर्णन करतात :
‘‘ते दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले, आणि एकमेकांपुढे नाचायला लागले. हे काही शृंगारिक नृत्य नव्हते. तो होता दोन वारुळांमधला आपापला मुलूख काबूत ठेवण्यासाठीचा सामना. दोन्ही बाजूंच्या मुंग्या विरोधी पक्षाची ताकद आजमावत होत्या. जोखताना स्वत:च्या ताकदीची जाहिरात करत होत्या. यात कोणत्याच मुंगीला धोका नव्हता; मृत्यूचा सोडाच, पण जखमांचाही. हे होतं पहिलवानांनी एकमेकांपुढे शड्ड ठोकण्यासारखं. यात आपली सरशी होईल, आपला टापू सांभाळून राहता येईल, असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं. हे शक्तिप्रदर्शन ही काही युद्धाची सुरुवात नव्हती. मानवी सेना जशा मिरवणुका काढतात, सराव युद्ध खेळतात, तसा हा प्रकार.’’
हत्तींच्या नरांसारखे एकांडे पशू अशा शक्तिप्रदर्शनावरच मिटवतात. दोघा प्रतिस्पध्र्यापकी एक कोणी तरी आपल्याला हे भांडण जड जाईल असे ठरवून पड घेतो. परस्परांना इजा करायचे टाळतो. कोणीच दुसऱ्याला जिवे मारायचा विचार करत नाही. पण निसर्गाच्या रहाटगाडग्यात संघप्रिय जातींनी हा संयम सोडून दिला आहे. आप्त निवडीच्या गणितात एकेका वैयक्तिक प्राण्याला काही खास किंमत नसते. पुऱ्या परिवाराचाच विचार असतो. तेव्हा आपापल्या संघाच्या हितसंबंधांसाठी त्याचे सदस्य शीर तळहातावर घेऊन लढायला तयार असतात. आपापल्या टापूचे संरक्षण करायला स्वत:चा जीव गमवायला सज्ज असतात, आणि अर्थातच जोडीने प्रतिस्पध्र्याची हत्या करायला. उलट एकांडय़ा पशूंत स्वार्थत्यागाला जशी सक्त मर्यादा असते, तशीच क्रौर्यालाही.
पण संघप्रिय पशूंत जसा शर्थीचा स्वार्थत्याग पाहायला मिळतो, तसेच अपरिमित क्रौर्यही. म्हणून अशा मुंग्यांच्यात शक्तिप्रदर्शन संपले की धुमश्चक्री सुरू होऊ शकते. विल्सन याचेही वर्णन करतात : ‘‘आता दिखाऊ शक्तिप्रदर्शन संपले. कोणतीच मुंगी ताठ राहून उंची वाढवेना, की पोट फुगवून आकार वाढवेना. आता एकमेकींवर चढून आपल्या करवतीसारख्या जबडय़ांनी शत्रूचे वेगवेगळे अवयव तोडायचा प्रयत्न होऊ लागला. कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला. जखमी झालेल्या शत्रूंची खांडोळी उडवली जाऊ लागली. लवकरच सगळे क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुग्यांनी भरून गेले. प्रतिपक्षाच्या पुढारी मुंगीला ओढून मारून तिचे तुकडे केले. दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही, किंवा मत्री होत नाही. वारुळाची जागा एकाच परिवाराच्या हुकमतीखाली राखणे हे अटळ असते. वारुळाचा टापू काहीही करून, प्रसंगी जीव देऊनही राखला जातो.’’
आणि आपल्या मानवजातीचे काय? आपल्या सग्या-सोयऱ्या मर्कटजातींतल्या टोळ्या आपापला टापू सांभाळतात. त्यासाठी दुसऱ्या टोळ्यांशी कडाडून भांडतात. पण मुंग्यांत जशी या लढतींत मोठय़ा प्रमाणावर िहसा होऊ शकते, तशी माकडांत होत नाही. तरीही माकडांत भरपूर िहस्र प्रवृत्ती आढळतात. टोळीच्या आधीच्या म्होरक्याचा पराभव केल्यानंतर नव्याने सत्तेवर आलेला नर आधीच्या म्होरक्याची संतती असलेली पिल्ले हिसकावून घेऊन ठार मारतो. उत्क्रान्तीच्या ओघात मानवात ही िहस्र प्रवृत्ती उतरली आहे. जरी माकडांत होत नसला तरी मानवात या िहस्र प्रवृत्तीचा उद्रेक टोळ्या-टोळ्यांतल्या, गटा-गटांतल्या भांडणात होत राहतो. वाटते, आपण हत्तींसारखे असतो, तर बरे झाले असते, कौरव-पांडवांचे भांडण केवळ भीम-दु:शासनाच्या गदायुद्धावर मिटले असते; महाभारताच्या युद्धासारखा भीषण संहार झाला नसता!
* लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2014 1:04 am

Web Title: ants lives for their family
Next Stories
1 आम्ही साऱ्या बहिणी जवळीच्या
2 मिळती मिसळती परिस्थितीशी
3 चालते मी डौलात हंसावाणी!
Just Now!
X