12 December 2017

News Flash

लोकशाहीसाठी वाद.. सुसंवाद

वादविवादातील सहभागी घटक, वादाच्या पद्धती आणि खंडन-मंडनाची प्रक्रिया यांचा निर्देश भारतीय न्यायदर्शनात आहे.

श्रीनिवास हेमाडे madshri@hotmail.coma | Updated: February 6, 2014 2:42 AM

वादविवादातील सहभागी घटक, वादाच्या पद्धती आणि खंडन-मंडनाची प्रक्रिया यांचा निर्देश भारतीय न्यायदर्शनात आहे. बहुसांस्कृतिकतेचाही वारसा मिळालेल्या या देशातील तशा शिस्तबद्ध चर्चापद्धती उपयोगी पडू शकतात.. वादाचा नकारात्मक अर्थ मागे पडून मग वाद हा संवादच, असा अर्थ प्रस्थापित होणे गरजेचे आहे..
‘वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवाद:।
वादे वादे जायते तत्त्वबोध: ।’
– शहाण्या जाणत्यांच्या एकत्र चच्रेने तत्त्वांचा अनुवाद, म्हणजे अर्थ स्पष्ट होणे शक्य होते. योग्य, संयमी चर्चा केल्यानेच तत्त्वाचा बोध होतो.  
भारतीय तत्त्वज्ञानातील ‘न्यायदर्शन’ या नावाने परिचित असणाऱ्या तात्त्विक प्रणालीने ‘खंडन-मंडन’ ही चर्चा पद्धती विकसित केली. वादपद्धती, ज्ञानाची साधने आणि तर्काचे नियम हे न्यायदर्शनाचे विषय आहेत. कोणत्याही विषयाची योग्य चिकित्सा कशी करावी, याचे प्रशिक्षण या पद्धतीतून मिळते. नेहमीच्या बोलण्यात, दैनंदिन वादविवादात, वादविवाद स्पध्रेत आणि आजच्या न्यायालयीन कामकाजात ती उपयुक्त आहे.
या चर्चापद्धतीचे; चच्रेचे ठिकाण व चच्रेचे घटक, वादाचे प्रकार आणि वादाची प्रक्रिया असे तीन भाग करता येतील. पहिला भाग म्हणजे ही चर्चा कशी चालावी, याचे प्रशिक्षण ज्या ठिकाणी होते तिला ‘तद्विद्य संभाषा परिषद’ म्हणतात. तद्विद्य म्हणजे तज्ज्ञ आणि संभाषा म्हणजे चर्चा; परिषद म्हणजे सभा. या सभेची रचना चार घटकांनी मिळून बनते.   
वादी : चच्रेचा मुद्दा उपस्थित करणारा (फिर्यादी), प्रतिवादी : विरोध करून आपले मुद्दे मांडणारा (अशील), सभापती : वादाचा आरंभ करणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि शेवटी निर्णय देणे, ही कामे करणारा विद्वान अधिकारी व्यक्ती (न्यायाधीश). चौथा घटक म्हणजे प्राश्निक : अधूनमधून सूचक प्रश्न करणारे (प्रेक्षक/साक्षीदार, यांनाच  ‘सभ्य’ किंवा ‘सदस्य’ असे नाव आहे.).
अशी रचना झाल्यानंतर जी चर्चा केली जाते तिला ‘वादविवाद’ म्हणतात. वादाचे प्रकार आणि वादपद्धतीचे विशिष्ट स्वरूप असलेली प्रक्रिया लक्षात घेऊनच वाद करावयाचा असतो. वादाचे प्रकार हा दुसरा भाग व प्रकिया हा तिसरा भाग. प्रथम वादाचे तीन प्रकार पाहू : वाद, जल्प आणि वितण्ड.        
