आठ दिवसांपूर्वीचा प्रसंग असेल. भारताची जर्सी परिधान केलेल्या १५ जणींचा संघ मरिन ड्राइव्हवरून क्रिकेटचे किट घेऊन सरावासाठी निघाला. हॉटेलपासून ब्रेबॉर्न स्टेडियमपर्यंत या महिला खेळाडू चालतच गेल्या. पंचतारांकित सुविधा भोगणारे पुरुष संघाचे खेळाडू एकीकडे तर दुसरीकडे अशा उपेक्षित अवस्थेतील महिला खेळाडू. दोघांचा खेळ एक, पण सोयीसुविधांत टोकाचे अंतर. अगदी भारतातील सामाजिक स्थितीप्रमाणे. भारताच्या पुरुष संघातील एखादा खेळाडू रस्त्यावरून जात असला की त्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी होते. पण या महिला खेळाडूंना कुणी ओळखले नाही किंवा कुणी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिलेसुद्धा नाही. कारण एकच. दोन्ही संघांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सामन्यांची संख्या. पुरुष खेळाडूंची दमछाक होईल एवढे सामने वर्षभर आयोजित केले जातात. ट्वेन्टी-२०, एकदिवसीय, चार किंवा पाच दिवसांचे सामने अशा अनेक सामन्यांच्या आयोजनामुळे त्यांना भरपूर अनुभव व प्रसिद्धी मिळते. वर्षभर एखाद्या क्रिकेटपटूला पाहून चाहत्यांमध्ये त्याची ओळख, प्रतिमा तयार होते. याउलट महिला खेळाडूंसाठी रणजी, आंतरविभागीय सामनेही अपेक्षेइतके होत नाहीत. अखिल भारतीय स्तरावरील एक-दोनच स्पर्धा खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंची ओळख तरी कशी होणार? परंतु, महिला विश्वचषक दरम्यान भारतीय संघाचा खेळ पाहून चाहत्यांनीही कौतुकाने मान डोलावली. सलामीच्या सामन्यांतील त्यांची तयारी पाहून पुरुष संघाऐवजी महिला क्रिकेटलाच प्राधान्य द्यायला हवे, असेही उद्गार निघू लागले. सोयी-सुविधांचा अभाव या तरुणींच्या खेळात जाणवला नाही. उलट पुरुषांपेक्षा जास्त जोश दाखवीत या तरुणी खेळल्या. स्वतंत्र राष्ट्रीय संघटनेकडून धनाढय़ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे महिला क्रिकेटची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर तरुणींना भरपूर संधी व सोयी-सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र महिला क्रिकेटच्या विकासाबाबत आजही खूप उदासीनता दिसून येते. पुरुष गटाकरिता रणजी सामने आयोजित केले जातात.  रणजी सामन्यांचा एक मोसम खेळणाऱ्या खेळाडूला कमीत कमी आठ ते दहा लाख रुपयांची कमाई होते. महिलांना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येदेखील तेवढी कमाई होत नाही. फिजिओ, प्रशिक्षक, अव्वल दर्जाचे प्रशिक्षण, परदेशी संघांबरोबर खेळण्याची संधी, जाहिरातबाजी, प्रायोजकत्व आदी सुविधांबाबत पुरुष खेळाडूंच्या तुलनेत भारताच्या महिला खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात आहे. महिला क्रिकेटला प्रसिद्धी मिळत नाही, ते लोकप्रिय नाही व त्यामुळे प्रायोजक मिळत नाहीत असे सांगितले जाते. सुदैवाने यंदाच्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या प्रक्षेपणादरम्यान कमी प्रमाणात का होईना, पण जाहिराती दिसत आहेत. पुरुषांच्या रणजी किंवा इराणी करंडक स्पर्धाच्या तुलनेने महिला क्रिकेटला प्रेक्षकांनी चांगली हजेरी लावली. या मुली पराभूत झाल्या असल्या तरी मनापासून खेळल्या. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कप्तान मिताली राज हिला अश्रू आवरत नव्हते. खेळाबद्दलची त्यांची बांधीलकी यातून दिसते. या बांधीलकीची कदर बीसीसीआयने केली पाहिजे. या तरुणींना उत्तम सुविधा मिळाल्या असत्या तर त्यांचा खेळ नक्की उंचावला असता हे लक्षात घेऊन या क्रिकेटपटूंमधील गुण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम बीसीसीआयने आखला पाहिजे. खेळ उंचावला की प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढेल. त्यामागोमाग प्रायोजक येतील. आजच्या पराभवाने खचून जाण्याची मुळीच गरज नाही. बीसीसीआयने थोडे लक्ष घातले तर विश्वचषक दूर नाही.