27 May 2020

News Flash

विस्मरणांवर उभारलेला राष्ट्रवाद

मिल्खा सिंग भारताच्या सार्वजनिक विचारविश्वात २०१३ साली नव्याने अवतरले ते एका चित्रपटातून. हा निव्वळ योगायोग नव्हता..

| May 30, 2014 01:16 am

मिल्खा सिंग भारताच्या सार्वजनिक विचारविश्वात २०१३ साली नव्याने अवतरले ते एका चित्रपटातून. हा निव्वळ योगायोग नव्हता.. ‘भाग मिल्खा भाग’या चित्रपटाला खरे तर भारत-पाक फाळणीच्या रूपातील ठसठशीत विषमतांनी भरलेली दु:सह अन्यायांची सामाजिक, ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. या पाश्र्वभूमीची छाया   चित्रप्रतिमांमधून सांभाळतानाच तिला खुबीने धूसर बनवण्याची किमया या चित्रपटाने साधली आणि म्हणून तो ‘सामूहिक विस्मृतीं’वर बेतलेल्या राष्ट्रवादाचे महत्त्वाचे प्रतीक बनतो.
भाजपचा लोकसभा निवडणुकांमधला अविस्मरणीय विजय पुष्कळ राष्ट्रीय विस्मरणांशी जोडलेला आहे (अशी सोपी कोटी लेखाच्या सुरुवातीलाच करण्याचा मोह आवरला नाही.) परंतु जास्त गंभीरपणे बोलायचे झाले तर या विस्मरणांचा संबंध निव्वळ भाजपच्या किंवा मोदींच्या निवडणुकांमधल्या-निवडणुकांपुरत्या डावपेचांशी नाही. निवडणुकांच्या प्रचारात, निकालात आणि विजयात ठळकपणे पुढे आलेली ही विस्मरणे आकांक्षी मध्यमवर्गाच्या नव्या राष्ट्रवादाशी जास्त खोलवर, जास्त दूरगामी पद्धतीने जोडली गेली आहेत.
अगदी ताज्या विस्मरणांविषयी बोलायचे झाले तर निवडणूक निकालांपासूनच सुरुवात करावी लागेल. भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निम्म्याहून जास्त जागा मिळून जे घवघवीत यश मिळाले त्यात पक्षाच्या मतांचा वाटा किती होता? या प्रश्नाचे आपल्याला सोयीस्कर विस्मरण झाले आहे. राजकारणात या प्रकारची सोयीस्कर विस्मरणे होतच असतात असे आपण म्हणू. आपले पंतप्रधान पुष्कळ काळ पत्नीला विसरले आणि मतदार जातीय दंगलींच्या नव्या-जुन्या इतिहासाला. मोदींच्या शपथविधीत मिरवणाऱ्या सलमान खानवरील गुन्ह्य़ांचा इतिहास विसरला गेला तसेच नवाझ शरीफांना आमंत्रण देण्याच्या मोदींच्या मुत्सद्देगिरीत भारत-पाक चर्चाचा या पूर्वीचा गुंतागुंतीचा इतिहास विसरला गेला.
या प्रकारच्या ‘सामूहिक विस्मृती’ म्हणजे समकालीन भांडवलशाहीच्या परिघात साकारणाऱ्या सांस्कृतिक राजकारणाचे आणि नव्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे, असे विश्लेषण काही इतिहासकारांनी केले आहे. ‘पुढे चला’ हा भांडवलशाहीचा मंत्र असल्याने त्यात इतिहासाकडे पाठ फिरवली जाते. इतकेच नव्हे तर इतिहास, परंपरा इत्यादींचे रूपांतर मिथकात होऊन त्यांचे एक प्रकारचे सपाटीकरण घडवले जाते. भारतातदेखील १९९० नंतरच्या बदलत्या सामाजिक वास्तवात ही प्रक्रिया अनेक प्रतीकांच्या सरमिसळीतून उलगडत गेली आहे असे दिसते.
या प्रक्रियेचे सर्वात दृश्यमान प्रतीक म्हणून आताच्या हिंदी चित्रपटांची आणि त्यातही धावपटू मिल्खा सिंगांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाची आठवण प्रकर्षांने येते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातच ज्यांची क्रीडा कारकीर्द बहरली आणि संपली ते मिल्खा सिंग भारताच्या सार्वजनिक विचारविश्वात २०१३ साली नव्याने अवतरले ते एका चित्रपटातून. हा निव्वळ योगायोग नव्हता. आर्थिक उदारीकरणाच्या पर्वातल्या, वाढत्या आकांक्षी मध्यमवर्गाच्या स्वप्नांतून घडणाऱ्या आणि एकाच वेळेस आयपीएल, इंडियन आयडॉल, इंडियाज डान्सिंग सुपरस्टार आणि करोडपतींच्या रूपाने साकारत असलेल्या नव्या हीरोंच्या साकारणीत मश्गूल झालेल्या नव्या भारताचे (पडद्यावरचे आणि म्हणूनच हवेहवेसे) हीरो म्हणून मिल्खा सिंग ‘भाग मिल्खा भाग’मध्ये नव्याने अवतरले. त्यांच्या कहाणीत आणि मुख्य म्हणजे या कहाणीच्या फिल्मी कथनात नव्या, ‘विस्मृतींवर बेतलेल्या’ सांस्कृतिक राष्ट्रवादातील अनेक प्रतीकांची सरमिसळ झालेली दिसेल.
