भाजपची नौका येडियुरप्पांमुळे नाही, तर शासनशून्यतेमुळे बुडाली, असा युक्तिवाद ‘शासनशून्यतेची शिक्षा’ या अग्रलेखात (९ मे) आहे. भाजपने शासनशून्यता दाखवली हे काही अंशी खरे असले तरी नौका बुडाली ती येडियुरप्पांमुळेच. जी आकडेवारी पुढे आली तीवरून असे स्पष्ट होते की, येडियुरप्पांमुळे ५१ जागी भाजपचे उमेदवार पडले. शिवाय खाणसम्राट रेड्डींमुळे नऊ ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. म्हणजे भाजपचे ४० + ५१+ ९ + ६(येडींचे) = १०६  म्हणजेच सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच सरकार स्थापनेचा दावा करू शकला असता.
 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार निवडून आले ते सर्व धुतल्या तांदळासारखे आहेत असेही नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा जनतेनेच दुर्लक्षित केला आहे हे भयंकरच आहे. या निवडणुकीत जसा भाजपचा तोटा झाला तसे येडियुरप्पांचा फुगाही फुटला, हे एका दृष्टीने बरेच झाले. एकटी व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती संघटनेपेक्षा कधीच मोठी होऊ शकत नाही हे खरे आहे, यासाठी अग्रलेखात दिलेले उदाहरण -कल्याणसिंह, उमा भारती, शंकरसिंह वाघेला यांचे जसे आहे तसेच अन्य पक्षातील अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. अन्य पक्षांत डाळ न शिजल्यामुळे कल्याणसिंह पक्षात परतले तसेच येडियुरप्पांचे झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे लक्षात घेऊन पक्षांतील धुरिणांनी अशा बेशिस्त नेत्यांना काही वष्रे तरी दूरच ठेवावे.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

शाहरुखची बाजू घेण्याची गरज काय?
वानखेडे स्टेडियमवर दारू पिऊन िधगाणा घातल्याबद्दल गेल्या वर्षी  शाहरुख खानवर मुंबई क्रिकेट संघटनेने पाच वर्ष प्रवेशबंदी घातली याबद्दल त्यांचे कौतुक करायचे सोडून संघटनेला एकाकी पाडण्याचा किळसवाणा प्रकार मध्यंतरी चालू झाला. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, इ. सर्वच पक्ष सामील होते. एवढा दबाव असूनही संघटनेने ही बंदी कायम ठेवली, हे अभिनंदनास्पद आहेच, परंतु या ठामपणावरून तरी शाहरुखचे त्या दिवशीचे वर्तन गंभीरच कसे होते, याचा अंदाज यावा.
विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, महत्त्वाचे म्हणजे नियम हे सर्वासाठी समान हवेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठीक आहे पण राज ठाकरे यांनाही शाहरुखचा पुळका यावा हे खरेच पचनी न पडणारे आहे. एरवी नेहमी पाकिस्तानविरोधी भूमिका घेणाऱ्या राज यांना शाहरुखचे पाक-प्रेम दिसत नसावे किंवा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले असेल. याच शाहरुखने आयपीएलच्या पहिल्या वर्षी पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट करून घेण्यासाठी पाच भारतीय खेळाडूंना रातोरात हॉटेलमधून हाकलले होते हे राज विसरले वाटते. तेव्हा शाहरुखसारख्या उद्धट आणि उर्मट धेंडांसाठी झगडण्यापेक्षा या नेते मंडळींनी दुष्काळग्रस्त जनतेसाठी कामे केली व त्यासाठी सरकारवर तुटून पडले तर त्याहून दुसरे चांगले काहीच नाही.
महेश मोरे, ठाणे</strong>

आपल्याच उलटय़ा बोंबा!
