23 February 2019

News Flash

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २६६. गोरक्षनाथांचा हवाला

कबीरदासांच्या भजनाच्या अनुषंगाने आपण गोरक्षनाथ विरचित ‘सिद्धसिद्धांतपद्धति’ या ग्रंथातील सहाव्या उपदेशातील काही श्लोकांचा मागोवा घेऊ. या सहाव्या उपदेशात, योगमार्गासकट सर्वच साधनमार्गाने कितीही आटाआटी केली तरी

| December 4, 2012 12:13 pm

कबीरदासांच्या भजनाच्या अनुषंगाने आपण गोरक्षनाथ विरचित ‘सिद्धसिद्धांतपद्धति’ या ग्रंथातील सहाव्या उपदेशातील काही श्लोकांचा मागोवा घेऊ. या सहाव्या उपदेशात, योगमार्गासकट सर्वच साधनमार्गाने कितीही आटाआटी केली तरी गुरुकृपेशिवाय परमपद मिळणे कसे अशक्य, याचं वर्णन गोरक्षनाथांनी केलं आहे. त्यातील ८१ ते ९५ हे योगविषयक श्लोक वाचताना कबीरांच्या भजनाचीच पदोपदी आठवण येईल. आपल्या स्थलमर्यादेपायी श्लोकांतील काही भागच घेतला आहे, जिज्ञासूंनी मूळ ग्रंथातील मूळ श्लोक व त्यांचा अनुवाद तपशीलात अवश्य पाहावा. त्यातही एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की ज्यांना योगमार्गाचा परिचय नाही त्यांना तर हे सारे वर्णन शाब्दिकच वाटेल. किंवा वाटेल की एवढय़ा भरताडाची काय गरज? पण तरी अत्यंत संक्षेपाने व ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायापुरनुसार दोनेक श्लोकांचा अर्थ पाहू. गोरक्षनाथ सांगतात की, मस्तक, तालुदेश, ब्रह्मरंध्र, ललाट, भूनेत्र, नासिकाग्र, कानांतील आवाज, घंटिका, कंठ, हृदय, नाभिमध्य, त्रिकमलकुहर (कुंडलिनीस्थान), मूलपीठ आदि षोडशाधारांवर मन संलग्न केल्यानेही निरुत्थान परमपद प्राप्त होत नाही. ललाटदेश, प्रलयाग्निसदृश जालंधरपीठावर, विजेप्रमाणे तरल अशा त्रिकूट स्थानावर, ब्रह्मनाडी(सुषुम्ना)वर, मस्तकावरील विद्युतप्रकाशावर, कोटिसूर्यप्रकाशमय आकाशचक्रावर नित्य ज्योतिरूपाने जे ध्यान करतात त्यांनाही निरुत्थान परमपद प्राप्त होत नाही! जे ब्रह्मनाडीचा भेद करून बिंदूला शंखगर्भाच्या उदरात (दशमद्वारी) परमपदाच्या गुहेत घेऊन जातात व तेथे आकाश गुण विकार असा अंतर्नादघोष ऐकतात त्याांही केवळ नादघोषतत्त्वच समजते, निरुत्थानतत्त्व समजत नाही. योगमार्गोक्त रीतीने चालत दोहन क्रियेने जीभ सतत दीर्घ करून व हळूहळू तालूमधील दशमद्वाराचे उल्लंघन करून मध्यसंधी संघट घटांतून शिरोदेशांत नेऊन षड्रसअमृताचे पान करून अजरामरत्व पावलेले लोक चिरमूच्र्छाच प्राप्त करतात, परमपद नव्हे!.. वर्णन बरेच आहे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर साधक कितीही उच्चावस्था प्राप्त करेना का पण त्याला परमपदाची प्राप्ती होत नाही, असे म्हटले आहे. मग ती प्राप्ती कशाने होते? ती होते केवळ त्या परमात्म्याचेच प्रतिरूप असलेल्या खऱ्या निस्संग सद्गुरूच्याच कृपेने. गोरक्षनाथ ‘गुरुमयं ज्ञेयं निरुत्थपदं’ या शब्दांत त्याचा निर्वाळा देतात. इथे आता कबीरांच्या त्या भजनाच्या अखेरीस येणाऱ्या विचारांचा सांधा जोडून घेत त्यांच्या दुसऱ्या भजनाकडे आपण वळणार आहोत. मुक्तीची इच्छा खरी कोणाला होती? दुखनिवृत्ती कोणाला हवी होती? ती हवी होती आत्मतत्त्वाला. त्यासाठी मूळ शुद्ध कळकळीतून आपण या मार्गावर पाऊल ठेवलं पण अखेरचा घूँघट मधे आला तो लोकेषणा! भौतिकाचे सर्व घूँघट दूर होतील पण लोकेषणेचा घूँघट तपस्व्यांनाही दूर करता येणे कठीण!

First Published on December 4, 2012 12:13 pm

Web Title: arupache rup satya margadarshak 15