मुळात स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापू यांच्या होळीचा चावटपणा विधिमंडळात चर्चेलाच यायला नको होता. रविवारी नागपुरात त्यांनी केलेला होळीचा तमाशा अपुरा म्हणून की काय, ते सोमवारी नवी मुंबईत तोच शो पुन्हा करणार होते. माध्यमांमधून टीका सुरू झाल्यावर बापूंनी आपणहून हा प्रकार थांबवायला हवा होता. आपण पारलौकिक जगात वावरतो, असे सांगणाऱ्या बापूंना लौकिकातील अशा होळीच्या आनंदात कोण रस! महाराष्ट्रावर या वर्षी आलेले दुष्काळाचे सावट त्यांना कळण्याची शक्यता नाही. तशी अपेक्षा करणेही गैर. त्यातून त्यांच्याकडे रोज लोंढय़ाने येणाऱ्या हजारो भक्तांपैकी कुणी बापूंना महाराष्ट्रदेशी आलेल्या अस्मानी सुलतानीची कल्पना देण्याची शक्यताही कमी. इथे नागरिकांना कित्येक दिवस पाण्याची वाट पाहण्यातच घालवावे लागतात, याची माहिती तरी त्यांना कशी मिळणार? रविवारी नागपुरात आपल्या दोन हातात, अग्निशामक दलाकडे असतात तशा आग विझवणाऱ्या किंवा जमावाला पांगवण्यासाठी वापरतात, तशा पाण्याच्या फवाऱ्यांच्या भल्या मोठय़ा पाइपमधून समोर जमलेल्या प्रचंड जनसमुदायावर जलवर्षांव केला, तेव्हा त्यांना आणि तिथल्या भाविकांना कोण आनंद होत होता. बापूंनी सोडलेले हे फवारे थंड पाण्याचे नव्हतेच मुळी ते तर दुष्काळाच्या आगीचे लोळ होते! पण बापूंनी साजरी केलेली होळी त्यांच्या भाविकांना केवढी तरी मन:शांती देत होती. त्या भाविकांनीच नागपुरात पाण्याचे अनेक टँकर्स विकत आणले होते. आठ-पंधरा दिवस पाण्यासाठी होरपळणाऱ्या लाखो मराठीजनांना असे विकतचे पाणी पुरवले असते, तर त्या आध्यात्मिक गुरूंना त्यांचे दुवे मिळाले असते. पण आपल्या कृतीचे समर्थन करत हे बापू या होळीसाठी वापरण्यात आलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी आपण आपल्या अंघोळीसाठी वापरतो, असे सांगू शकतात, यापेक्षा अधिक निर्लज्जपणा कोणता असू शकतो? नागपुरातील ‘शो’ यशस्वी झाल्यानंतर बापूंनी आपला मोर्चा नवी मुंबईतील ऐरोलीकडे वळवला. तिथेही पाण्याची अशीच नासाडी करण्याचा त्यांचा मनोदय सरकारच्या हस्तक्षेपामुळे फसला. एवढे झाल्यानंतर बापूंनी किंवा त्यांच्या शिष्यांनी त्याबाबत क्षमायाचना तरी करायची. पण तसे करण्याऐवजी पाण्याचा अपव्यय झालाच नाही, असे सांगत यापुढेही आपण होळीसाठी पाणी वापरतच राहू, असे सांगण्याएवढा उद्धटपणा त्यांनी दाखवला. तोही कमी पडला म्हणून आसाराम बापूंच्या कार्यकर्त्यांनी ऐरोलीमध्ये पत्रकारांवरही हल्ला करण्यास कमी केले नाही. भारतीय अध्यात्माचे खरे ज्ञान झाल्याचे हे निश्चितच लक्षण नाही. ज्यांना आपल्या जनतेचे दु:खच कळत नाही, ते आपल्या भक्तांच्या दु:खांचे हरण कसे काय करणार, असा प्रश्न कुणाही सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला पडणे स्वाभाविक आहे. राज्यातील दुष्काळी भागातील एकाही गावाचा प्रश्न गेल्या ५० वर्षांत न सुटलेल्या महाराष्ट्रातील जनतेला आधीच पाण्याच्या आगीने त्रस्त करून सोडले आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडणाऱ्या अशा आध्यात्मिक गुरूंना खरोखरीच भारतीय तत्त्वज्ञानाचे ज्ञान झाले आहे काय, असे वाटू लागते. केवळ पाण्यासाठी आपले घरदार सोडून वणवण करत हिंडणाऱ्या मराठीजनांचे हे दु:ख दूर करणे हे सरकारचे काम आहे, असे आसाराम बापू सांगू शकतात. पण तसे सांगताना आपण अंघोळीसाठीही अधिक पाणी वापरत असल्याचे सांगून जखमेवर मीठ चोळण्याचे तरी काय कारण होते? सतत आपल्या आचरट गोष्टींमुळेच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय झालेल्यांना अध्यात्म आणि तत्त्वज्ञान कशाशी खातात, हे तरी कसे कळणार?