चित्तशुद्धीनेच योग साधतो. त्या चित्ताच्या चार अवस्था स्वामी विवेकानंद सांगतात आणि त्यानुसार मनाच्याही चार अवस्था निर्माण होतात, असं स्पष्ट करतात. या चार अवस्था म्हणजे क्षिप्त (विखुरलेले), मूढ (तमाच्या अंध:काराने झाकोळलेले), विक्षिप्त (एका जागी साचलेले) आणि एकाग्र (लक्ष्यासाठी केंद्रित झालेले). याचं स्वामीजींनी विवरण केलेलं नाही, आपण ते पाहू. क्षिप्त अवस्थेत मन हे द्वैतभावानं सर्वत्र विखुरलं असतं. नेमकं काय करावं, याचा निर्णय ते घेऊ शकत नसतं. मूढ अवस्थेत मन तमोगुणी बनते. स्वार्थ साधण्याचा त्याचा हेतू पक्का असतो आणि त्यापायी दुसऱ्याचं अनिष्ट करायलाही ते मागेपुढे पाहत नाही. विक्षिप्त अवस्थेत मन हे एका जागी जमा होते, केंद्राकडे अर्थात सत्याकडे, ज्ञानाच्या उगमबिंदूकडे जाण्याचाही प्रयत्न करते, पण या अवस्थेत वास्तविक ज्ञान असतेच असे नाही. त्या मनाला जे ‘सत्य’ वाटतं त्यासाठीच ते हट्टाग्रही बनते. त्यामुळेच आपल्या ध्येयासाठी अचानक आपलं आचरण, जीवनशैली बदलणारा माणूस दुसऱ्याला विक्षिप्तच वाटतो! पण जेव्हा हे विक्षिप्त मन योग्य अशा, वास्तविक ज्ञानाने प्रेरित अशा ध्येयासाठी एकत्र होते त्यालाच एकाग्र अवस्था म्हणता येईल. मानवी जन्माचं सर्वोच्च ध्येय पूर्णत्वप्राप्ती हेच आहे. त्यामुळे पूर्णत्वासाठी चित्त एकाग्र करणे, हाच योगाचा खरा हेतू आहे. ‘योग’ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ‘युक्त होण्याची कला’ अर्थात ‘युक्ती’. प्रत्येक धर्म, प्रत्येक साधनापंथ जिवाला परमशक्तीला शरण जाण्याचीच युक्ती अर्थात योग सांगत असतो. आता ‘योगानं जे साधतं तेच नामानं साधतं’, असं श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात तिथे मात्र योगशास्त्रानुसार जो योग आहे, तोच त्यांना अभिप्रेत आहे. या योगाची आठ अंगे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही बहिरंग साधनं आहेत. म्हणजेच या पाच योगांगांच्या आचरणात बाह्य़, स्थूल देहाचा सहभागही प्रधान असतो. त्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधनं आहेत. यात साधक अंतरंगात उतरतो. आंतरिक सूक्ष्म शक्तीच्या योगे तो पूर्णत्वापर्यंतचा प्रवास करतो. जिथे स्थूल देहाचा संबंध आला तिथे देहबुद्धी मोठा अडसर उत्पन्न करील, हे ओघानंच आलं. त्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पाच बहिरंग साधनांत देहबुद्धी अनेकदा खोडा घालण्याचा प्रयत्न करते. तरीही साधक चिकाटीनं, सातत्यानं, दृढपणानं साधना करीतच राहिला तर त्याची देहबुद्धी आपोआप क्षीण होऊ लागते. देहबुद्धीचा जसजसा निरास होतो तसतशी स्थूल बुद्धीची जागा सूक्ष्म प्रतिभाशक्ती, प्रज्ञाशक्ती घेऊ लागते. साधक अत्यंत अंतर्मुख होत जातो. त्यातूनच धारणा साधते. त्यातूनच ध्यान ही सहजक्रिया घडते आणि त्यामुळेच ज्ञानातीत अशी समाधी अवस्था लाभून योगी अखंड समाधानानं जगात वावरू लागतो. त्याचा देह तोच असतो, पण देहधारी  खऱ्या अर्थानं मुक्त, निर्भय, स्वतंत्र झाला असतो.