श्रीसद्गुरूंनी जवळ आश्रय दिला, त्यांच्या चरणांवर पूर्ण भावानिशी मी समर्पित झालो, त्या सहवासानं जे ज्ञान झालं ते जगात उमटण्याआधी माझ्या पूर्ण आचरणात आलं; इथवरची प्रक्रिया तुकाराम महाराज यांनी सांगितली. इथे त्यांनी एक शब्द वापरला आहे, घेतले ते अंगी लावूनिया! जे ज्ञान जगात उमटलं ते मी अंगाला लावून घेतलं. काही पहेलवान आखाडय़ात उतरताच अंगाला माती लावून घेतात, कारण याच मातीत ते प्रतिस्पध्र्याला चीत करतात किंवा याच मातीत चीत होतात. माती हीच त्यांचा आधार असते. बैरागी अंगाला राख लावून घेतात. जगाची, भौतिकाची आसक्ती जाळून टाकली आहे आणि त्या आसक्तीची राख अंगी फासली आहे, ही भावना त्यामागे असते. ही राखच जणू त्यांच्या जीवनध्येयाची स्मरणी असते. तसं जे ज्ञान दुसऱ्याला सांगावं, ते आधी मी अंगी लावलं. अंगोपांगी मुरलं, हाडीमांसी रुजलं, रोमारोमांत भिनलं, असं तुकोबांना म्हणायचं आहे. इथवर साधलं की नंतर येते ती या अभंगाची फलश्रुती! ही फलश्रुती अभंगाच्या दुसऱ्याच चरणात नमूद आहे. आपण पाहात आहोत तो अभंग आहे- ‘‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।।२।। आनंदें दाटली तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला।।२।।’’ मी माझ्या डोळ्यांनी माझ्या मरणाचा अनुपम्य असा सोहळा पाहिला! हे देहबुद्धीचं मरण कशानं साधलं तर ‘‘नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।। ५।। तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं। घेतले ते अंगी लावूनियां।। ६।।’’ ही प्रक्रिया साधल्यानं देहबुद्धीचं मरण साधलं. देहबुद्धीची आत्मबुद्धी झाली. मग हे मरण साधल्याची फलश्रुती काय? तर ‘आनंदें दाटली तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला!’ या चरणाचा विशेष अर्थ काय असावा, हे आपण थोडय़ा विस्तारानं पाहू, पण त्याआधी काही साधक एका शंकेनं अतिशय अस्वस्थ झाले आहेत तिचं निराकरण करू. सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय वेदान्त बोलू नये, दुसऱ्याला ज्ञान सांगायला जाऊ नये, असा उल्लेख झाला. आता हा सल्ला कुणाला आहे? जो सद्गुरूच्या नित्य सहवासात आहे, सर्व भावानिशी त्यांना समर्पित आहे, त्यांच्याकडून ज्याला शुद्ध ज्ञान थेट प्राप्त झालं आहे, अशाला हा सल्ला लागू आहे. जो त्यांच्यात पूर्ण मिसळून गेला आहे त्याला तर सल्ल्याची गरजच नाही. पूर्ण मिसळून जाण्याच्या आधीच्या पायरीवर जो उभा आहे, तो या पायरीवरून घसरू नये, यासाठी त्याला हा सावधगिरीचा सल्ला आहे. आता आपण काही त्या पायरीवर गेलेलो नाही आणि आपल्याला महाराजांशिवाय काही बोलल्याशिवाय चैन पडत नाही, अशी स्थिती असेल तर बोलावं. ते बोलण्यात अभिनिवेश नसावा, दुसऱ्यावर सक्ती नसावी, वादाचा रंग आणू नये, सांगण्यात आणि ऐकण्यात जोवर गोडी टिकून आहे तोवरच बोलावे, स्वत:ला ज्ञानी मानून बोलू नये, तर बोलण्याच्या निमित्तानं त्यांच्या बोधाची उजळणी होत आहे, हा भाव असावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण निमित्त आहोत, हा भाव असावा. आपण माध्यम आहोत, हा गैरसमज कदापि शिवू देऊ नये. मग बोलायला हरकत नाही!
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2013 रोजी प्रकाशित
चैतन्य चिंतन १७२: देहबुद्धी ते आत्मबुद्धी
मरणाचा अनुपम्य असा सोहळा पाहिला! हे देहबुद्धीचं मरण कशानं साधलं तर ‘‘नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं
First published on: 02-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 172 external knowledge to internal knowledge