‘धगीचे वास्तव आणि जाणवणे’ हा अन्वयार्थ (१० मे) वाचला. त्यात वर्णिलेली परिस्थिती फक्त विदर्भातच नाही तर इथे मुंबईत- एवढा प्रचंड समुद्र असूनही जाणवत आहे! मी बोरिवली (पूर्व )येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला खेटून असलेल्या वसाहतीत गेली ३० वर्षे राहत आहे. त्या वेळी हे उद्यान खरोखरच एक निसर्ग उद्यान होते. आतासारखे काँक्रीटचे जंगल नव्हते! या वसाहतीतील टुमदार बंगले पडून तीन-चार मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. बंगल्याभोवतीचे बागबगीचे तोडून जास्तीत जास्त जागा बांधकामासाठी कशी वापरता येईल याकडे जास्त लक्ष दिले आहे. ज्या घरात ३० वर्षांपूर्वी उन्हाळ्यात भर दुपारी साध्या पंख्यांचीही गरज भासत नसे, तिथे आता एसीशिवाय बसवत नाही.
यावरून उन्हाळ्याच्या वाढलेल्या धगीला आपण स्वत:च जबाबदार असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते ,पण बोंबा मात्र आपण ग्लोबल वॉìमगच्या नावाने मारतो.  
डॉ. सुप्रिया तडकोड, बोरिवली

नक्षीदार पिंजऱ्यातले मितभाषी पोपट!
‘पोपट का झाला?’ हा अग्रलेख (१० मे) मर्मग्राही आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर यंत्रणा ही पिंजऱ्यातील पोपट झाला असल्याची बोचरी टीका केली असली, तरी केवळ गुप्तचर यंत्रणाच तशी नसून खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग हेदेखील त्याच उपमेला पात्र आहेत हेही मान्य केले पाहिजे. मनमोहन सिंग हे स्वत: शुद्ध चारित्र्याचे, निष्कलंक असल्याचे मानले जाते, परंतु हे वर्णन त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याआधीचे आहे. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यापासून त्यांना पोपटाचीच (पण, फक्त मितभाषी) भूमिका बजावावी लागली आहे. सर्वच यंत्रणा भ्रष्टाचाराने सडलेली असताना, एका मागोमाग एक प्रकरणे बाहेर येऊ लागली की बचाव करण्यासाठी वा त्यावर झाकणे घालण्यासाठी त्यांना आपल्या बुद्धिकौशल्याचा व वैयक्तिक स्तरावरील निष्कलंक चारित्र्याचा वापर करून बोलण्यासाठी पाचारण केले जात असेल तर त्यांनाही पिंजऱ्यातील पोपटाची उपमा लागू होत नाही काय?
दुसरी गोष्ट अशी की, कुठल्याही अस्सल शुद्ध चारित्र्याच्या, निष्कलंक व्यक्तीचे पावित्र्य, सत्त्व इतके उच्च कोटीतील असते की भोवतालच्या माणसांना तिच्या केवळ अस्तित्वाचीच भीती वाटत असते व एखादी क्षुल्लक अनुचित कृती करण्यासही मन कचरते. विद्यमान पंतप्रधानांबाबत अशी स्थिती मुळीच नसून तेही िपजऱ्यात बसूनच (त्यांचा पिंजरा आकाराने मोठा आणि नक्षीदार गज लावलेला आहे एवढाच फरक) आला दिवस ढकलीत आहेत, असे विषादाने म्हणावेसे वाटते.
विजय पाध्ये

बालनाटय़ात अश्लील विनोद, अंगविक्षेप!
