एप्रिलच्या पहिल्या तारखेला कानावर पडणाऱ्या बातमीवर विश्वास न ठेवण्यातच शहाणपणा असतो, असा आपला अनुभवसिद्ध समज असल्याने, दोन-तीन दिवस या बातमीचीही फारशी चर्चा झालीच नाही. पण आता ती लपून राहिली, तर ती बातमीसुद्धा इतिहासजमा व्हायची शक्यता आहे. टपाल खात्याच्या तारेपाठोपाठ आता मनीऑर्डरसुद्धा इतिहासजमा झाली आहे. खरं म्हणजे, इतिहासजमा हा शब्दच योग्य नाही. ज्या गोष्टींची नोंद इतिहासाच्या कुठल्या तरी पानात होते, त्या गोष्टीला इतिहासजमा म्हणणे योग्य ठरते. तार बंद झाली, तेव्हा आपण उगीचच जुन्या आठवणींनी हळहळलो होतो. दाराशी तारेची घडी घेऊन उभा राहणारा पोस्टमन तेव्हा खरे म्हणजे मोजक्या मनांच्या आठवणीतच उरलेला होता. आता वर्षभरानंतर, तार नावाचा प्रकार आठवणीच्या कप्प्यातून पुसला गेलाय. मनीऑर्डरदेखील त्याच वाटेवरून जाणार अशा शंकेची पाल त्याच वेळी जुन्या मनांमध्ये चुकचुकली होती. माहिती तंत्रज्ञानाचा एवढा महाविस्फोट होत असताना, जगाच्या भौगोलिक सीमा क्षणार्धात ओलांडण्याचं आभासी तंत्रज्ञान झपाटय़ानं प्रगत होत असताना, ती जुनी मनीऑर्डर या काळाच्या वेगासोबत टिकाव धरणार नाही, हे तर ठरलेलंच होतं. ३१ मार्चला मनीऑर्डर नावाच्या त्या व्यवस्थेने अखेरचा श्वास घेतला. आता तो लांबलचक कागद पोस्टातून येणार नाही. दिवाळीच्या दिवसात, भावाकडून येणारी भाऊबीज आणि खुशाली कळविणाऱ्या, मायेनं विचारपूस करणाऱ्या, त्याच्या हस्ताक्षरातल्या त्या चार ओळीमधून थेट माहेरीच्या अंगणातल्या लहानपणीच्या भाऊबीजेच्या आठवणी जाग्या करणारा तो चतकोर कागदाचा तुकडा आता अदृश्य झाला आहे. तसाही एकूणच तो टपाली कारभार काळाच्या उदरात गडप होत चाललाच आहे. जुन्या पिढीनं नव्या स्थित्यंतरासोबत स्वत:ला आनंदाने जुळवून घेतलं आहे. टाइपरायटर नावाची वस्तू अँटिक म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात नावापुरती कुठे तरी शिल्लक असली, तरी कट्ट कडकट्ट करणारी ती तार केव्हाच थंडावली आहे. आता मनीऑर्डरचा तो फॉर्मही जुना झाला आहे. नव्या दमाचा, गतिमान असा पेपरलेस व्यवहार सुरू झाल्यानंतर मनीऑर्डरची गरजही संपलीच होती. गावाकडे म्याट्रिकची परीक्षा देऊन शहरात कॉलेजला जाणाऱ्या मुलाची महिन्याची खाणावळ आणि वह्य़ा-पुस्तकांचा खर्च भागविण्याच्या ओढीनं घरातून मुलाच्या होस्टेलवर धाव घेणारा हा शे-दीडशेच्या किमतीचा कागद आता इतिहासातूनही पुसला जाईल. कारण त्या रकमेलाच आता फारशी किंमत राहिलेली नाही. दीडशे रुपयांची मर्यादा असलेली मनीऑर्डर आजच्या काळाच्या दृष्टीने तशी शून्यच झाली होती. ती बंद झाली हे एका परीने बरेच झाले म्हणायचे. आणखी काही दिवसांनी तिच्या आठवणीही पुसल्या जातील. तारेसारख्याच!!
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2015 रोजी प्रकाशित
इतिहासाच्या पलीकडे..
एप्रिलच्या पहिल्या तारखेला कानावर पडणाऱ्या बातमीवर विश्वास न ठेवण्यातच शहाणपणा असतो, असा आपला अनुभवसिद्ध समज असल्याने, दोन-तीन दिवस या बातमीचीही फारशी चर्चा झालीच नाही.
First published on: 06-04-2015 at 12:35 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beyond history