आपण जर आपल्या भगवंताचेच कार्य करू पाहात आहोत तर भगवंताने आपल्याला शक्ती द्यावी, असे  गैर काय, असं साधकाला हळुहळू वाटू लागतं. एवढंच नव्हे! आपल्यात काही शक्ती आल्याही आहेत, असा भ्रमदेखील त्याला होतो. आपण बोलतो ते खरं होतं, या भ्रमातून मग आपल्या बोलण्याकडे लोकांनी गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे, असं त्याला वाटू लागतं. या वाटण्याचं रूपांतर हट्टाग्रहात होऊ लागतं. श्रीमहाराज सांगतात की, ‘‘परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात, असे काही माणसांना वाटते. पण अमुक एका देहामार्फतच लोककल्याण व्हावे, अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामथ्र्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग?’’ एका प्रसंगाचा आशय आठवतो. यातील श्रीमहाराजांच्या तोंडचे शब्द तसेच होते, असे नाही. पण त्यांचा रोख आणि आशय तोच होता, हे लक्षात घेऊन हा प्रसंग पाहू. एकदा श्रीगोंदवलेकर महाराजांकडे एका दृष्टिहीनासह काहीजण आले. ते सर्वजण गुलाबमहाराज यांना मानणारे होते व ‘ज्ञानेश्वरी’चे उपासक होते. त्या दृष्टिहीन साधकाचे सर्वानीच कौतुक केले आणि श्रीमहाराजांना प्रार्थना केली की, यांना ‘ज्ञानेश्वरी’ स्वत: वाचावी, असे फार वाटते. यांना त्यापुरती तरी दृष्टी यावी, अशी आपण कृपा करावी. श्रीमहाराज हसले आणि बोलले, ‘अहो असे चमत्कार मला साधत नाहीत. पण तुम्ही ज्यांना मानता ते गुलाबराव महाराजही दृष्टिहीनच तर होते. तरीही त्यांच्याइतकी ज्ञानेश्वरी कुणी वाचली नसेल! आणि दुसरी गोष्ट अशी की ‘ज्ञानेश्वरी’ वाचण्यापुरती दृष्टी कदाचित भगवंताच्या कृपेने लाभेलही. पण त्यानंतर दुसरं काही बघण्याची ओढ मनात उत्पन्न होणार नाही कशावरून?’ तेव्हा भगवंताने आपल्याला लोककल्याणार्थ शक्ती द्यावी, अशी इच्छा वरकरणी कितीही चांगली भासत असली तरी त्या शक्तीच्या गैरवापराचा मोह होणार नाही कशावरून? मग अशी शक्ती देणं म्हणजे लहानाच्या हाती तलवार देणंच आहे. लोककल्याण ज्याला साधायचं आहे त्यानं आत्मकल्याण आधी साधून घेतलं आहे का, हे महत्त्वाचं आहे. ते साधल्याच्या दोन खुणा आहेत. पहिली म्हणजे निस्वार्थीपणा आणि दुसरी म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी टिकणारं भगवंताचं अनुसंधान. या दोन्हीचा प्रत्यय कसा यावा? तर जग कसंही असलं आणि कोणी कसंही वागलं तरी मनाला दुखं न होणं! महाराज सांगतात, ‘‘तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.’’ आता बाहेर काय परिस्थिती आहे? राजकारण काय, समाजकारण काय आणि आता मनाला निकोप करणाऱ्या खेळातसुद्धा किती अनाचार, दुराचार माजला आहे. मग आपल्याच मनात वाईट आहे म्हणून या गोष्टी वाईट दिसतात का? मी सुधारलो तर भ्रष्टाचारी लगेच सुधारेल, असं घडेल का?