माझ्या हिताचं तेच होऊ द्या, अशी प्रार्थना आपण श्रीमहाराजांना करतो, पण प्रत्यक्षात आपल्या हिताविरुद्ध जे आहे त्याचीच आपल्याला ओढ असते. त्यामुळे हिताचं होऊ द्या, अशी प्रार्थना करतानाच, माझ्या मनासारखं होऊ द्या, असाही छुपा सूर आपण लावत असतो. विकारांच्या पकडीतून सुटण्यासाठी आपण साधना करत असतो, पण प्रत्यक्षात विकारांची, इच्छांची पूर्ती व्हावी या हेतूनं साधनेचा सौदाही करू लागतो!  ‘महाराज, मी इतकं नाम घेतो, मग माझी इच्छा पूर्ण करा’, ही सौदेबाजी झाली. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या बोधात एकही कठोर शब्द सापडायचा नाही. कुणाचंही अंत:करण दुखवायचं नाही, हे एक व्रत त्यांनी देह ठेवेपर्यंत सांभाळलं. त्यामुळे त्यांच्या बोधातला शब्दन् शब्द प्रेमानं, मायेनं ओथंबलेला आहे. पण आमच्या नामाच्या सौदेबाजीच्या वृत्तीवर टीका करताना श्रीमहाराजांना कठोर झाल्याशिवाय राहावत नाही. कारण नामाइतकं त्यांचं कशाहीवर प्रेम नव्हतं. त्यामुळे आमच्या या वृत्तीवर टीका करताना श्रीमहाराज म्हणतात, ‘‘आपण नामस्मरण ‘करतो’, पण ते कसे? एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर राहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला, दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले; तसे आपण नाम घेतो, पण त्याचा उपयोग दास्यत्व वाढविण्यासाठीच आपण करतो’’(चरित्रातील नामविषयक वचने, क्र. १). या बोधवचनाचा रोख असा की, भौतिकातल्या वस्तूंमधली आसक्ती जपत त्या आसक्तीच्या आड काही येऊ नये, म्हणून आपण नाम घेतो, साधना करतो. त्या साधनेच्या जोरावर मग त्या आसक्तीच्या पूर्तीकडे डोळे लावून बसतो. मग यावर उपाय काय? उपाय एकच, नाम घेणे! आपण कोणत्याही हेतूने का होईना, नाम घेत असलो तर नामच आपल्यात पालट घडवील. श्रीमहाराज सांगतात, ‘‘विषयाचे विष मन पीत असल्यामुळे त्यासाठी आतून निर्माण होणारेच औषध पाहिजे. असे औषध म्हणजे नाम. मनाने भगवंताचे नाम घेतले तर आतून दुरुस्ती होईल’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ३७). हे नाम घेत गेलं की पहिल्या पातळीवर आपल्यातले अवगुण कळू लागतील, पण ते दूर करता येणार नाहीत. आपले विकार नष्ट करणं आपल्या ताकदीबाहेरचं काम आहे, आपल्यातील वाईट गोष्टी, वाईट सवयी दूर करणं आपल्या आवाक्यात नाही, हे जाणवू लागेल. पण हे जाणवून निराश होऊन साधनच सुटू नये, यासाठीही सावध राहिलं पाहिजे. श्रीमहाराजांना म्हणावं, ‘महाराज, मी आहे हा असा आहे. स्वत:ला बदलणं माझ्या आवाक्यात नाही. ते तुम्हीच पहा. तुम्ही दिलेलं नाम मात्र निदान तोंडानं घेत राहाणं माझ्या आवाक्यात आहे. तेवढं नेटानं करायचा मी प्रयत्न करणार.’ एकदा हा निश्चय झाला की मग प्रसंग कसाही येवो, आपल्याकडून नाम सुटू नये, यासाठी सावध राहण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘सावधानता ठेवून नाम घ्यावे. नामाची सतत धार धरावी म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ३६).