‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या व्यवस्थापकीय संपादकपदावरून २५ वर्षांपूर्वीच निवृत्त झालेल्या आर्थर गेल्ब यांच्या निधनाने अमेरिकी पत्रकारिता क्षेत्र कसे हळहळले, हे गेल्या आठवडय़ाभरात दिसत राहिले. गेल्ब यांची कारकीर्द उमेदवारीपासून उच्चपदापर्यंत फक्त न्यूयॉर्क टाइम्समध्येच साकारली, परंतु वॉशिंग्टन पोस्टसारख्या पत्रानेही गेल्ब यांचे निधन १९ मे रोजी झाल्यानंतर, गुरुवारच्या अंकात त्यांच्यावर स्मृतिलेख लिहिला. निवृत्तीनंतर आणि २००३ सालच्या ‘सिटी रूम’ या आत्मपर पुस्तकानंतर, गेले दशकभर थांबवूनही एवढे श्रेय गेल्बना मिळाले. यामागची कारणे अनेक स्मृतिलेखांमधल्या आठवणींतून उलगडतात.. कधी काळी नाटकांबद्दल लिहिणारे गेल्ब ‘नेहमीच्या यशस्वी कलावंतां’च्या आसपास घोटाळण्यापेक्षा आणखी चांगले अभिनेते कोण, याच्या शोधात कसे राहिले आणि त्यातूनच वूडी अ‍ॅलन आणि बार्बरा स्ट्रेसँडसारख्या आजच्या नामवंतांबद्दलचे पहिलेवहिले लेख कसे लिहिले गेले, याच्या या आठवणी आहेत. शेक्सपिअरची नाटके न्यूयॉर्कमध्ये करणाऱ्यांवर भरभरून लिहिणाऱ्या गेल्ब यांनाही पुढे या शहरात रुजलेल्या ‘शेक्सपिअर महोत्सवा’चे श्रेय कसे जाते किंवा ‘कू क्लक्स क्लॅन या अमेरिकी संघाचा नाझीवादी नेता हा मुळात हिटलरशाहीत जिवावर बेतलेल्या ज्यू कुटुंबातील’, ‘संग्रहालयातील ग्रीक कुंभ इटलीतून झालेल्या तस्करीतला’ अशा गेल्ब यांनी दिलेल्या बातम्यांसाठी ते संस्मरणीय ठरले आहेत.
१९४४ साली न्यूयॉर्क टाइम्समध्ये ‘कॉपी बॉय’ म्हणून १६ डॉलर पगारावर लागलेले गेल्ब वर्षभरातच, ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’वर झालेल्या हल्ल्याची बातमी देण्यासाठी मदत केल्यामुळे बातमीदार बनले. तेथे सुमारे दहा वर्षे काढली, तेव्हाच नाटके पाहण्याचा सपाटा त्यांनी सुरू ठेवला. पुढे नाटय़विषयक बातमीदार असे पदच चालून आले, तेव्हा मात्र ब्रॉडवे किंवा ऑफ ब्रॉडवे भागांच्याही बाहेर- म्हणजे अगदी छोटय़ाछोटय़ा नाटय़गृहांतही काय चालते आहे याकडे गेल्ब यांनी लक्ष दिले. युजीन ओनील या दिवंगत नाटककाराचे चरित्र त्यांनी लिहिले. त्यांची कारकीर्द बहरू लागली ती १९६० च्या दशकात. तरुण वर्गाला हवा असणारा देश कसा आहे, हे गेल्ब जणू शोधत होते. या शोधासाठी आठवडी पुरवण्या, फॅशनची पाने हेही शहरातील बातम्यांइतकेच महत्त्वाचे आहे, हे त्यांनी जाणले. तोवरचा न्यूयॉर्क टाइम्स पंतोजीछाप होता, तो गेल्बसारख्यांच्या प्रयत्नांमुळेच ‘आजचा’ झाला. मग १९६७ मध्ये महानगर संपादक, १९७७ मध्ये उपव्यवस्थापकीय संपादक असा त्यांचा प्रवास, १९८६ व्यवस्थापकीय संपादकपदावर आला आणि नियमानुसार ६५ व्या वर्षीच निवृत्त झाल्याने संपला. त्याहीनंतरचा काही काळ, त्यांनी याच पत्रासाठी पुस्तके संपादित केली.