पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यास देश संकटात येईल अशी टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने आज देशवासियांची केलेली घोर फसवणूक, पिळवणूक याकडे हेतुत दुर्लक्ष केले जात आहे.
गेल्या ५० वर्षांत काँग्रेसच्या राजवटीत कोटय़वधींचे  घोटाळे झाले; त्याने देशाचे नुकसान झाले ते जास्त घातक नाही का? कोळसाखाणींच्या मनमानी लिलावात देशाचे नुकसान झाले नाही काय? राष्ट्रकुल घोटाळ्यात भ्रष्टाचार करून देशाची बदनामी करणाऱ्यांचे काय? आदर्शसारख्या घोटाळ्यांत सार्वजनिक जागा हडप करणाऱ्यांना कोणती उपमा द्यायची? प्रत्येक महिन्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणारे काँग्रेसने जनतेला महागाईच्या खाईत लोटून सामान्य माणसांचे जिणे मुश्कील केले ते घातक नाही काय? वाढते दहशतवादी हल्ले, गुंडगिरी, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, सग्यासोयऱ्यांना सत्तेवर बसविणे, मूलभूत नागरी सुविधांपासून जनतेला वंचित ठेवणे यासारखी अनेक संकटे काँग्रेसने देशावर आणली आहेतच.
विठ्ठल शुक्ल, कोल्हापूर

कार्यक्षमता इथेही दिसावी..
‘हातेकर विरुद्ध वेळुकर- विद्यापीठातील वाद न्यायालयात’ ही बातमी (लोकसत्ता, ६ जाने.) वाचली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांनी आपली खुर्ची वाचविण्यासाठी मार्च २०१२ ला नितेश राणे यांचे उंबरठे झिजवून काय वा मुंबई विद्यापीठात इंग्रजी वाङ्मय विषयासाठी  (द्वितीय वर्ष कलाशाखा) अभ्यासाला असलेल्या ‘सच अ लाँग जर्नी’ या रोिहटन मिस्त्री यांच्या पुस्तकावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या राजकीय दबावाखाली तडकाफडकीने घेतलेल्या बंदीने काय.. आपण राजकीय छत्राखाली  काम करणार आहोत याची जाणीव करून दिली होतीच.
त्याचमुळे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांच्यावर विद्यापीठाने ज्या प्रकारे कारवाई केली ती सरळ नसेल हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतु त्यांनी ज्या तत्परतेने ही कारवाई केली त्याच तत्परतेने २०१२ पासून परीक्षेचे एकावर एक पेपर फुटत असताना त्याची जबाबदारी घेतली असती, तर विद्यार्थ्यांचे भले झाले असते. हातेकर यांना न्यायालयात न्याय मिळेल एवढी त्यांची बाजू स्वच्छ आहे. सध्या महाराष्ट्रात ‘आदर्श ’कारवाई असो वा विद्यापीठाचे हे प्रकरण असो- राहुल गांधी(!) व न्यायालय हेच कान उपटू शकतात वा न्याय देऊ शकतात असे चित्र दुर्दैवाने निर्माण झाले आहे असे वाटते.
प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>

खरा इतिहास जनतेसमोर आणावा
इंग्रजांनी भारताचा चुकीचा इतिहास लिहिला, इतिहासकारांनी शिवाजी महाराजांवर अन्यायच केला, अशी खंत नरेंद्र मोदी यांनी इतकी वर्षे थांबून आता रायगडावर का व्यक्त केली? त्यांना जर माहीत होते की, हा इतिहास चुकीचा आहे, तर त्याची वाच्यता त्यांनी आधी कधीच कशी काय केली नाही? जनतेसमोर खरा इतिहास का आणला नाही? ‘शिवाजी महाराजांनी सुरत लुटली’ असा इतिहास लिहून शिवरायांचा वर्षांनुवर्षे अपमान करण्यात आला, याची प्रचीती त्यांना रायगडावर गेल्यानंतर, तेथील जाहीर सभेतच कशी आली?
मोदींकडे गुजराती समाजाने शिवरायांना मदत केल्याच्या इतिहासाचे काही पुरावे असतील तर त्यांनी इतिहासतज्ज्ञांकडे ते सोपवून सुधारित इतिहास तयार करावा आणि ‘खरा इतिहास’ नव्या पिढीसमोर आणावा.
विवेक तवटे, कळवा.