‘छोटा भीम, शिंचॅनचा रंगमंचावरही धुडगूस’ या शीर्षकाच्या बातमीत (मुंबई व ठाणे वृत्तान्त, ८ मे) बालनाटय़ांवर केलेली टीका रास्त होती हे एका बालनाटय़ातून कळले. सदर नाटकामध्ये अतिशय अश्लील व असभ्य संवाद लहान मुलांच्या तोंडी दिलेले होते! या प्रकाराबद्दल खंत वाटली म्हणून हे पत्र. प्रयोगाच्या दुसऱ्या अंकाने बालनाटय़ाच्या सर्व मर्यादा ओलांडून लहान मुलांच्या तोंडी अश्लील विनोद व हातवारे/अंगविक्षेप देऊन मनोरंजनाचा नवा नीचांक गाठला. यामधील बालकलाकारांच्या तोंडी काही (खाली नमूद केलेल्या व्यतिरिक्तसुद्धा) संवाद सदर नाटकात आहेत. ‘प्रधानजीसुद्धा महाराणींसोबत विसावा घेतायत’ हे वाक्य किंवा महाराणी दरबारात आल्यावर ‘मला आत्ताच्या आत्ता वंशाचा दिवा हवा!’ या वाक्यानंतर काही वेळाने महाराजांनी राणीला ‘चला शयनगृहात!’ म्हणणे, पर्यावरणमंत्री या पात्राने  ‘मी झाड लावतोय व ते मोठे होईल’ हे म्हणत असताना स्त्रीदेहाचे उभार दाखविल्यासारखे अंगविक्षेप करणे, अन्नपुरवठामंत्री असलेल्या स्त्रीपात्राला महाराजांनी ‘हे कसले अन्नपुरवठामंत्री हे तर स्वत:च सगळे अन्न खाऊन टाकत असतील,’ असे म्हटल्यावर ‘अहो आज कॉस्च्युमवाल्याने ड्रेस टाइट बांधला आहे!’- त्यावर ‘मी तुमच्या पोटाबद्दल बोललो’ अशी वाक्ये.. बालनाटय़ाचे दिग्दर्शक व लेखक अशा संवांदातून नेमकी कुणाची करमणूक करताहेत याचा प्रश्न पडला. नाटय़गृहात आणखी एक गोष्ट जाणवली की, बालकलाकारांच्या तोंडी ‘असे’ विनोद ऐकून काही प्रौढ-प्रेक्षक हसत होते, आनंद घेत होते!
पहिल्या अंकात ‘शिंचॅन’ नावाच्या टीव्हीवरील कार्टून कॅरेक्टरचे वात्रट हावभाव, आई-वडील व शिक्षकांची टिंगल टवाळी करणे, आणि वडिलांना चक्क ‘टपलीत’ हाणणे असेच उद्योग करते. वात्रट आणि एकही चांगला गुण अंगी नसलेल्या शिंचॅनपेक्षा मुलांनी काही तरी चांगले बघावे हीच अपेक्षा घेऊन, स्वत:चा वेळ व पसा खर्ची करून, पालक आपल्या मुलांना बालनाटय़ दाखवतात, याचा बहुधा निर्माता-लेखक-दिग्दर्शकाला बोध नसावा.
कदाचित नाटकाची अखेर संस्कारक्षम(!) असेलसुद्धा, परंतु हा सारा प्रकार न आवडल्यामुळे दुसरा अंक संपण्याआधीच, मी कुटुंबीयांसमवेत नाटय़गृहातून बाहेर पडलो. तेव्हाच निश्चय केला की, बालनाटय़ असले तरीही दर्जा माहिती असलेल्या नाटक कंपनीच्या/दिग्दर्शकाच्याच प्रयोगांना जावे!
खरा विचार येतो तो सदर नाटकातील बालकलाकारांच्या आई-वडिलांचा, ज्यांना मुलांच्या  अभिनयगुणांचे कौतुक वाटत असेल. परंतु बालवयास न शोभणारे व बालमनावर दुष्परिणाम करतील अशा विनोदांचा समावेश असलेले नाटक लहान मुलांना घेऊन करणे म्हणजे बुद्धीचे बकालपण वाटते. स्त्री-शरीराबद्दलचे अंगविक्षेप वा स्त्रियांच्या चारित्र्याबद्दलची जी एकांगी प्रतिमा उभी केली आहे, त्याचे बालकांवर काय परिणाम होऊ शकतात हे या कलाकारांच्या पालकांना सांगायला नको.
सगळी बालनाटय़े ‘अशी’ नक्कीच नसतात. आत्तापर्यंत पाहिलेल्यापकी हे पहिलेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मनोरंजन म्हणून उथळ व मानवी सुप्त भावना चाळवणारे काहीही चालेल’ ही वृत्ती आता बालनाटय़ामध्येही शिरकाव करत असल्याची ही नांदी आहे असे वाटते.
– नितीन सोनावणे