ज्ञान आचरणात किती उतरलं, हे विचारून कबीरजी मुक्तीचाच मार्ग दाखवत आहेत. जोवर अज्ञान आहे तोवर बंधन आहे. जोवर जगणं अज्ञानाचं आहे तोवर मुक्ती कसली? जेव्हा आचरणात ज्ञान येईल तेव्हाच भ्रमाची बंधनं संपतील. तेव्हाच जगण्यातच मुक्ती गवसेल. हे सद्गुरूशिवाय अशक्य. मुळात ज्ञान आणि अज्ञान यातला भेदही आपण जाणत नाही. आपल्या अज्ञानालाच ज्ञान मानून त्याचीच शेखी मिरवायची आपली सवय असते. त्यामुळे ज्ञान नेमकं काय, ते सद्गुरूच सांगतात. ते आचरणात स्वत: आणून दाखवतात आणि तसं जगता येतं, हे मनावर बिंबवतात. जगण्यातला भ्रम, मोह, अज्ञान तेच दूर करतात. त्यांच्या आधारावर जगताना आणि त्यांचा बोध आचरणात आणताना मुक्तीचा मार्ग खुला होत जातो. मृत्यूनंतरची मुक्ती काय कामाची? शिष्यानं जगण्यात मुक्ती आणावी, असा सद्गुरूंचा ध्यास असतो. जगण्यातला भ्रम, मोह संपावा आणि निर्भयतेनं, निश्चिंतीनं, आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात जीवन सरावं, हाच त्यांचा हेतू असतो. त्यासाठी ते नाम देतात. उपासना देतात. बोध करतात. त्याला मी घट्ट धरून जगलं पाहिजे. त्यासाठीचा अभ्यास, प्रयत्न प्रामाणिकपणे केला पाहिजे. जर तसं झालं, जर आंतरिक मुक्तीची स्तिथी प्राप्त झाली, तर काय होईल, हे कबीरजी या रमैनीच्या शेवटच्या साखीत सांगतात. ती साखी अशी आहे- चिउँटी जहाँ न चढिम् सकै, राई ना ठहराय। आवागमन की गम नहीं, तहाँ सकलो जग जाय।। यात दोन रूपकं आहेत. एक ‘चिउँटी’ अर्थात ‘चिंटी’ म्हणजे मुंगी आणि दुसरं ‘राई’ म्हणजे मोहरीचा दाणा. मुंगी ही कुठेही जाऊ शकते, कुठेही तिला शिरकाव करता येतो. अगदी त्याचप्रमाणे मुंगीरूपी मन हे दशदिशांना सर्वत्र संचार करू शकतं. कुठवरही सहज पोहोचू शकतं. पण नामाने जी स्थिती प्राप्त होऊ शकते तिथे मनरूपी मुंगी स्वतच्या बळावर पोहोचू शकत नाही. अर्थात आपल्या मनानुसार प्रयत्न करून तुम्हाला ही स्थिती प्राप्त करता येणार नाही. त्याचप्रमाणे मोहरीचा दाणादेखील कुठेही जाऊन अलगद स्थिरावू शकतो. अगदी लहानशा छिद्रातही त्याला सहज शिरता येते. पण बुद्धीरूपी मोहरीचा दाणा हा नामाने जी स्थिती प्राप्त होते तिथे पोहोचू शकत नाही, स्थिरावू शकत नाही. अर्थात आपल्या बुद्धीनुसार प्रयत्न करून तुम्हाला ही स्थिती प्राप्त करता येणे केवळ अशक्य. ती स्थिती अशी आहे की जिथे एकदा गेलात की आवागमन म्हणजे येणंजाणंच संपतं. अर्थात जन्म-मृत्यूचं चक्रच उरत नाही. ती स्थिती अशी आहे की ‘तहाँ सकलो जग जाय!’ त्या स्थितीला पोहोचल्यावर जगच मावळतं. आता हे जग मावळणं आहे ते आंतरिक आहे. जगाचा माझ्या चित्तावर, मनावर, बुद्धीवर जो ताबा असतो तो ताबा उरत नाही. जगाबद्दलचा मोह आणि भ्रम यांची पकड संपते. मुक्ती यापेक्षा वेगळी काय असते?