संमेलने आशयापासून आवेशाकडे
‘साहित्य, समाज आणि साहेब’ हा अग्रलेख (६ जाने.) वाचला. वाहिन्यांच्या गदारोळात वृत्तपत्राने आता आशय असलेल्या बातम्यांची निवड चोखंदळ पणे करणे ही काळाची गरज आहे, ही गरज ओळखून लोकसत्ताने नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे वृत्तांकन आटोपशीरपणे केलेले जाणवले. साहित्य संमेलन हे साहित्यबाह्य गोष्टींसाठीच जास्त गाजते ही परंपरा यावर्षीही पाळली गेली. गेल्या काही वर्षांतील संमेलने , निवडणुका, अध्यक्ष, परिसंवादांचे विषय व त्याची मांडणी पहिली की हा प्रवास आशयापासून आवेशाकडे सुरू झाल्याचे जाणवते. आणि त्यामुळेच साहित्यिक, विचारवंत यांच्या व्याख्याही आता बदललेल्या आहेत आणि त्या नव्या पर्यावरणाला सुसंगत अशाच झाल्या आहेत.
राजकारणी मंडळींनी आपल्या साहित्यिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मनाचा कब्जा घेतल्यामुळे त्यांचा व्यासपीठावरील अनावश्यक वावर हा आता आपल्यला टाळता येईल असे वाटत नाही . संमेलनाचा प्रवास ही आता उत्सव ते उरूस ते जत्रा असा सुरू आहे. या सर्वाचेच  परिशीलन या अग्रलेखातून झाले आहे.
डॉ. केशव साठय़े, पुणे

साहित्यिकांच्या कण्याचे निदान
‘साहित्य, समाज आणि साहेब’ हा अग्रलेख वाचला. सवंग विनोदासाठी येताजाता तिरकस भाषेचा हिणकस वापर करणे हेच ज्यांचे चातुर्य, अशा चारोळीपटू साहित्यिकांना हा अग्रलेख नक्कीच झोंबेल. सत्तावडाच्या पारंब्यांना सासवडात लोंबकळलेली मंडळी एव्हाना हँगओव्हरमध्येच असतील. या अग्रलेखाने त्यांना आपल्या कण्याचे भान आले, तरी कऱ्हेत घोडे न्हाले म्हणायचे.      – पृथ्वीराज जाधव, आळंदी (देवाची), पुणे.

यामुळे तरी जाग येईल..
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रथम पृष्ठावर संमेलनाची बातमी नसल्याने चुकचुकल्यासारखे वाटले होते, त्याचा खुलासा ‘साहित्य, समाज आणि साहेब’ या अग्रलेखाने झाला. गेल्या काही वर्षांतील साहित्यसंमेलने ही कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त होत आहेत. अलीकडे संमेलनाच्या अध्यक्षपदावरून देखील वाद उत्पन्न होतात आणि धुरंधर राजकारण्यांना मागे टाकतील असे राजकारण रंगते. साध्य बदलले की साधनेही बदलतात असे म्हणतात. सध्याच्या साहित्यिकांचे साध्य हे पसा कमावणे जास्त आणि उत्तम साहित्य निर्माण करणे कमी असे झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून सरकारी अनुदानासाठी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना आमंत्रित, सन्मानित केले जाते. याचा साहित्याशी काय संबंध ?
चांगले साहित्य आणि दर्जेदार साहित्यिक निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावल्याचे हे परिणाम आहेत. २४ तास चॅनेल आणि सोशल मीडियाच्या युगात ते अधिक मंदावण्याची भीती वाटते. त्या मुळे अशा निरुपयोगी संमेलनाच्या भरघोस वृत्तांकनाची प्रथा मोडीत काढल्याबद्दल लोकसत्ताचे अभिनंदन ! कदाचित त्या मुळे तरी खऱ्या साहित्यिकांना आणि साहित्यप्रेमींना जाग येईल.   
उमेश मुंडले, वसई