एक म्हणजे पडद्यावरील मिल्खा सिंग एकटे नव्हते. १९९० नंतर हिंदी चित्रपटात पडद्यावरच्या मैदानी विषयांची अचानकपणे एक गौरवशाली मालिका सुरू झाली. लगान, चक दे इंडिया, इक्बाल ही त्यातली काही इतर ठळक उदाहरणे. या चित्रपटांमध्ये एक समान दुवा होता, तो म्हणजे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या संदेशाचा. १९९० नंतरच्या बदलत्या सामाजिक वास्तवाशी हे सूत्र सुसंगत होते. इतकेच नव्हे, तर या सूत्राच्या प्रकटीकरणासाठी खेळाचा आधार घेणे हेदेखील नव्या सांस्कृतिक राष्ट्रवादात चपखल बसणारे होते. भारतीयांसाठी खेळ ही नेहमीच प्राधान्याने ‘प्रेक्षणीय’ बाब राहिली आहे. आयपीएलसारख्या प्रदर्शनीय सामन्यांमधून खेळांची प्रेक्षणीयता आणि मनोरंजकता आणखी वाढली. त्यातच या काळातील प्रसारमाध्यमांच्या वाढत्या आवाक्यातून, ग्राहक वादाच्या आक्रमक माऱ्यातून आणि आर्थिक-सामाजिक अस्थिरतेचा परिणाम म्हणूनही सांस्कृतिक राजकारणाचे स्वरूप एकंदरीतच उत्सवी बनले. पडद्यावरच्या क्रीडा स्पर्धा आणि त्यातली लुटुपुटीची प्रेक्षणीय हार-जीत या उत्सवीकरणात चपखल तर बसलीच, परंतु त्याही पलीकडे स्वत: जीवघेण्या सामन्यात सहभागी न होताच सामना जिंकण्याचा उत्सवी, दृश्यात्मक आनंद भारतीय प्रेक्षकांना मिळू शकला. आणि म्हणून मिल्खा सिंग आणि त्यांच्यासारखे काही काल्पनिक क्रीडापटू नव्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वाहक बनले.
पडद्यावरच्या या जय-पराजयाला सामूहिक विस्मृतींच्या आणखीही काही बाजू जोडल्या गेल्या आहेत. एक म्हणजे वास्तवातील कमालीच्या स्पर्धात्मक जीवनाशी ताळमेळ राखत पडद्यावरचे सामनेही स्पर्धात्मक बनतात. परंतु या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी न होतादेखील या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेक्षकांना मुभा असते. दुसरे म्हणजे खेळांचे काही नियम ठरलेले असतात आणि या नियमांच्या चौकटीतच खेळाडूंना वावरावे लागते. वास्तवातल्या अनागोंदी सामाजिक आणि विशेषत: राजकीय व्यवहारांना वैतागलेल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकांना ही नियमबद्धता सुखावह वाटते. या सुखावहतेचा आणखी एक पैलू म्हणजे पडद्यावरील खेळांचा होणारा हमखास विजयी, सुखान्त शेवट.  प्रत्यक्ष जीवनातल्या भ्रष्टाचाराचे, अपुरेपणाचे आणि अनिश्चिततेचे विस्मरण घडवून भांडवली स्पर्धात्मक जगात वैयक्तिक प्रयत्नांतून देदीप्यमान यश मिळवण्याचा एक प्रतीकात्मक संदेश या चित्रपटांनी प्रेक्षकांना दिला. तशीच आभासी, दृश्यात्मक प्रतीकांमधून जगावर स्वार होण्याची दोन-तीन तासांची संधीही मिळवून दिली. यंदाच्या निवडणुकीत ‘सोशल मीडिया’तून केल्या गेलेल्या राजकीय नेत्यांवरील गलिच्छ शेरेबाजीतही नेमकी हीच भावना डोकावते असे लक्षात येईल.
