खरा योग तो ज्यायोगे जीवशिवाचा भेदच नष्ट होतो. म्हणजेच जीवभाव उरतच नाही सर्व काही शिवच होऊन जातं. त्यामुळेच कबीरजी सांगत आहेत-
अद्वैत वैराग कठिन है भाई, अटके मुनिवर जोगी।
अक्षर लौं की गम्म बतावै, सो है मुक्ति बिरोगी।। ५।।
मनाच्या सर्व ओढी तोडणं आणि मनाचे सर्व संकल्प अर्थात क्षणोक्षणी मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छांचा प्रवाह तोडणं हे अद्वैत वैराग्य फार कठीण आहे बाबा! मायेत अडकलेल्या प्रत्येकासाठीच ते अशक्य आहे. मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा या मायेत अडकून पडले. म्हणूनच तर त्यांच्यात क्रोध जागा होता. त्यातूनच तर ते शाप देत होते! मग हजारो वर्षे तप करणाऱ्यांनाही मायेला ओलांडता आलं नाही तर आपली काय कथा? कित्येक तथाकथित सिद्धपुरुषांचे सिद्धांत व उपदेश हे शब्दव्यापारापलीकडे जाऊ शकत नाहीत. मन आणि वाणीच्या मर्यादेतच ते अडकून आहेत. त्या परीघापुरताच उपदेश करीत आहेत. पण त्यानं मुक्ती होणार नाही! मग ती कशानं साधेल?
कह अरु अकहु दोऊ ते न्यारा, सत असत्य के पारा।
कहैं कबीर ताहि लख जोगी, उतरि जाव भवपारा।। ६।।
हे योगी! उच्चार (व्यक्त) आणि मौन (अव्यक्त) तसेच सत्य (शाश्वत / सूक्ष्म, अदृश्य) आणि असत्य (अशाश्वत / स्थूल, दृश्य) यांच्यापलीकडे जाऊन शोध घे की मोक्षाची आस कोणाला आहे, दुखापासून सुटका कोणाला हवी आहे? मग लक्षात येईल की तुझ्याच आत्मसत्तेला, तुझ्याच चेतनसत्तेला मोक्षाची आस आहे! तुझ्याच आत्मसत्तेला दुखनिवृत्ती हवी आहे. त्या आत्मस्थितीतच स्थित होऊन भवपार होऊन जा! हे भजन इथे संपतं पण शेवटच्या कडव्यात साधकाला अंतर्मुख करणारा फार महत्त्वाचा मुद्दा आला आहे त्याचा आपण संक्षेपानं विचार करणार आहोतच पण त्याआधी गोरक्षनाथ! गोरक्षनाथांनीही योगमार्गाच्या बाह्य़रूपात अडकलेल्यांना फटकारलं आहे. ‘सिद्धसिद्धांतपद्धती’ या नाथसंप्रदायात महत्त्वाचं स्थान असलेल्या ग्रंथात त्याचं विवरण आहे. त्यासाठी आधारभूत प्रत आहे ती अनमोल प्रकाशनाने प्रकाशित केलेली व स्वामी स्वरूपानंदांचे सत्शिष्य महादेव दामोदर भट आणि सखाराम रघुनाथ आघारकर यांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केलेली. या ग्रंथात नाथसंप्रदायाबाबत सखोल मार्गदर्शन आहे. यात सहा प्रकरणे आहेत, त्यांना उपदेश म्हणतात. प्रथम उपदेशात पिंडोत्पत्ति, दुसऱ्यात पिंडविचार (नवचक्रे, सोळा आधार, तीन लक्ष्य, पाच व्योम, अष्टांगयोग), तिसऱ्यात पिंडातच ब्रह्मांड कसे त्याचे विवरण, चौथ्यात पिंडाधार अर्थात कुंडलिनी व शिवशक्ति, पाचव्यात सद्गुरुमहात्म्य आणि सहाव्यात अवधूत लक्षणे आहेत. परमपदाच्या प्राप्तीसाठी गुरुकृपेअभावी इतर साधने कशी थिटी पडतात, हे ठामपणे मांडले आहे.