शैक्षणिक उकिरडय़ांची उंची, व्याप्ती वाढतेच आहे..
मुंबई विद्यापीठातील प्रा. नीरज हातेकरांच्या निलंबनाची बातमी वाचली. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण योग्य रीतीने उचलून धरले आहे असे जाणवले. ‘शैक्षणिक उकिरडे’ हे ४ एप्रिल २०१२ चे संपादकीय अजून स्मरणात आहे. या उकिरडय़ांची उंची, व्याप्ती आणि दरुगध दिवसेंदिवस पसरतच चालला आहे. सध्याच्या व्यवस्थेत विद्यापीठाच्या एकूण कार्याची व कुलगुरूंच्या पात्रतेची, त्यांच्या कार्याची व कार्यपद्धतीच्या अंतर्गत मूल्यमापनाची तरतूद नाही. ती करण्याची जबाबदारी मुख्यत्वे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी आवश्यक असणारी अर्हता प्राप्त नसताना तशी ती आहे असे भासवल्याचा आरोप विद्यमान कुलगुरूंवर आहे व हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
हे आणि इतर अनेक गरव्यवहार उजेडात आणणाऱ्या प्रा. हातेकर यांच्याविरुद्धच नियमबाह्य कारवाई होऊ शकते याचे कारण पात्रता नसताना प्राध्यापकपदी किंवा कुलगुरूपदी आपल्याच मर्जीतील व्यक्ती बसली पाहिजे असे मानणाऱ्या राजकारणी वर्गाच्या व त्यांच्या आडोशाने/ मर्जीनुसार काम करणाऱ्या निवड समितीतील तथाकथित एक्स्पर्ट लोकांच्या मनोवृत्तीत आहे. हे नेहमीच घडते असे नाही, पण घडतच नाही असेही नाही. अपात्र असूनही आपल्याच मर्जीतील व्यक्ती प्राध्यापक किंवा कुलगुरू झाली पाहिजे, असा हट्ट धरणारे उच्चपदस्थ बाहुबली नंतर कसे प्रेशर आणू शकतात हे एक उघड गुपित असते.
बाहुबलींच्या प्रेशरखाली काम करताना आपण मंत्रालयातील आणि राज्यपाल महोदयांच्या कार्यालयातील योग्य त्या व्यक्तींना सांभाळून आपल्या कारकिर्दीत राष्ट्रपती / राज्यपाल / मुख्यमंत्री किंवा तत्सम व्यक्तीच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ किंवा एखादा चमकदार कार्यक्रम करून त्या जोरावर पाच वष्रे टिकून राहिले पाहिजे, असा नवा पायंडा महाराष्ट्रातील विद्यापीठात पडू लागला आहे की काय ही शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 प्राध्यापकांची मुस्कटदाबी आणि अवहेलना करणाऱ्या व अनेक नियमबाह्य़ गोष्टी करणाऱ्या कुलगुरूंच्या सुरस कहाण्या जवळपास प्रत्येक विद्यापीठात ऐकायला मिळतात. मुद्दा हा एका नीरज हातेकरांचा नसून भ्रष्ट व्यवस्था बदलण्याचा व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक प्राध्यापकांच्या मुस्कटदाबीचा आहे. जोपर्यंत विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी एकत्र येऊन विद्यापीठ व्यवस्थापन आतून बदलण्याचा प्रयत्न करीत नाहीत, तोपर्यंत विद्यापीठांची मनमानी चालूच राहील; परंतु विद्यापीठातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणे समाजाला परवडणारे नाही.  
– प्रा. शरद देशपांडे (टागोर फेलो,
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी, शिमला)