अधिक खोलवर पाहता, मिल्खांच्या जीवनकहाणीच्या फिल्मी कथनात सामाजिकतेचे आणि इतिहासाचेही अमूर्तीकरण आणि विस्मरण घडत गेले असे लक्षात येईल. ‘लगान’मधील आमिर खानने सत्तरच्या दशकात सामाजिक क्रांती घडवू पाहणारा ‘अँग्री यंग मॅन’ हीरो हद्दपार करून क्रिकेटसारख्या ‘जंटलमेन्स गेम’मधून क्रांती करू पाहणारा नवा हीरो घडवला. परंतु तरीही त्यात सामाजिक क्रांतीचा आशय आणि मुख्य म्हणजे सामाजिकता (तिच्यातील सर्व जातीय/वर्गीय ताण्याबाण्यांसकट अस्तित्वात होती. नंतरच्या टप्प्यावर ‘चक दे इंडिया’ने सामूहिकता आणि सामाजिकतेचा आशय काहीसा आणखी कृत्रिम बनवत शत्रुराष्ट्रावर (आणि जातीयवाद, अल्पसंख्याकांचे प्रश्न, स्त्रियांचे सक्षमीकरण, प्रांतवाद अशा अनेक प्रश्नांवर) झटपट मात घडवली.  या सर्व प्रवासात सामाजिकतेचा आशय आणखी विरळ बनवून व्यक्तिवादी, आकांक्षी राष्ट्रवादाला अधिक चमकदारपणे पेश करणारा चित्रटप्पा म्हणजे ‘भाग मिल्खा भाग.’ या चित्रपटाला खरे तर भारत-पाक फाळणीच्या रूपातील ठसठशीत विषमतांनी भरलेली दु:सह अन्यायांची सामाजिक, ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. या पाश्र्वभूमीची छाया चित्रप्रतिमांमधून सांभाळतानाच तिला खुबीने धूसर बनवण्याची किमया या चित्रपटाने साधलेली दिसते आणि म्हणून तो ‘सामूहिक विस्मृतीं’वर बेतलेल्या राष्ट्रवादाचे महत्त्वाचे प्रतीक बनतो. चित्रपटाच्या सुरुवातीला आपले दुखरे बालपण आठवून पाकिस्तानला जाण्याचे नाकारणारे मिल्खा सिंग चित्रपटाच्या शेवटच्या चौकटीत पाकिस्तानातील शर्यत जिंकून आपल्याच बालरूपाबरोबर मंद स्मित करत धावताना दिसतात. त्यांचा हा प्रवास नव्या भारताचा आणि विस्मृतींतून साकारलेल्या राष्ट्रवादाचा प्रवास आहे.
अन्याय्य, सामाजिक विषमतांच्या बजबजपुरीत आणि जात, धर्म, वर्ग (!) अशांसारख्या संकुचित अस्मितांमध्ये अडकलेल्या भारताला मागे टाकून मंद स्मितातून चमकणारा नवा आश्वासक भारत पडद्यावरील मिल्खा सिंगांच्या रूपाने उभा केला गेला आहे. या भारतात सामूहिकतेकडून व्यक्तिगत उत्कर्षांकडे स्पष्ट प्रवास आहे (आणि म्हणून या चित्रपटात सामूहिक खेळांऐवजी, धावपटूची निवड चपखल बसते), तसाच राष्ट्रवादाच्या जडणघडणीतील फाळणीची दु:सह ऐतिहासिकता टाळून फिल्मी परंपरेतील भारत-पाकिस्तानमधला सोपा संघर्ष (पाकिस्तानी धावपटू-प्रशिक्षक यांच्या रूपाने) ही प्रतीकात्मक, मिथ्यात्मक इतिहास म्हणून आहे.  ‘चक दे इंडिया’तल्या हरयाणा, पंजाब आणि झारखंडमधल्या मुली असोत वा गोविंदपुऱ्यातले मिल्खा किंवा इक्बाल किंवा कबीर खान, अली (काय पो छे) यासारखे मुसलमान असोत, चित्रपटातील पंडित नेहरू मिल्खा सिंगना सांगतात त्याप्रमाणे ‘स्वत:चे व्यक्तित्व; दु:ख आणि अन्याय्य इतिहास विसरून प्राणपणाच्या मेहनतीने राष्ट्राचा उत्कर्ष घडवण्याची आणि गतकाळ विसरून नव्या राष्ट्रवादात सामील होण्याची जबाबदारी या गटांवर आता सोपवली गेली आहे आणि राष्ट्रवादाचे ओझे बाळगण्याचीही!’
आपल्या निवडणुकांनंतरच्या नव्या राष्ट्रवादात ‘रील’ आणि ‘रीअल’ लाइफ हीरोंची सरमिसळ घडवून चित्रपटांचा वास्तवात जणू काही रिमेक घडतो आहे असे वाटल्याने पडद्यावरच्या मिल्खांची आठवण झाली इतकेच.
लेखिका पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून  समकालीन राजकीय घडामोडींच्या विश्लेषक आहेत.
उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2014 1:16 am

Web Title: bjp success in ls election nationalism of middle class in india based on oblivescence
Next Stories
1 उजवीकडे झुकलेली लोकशाही
2 अधिकारांचा अतिरेक
3 ‘त्यांच्या’ बायका, ‘त्यांची’ इभ्रत!
Just Now!
X