News Flash

१२०. संकल्पचक्र

प्रत्येक क्षणात आपल्या मनात अनंत इच्छा उमटत असतात. त्यांचा ठसा आपल्या वासनात्मक देहावर उमटतोच आणि त्यानुसारचा जन्मही लाभतो. म्हणजेच जन्म-मृत्यूचा हा खेळ अविरत सुरू राहतो.

| June 19, 2013 12:01 pm

प्रत्येक क्षणात आपल्या मनात अनंत इच्छा उमटत असतात. त्यांचा ठसा आपल्या वासनात्मक देहावर उमटतोच आणि त्यानुसारचा जन्मही लाभतो. म्हणजेच जन्म-मृत्यूचा हा खेळ अविरत सुरू राहतो. ‘राधास्वामी सत्संगा’चे हुजूर बाबा सावनसिंहजी महाराज (१८५८ ते १९४८) यांच्या साधकांशी झालेल्या काही संवादांचे संकलन दर्याईलाल कपूर यांनी केले आहे. त्यात श्रीसावनसिंहजी महाराज सांगतात, ‘‘या संसारातील आमच्या इच्छा-आकांक्षाच आमच्या जन्म आणि पुनर्जन्मास कारणीभूत होतात. निसर्गाचा नियम असा आहे की, ‘जे मागाल ते मिळेल.’ आमचे जीवन आमच्या इच्छा आणि आकांक्षा यानुसार घडले जाते. ज्या ज्या इच्छा आपण करतो, निसर्ग त्या पूर्ण करण्याची व्यवस्था करीत असतो. आपला जन्म, जन्मस्थान, परिवार आणि ज्या वातावरणात आम्हाला जन्म घ्यावा लागतो ते वातावरण इत्यादी सर्व सतत या नियमानुसारच घडत आलेले आहेत. ‘जेथे आस तेथे वास’. आमच्या इच्छा जेथे असतात त्या ठिकाणी आम्ही खेचले जातो. सांसारिक वस्तूंच्या प्रती असलेली आमची आसक्ती आणि प्रेम हेच आम्हास पुन:पुन्हा या संसारात खेचून आणतात. आमचा मोह आणि प्रेम जितके तीव्र तितक्याच तीव्रतेने आम्ही इच्छित वस्तू प्राप्त करतो. आमच्या इच्छा अवश्य पूर्ण होतील. पण त्या या जन्मातच पूर्ण होतील असे नाही. असेही होऊ शकते की, काही विशेष इच्छा या जन्मात पूर्ण होण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल नसते. अशा वेळी त्या इच्छा आमच्या अंत:करणावर उमटतात आणि निसर्ग त्या पूर्ण करण्याची व्यवस्था करू लागतो. परंतु त्या पूर्ण करण्याकरिता वेळ पाहिजे. आमची कामना कशा प्रकारची आणि किती तीव्र किंवा साधारण आहे यावरही तिची पूर्तता होणे अवलंबून असते. आमचे सध्याचे शरीर ती इच्छा पूर्ण करण्यास योग्य नसेल तर आम्हास आमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, असा दुसरा देह दिला जातो. समजा एखाद्या विवाहित तरुणीचा अपत्याविना मृत्यू झाला. आयुष्यभर ती संतानप्राप्तीसाठी प्रार्थना करीत होती आणि त्यामुळे तिच्या या तीव्र इच्छेचा ठसा मरताना तिच्या अंत:करणावर उमटून राहिला. आता निसर्ग तिला असा देह प्रदान करील की त्या देहात ती दर सहा महिन्यांत एकावेळी सहा-सहा पिल्लांना जन्म देत राहील. निसर्ग मोठा निर्दयी आणि कठोर आहे. त्याच्या दृष्टीने शरीर आणि रूप यांना काहीच महत्त्व नाही. तो केवळ इतकेच पाहतो की अंत:करणावर कोणत्या प्रकारच्या इच्छा उमटल्या आहेत आणि त्या कोणत्या देहाद्वारे पूर्ण होतील. आमच्या अंत:करणावर उमटलेल्या या इच्छा प्रत्येक जन्मात आमच्या बरोबर जातात.. ध्यानात ठेवा, जिवाला आपल्या अपूर्ण लालसा योग्य रीतीने पूर्ण करता येतील असाच देह निसर्ग त्यास देत असतो. मनुष्य जन्मात जिवाच्या इच्छा आणि लालसा पशुसमान असल्या तर त्याला अधोगत होऊन पुढील जन्म पशुयोनीत मिळेल.’’ (संत-समागम, पृ. १५९ ते १६१). तेव्हा प्रत्येक क्षण कृती किंवा संकल्पात सरत असतो आणि त्याच्या सरण्याचं आणि परिणामांचंही भान आपल्याला नसतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 12:01 pm

Web Title: chaitanya chintan resolution cycle
Next Stories
1 ११९. संकल्पांचं जाळं
2 ११८. अनवधान
3 ११७. क्षणवास्तव
Just Now!
X