वाद : वाद म्हणजे एखाद्या विषयातील तत्त्व कळावे, या निरपेक्ष हेतूने सुरू केलेली चर्चा. सत्यज्ञान हाच हेतू वादामागे असतो, ‘माझा जय व्हावा’ अशी बुद्धी वादात नसते. वादी आणि प्रतिवादी यांच्यापैकी कुणा तरी एकाचाच विजय होतो. पण वाद बरोबरीत सुटला तर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार सभापतीचा असतो. या निर्णयानंतर पुन्हा वाद करावयाचाच असेल तर ज्या मुद्दय़ावर विजय मिळविलेला असतो, तो वगळून त्यानंतरच्या मुद्दय़ावर वाद करावयाचा असतो.
जल्प : जल्प म्हणजे ‘दुसऱ्याला हरविणे आणि स्वत: जिंकणे.’ स्वत: कोणताही पुरावा द्यावयाचा नाही पण दुसरा कोठे चूक करतो त्यावर बारीक लक्ष ठेवून त्या चुकीचेच भांडवल करून त्याचा पराभव झाला, अशी घोषणा करणे आणि नंतर काहीशी दांडगाई करून चर्चा बंद करणे.
वितण्ड: चच्रेचा तिसरा प्रकार म्हणजे वितण्ड (संस्कृत वितण्ड). यात दुसऱ्याला हरविणे हा हेतू सुद्धा नसतो. केवळ शब्दाला शब्द वाढविणे, निष्फळ चर्चा वाढविणे, कोणताही निर्णय स्वत: न घेणे आणि दुसऱ्यालाही घेऊ न देणे, शक्य झाल्यास दांडगाई करून चर्चा बंद करून स्वत:चा विजय घोषित करणे, हाच हेतू यात असतो.  
तिसरा भाग म्हणजे वादाची प्रकिया ‘पूर्वपक्ष – उत्तरपक्ष पद्धती’ म्हणून परिचित आहे. तिलाच  ‘खंडन-मंडन पद्धती’ म्हणतात. स्वत:ची बाजू मांडणे हे मंडन आणि दुसऱ्याची बाजू खोडणे हे खंडन. ज्याचे खंडन करावयाचे तो ‘पूर्वपक्ष’ व ज्याचे समर्थन करावयाचे तो स्वत:चा पक्ष म्हणजे ‘उत्तरपक्ष.’ स्वत:चे मत मांडणे हा सिद्धान्त.  
भारतीय दर्शनांचा आजपर्यंतचा विकास याच पद्धतीने झाला. या पद्धतीतून जो निर्णय मिळतो तो ‘न्याय’ असतो;  हे वादविवाद पद्धतीतील मूलभूत सूत्र आहे. तिचे आधुनिक तात्त्विक पुनरुज्जीवन दिवंगत तत्त्ववेत्ते मे. पुं. रेगे यांनी ‘पंडित-फिलॉसॉफर प्रोजेक्ट’ या नावाने केले. तो ‘संवाद’ (डायलॉग) या नावाने प्रसिद्ध झाला.
दैनंदिन भाषेत ‘वाद’ हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. पण वाद करणे हा संवाद करणे असते. योग्य निष्कर्षांकडे येणे हा सुसंवाद असतो. साहजिकच वादविवाद हा सुसंवाद असतो. भारतीय विचारसरणीचे हे जगाला खूप मोठे योगदान आहे.     
भारतीय परंपरेतील ही सुसंवादाची पद्धती भारतीय लोकशाहीची वैचारिक मार्गदर्शक आणि तारणहार बनू शकते, असा विश्वास जागतिक अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समधील संसदपटू, अर्थतज्ज्ञ लॉर्ड भिकू पारेख यांनी नुकताच व्यक्त केला आहे.
भिकू पारेख यांची गोव्यातील ‘दामोदर धर्मानंद कोसंबी कल्पना महोत्सवा’मध्ये  (डी. डी. कोसम्बी फेस्टिवल ऑफ आयडीयाज्) आणि मुंबईत  ‘सामाजिक वादविवादाची भारतीय परंपरा’ (दि इंडियन ट्रॅडिशन ऑफ पब्लिक डिबेट) या विषयावर काही व्याख्याने झाली. तर, अमर्त्य सेन यांनी त्यांच्या ‘आग्र्युमेन्टेटिव्ह इंडियन- रायटिंग्ज ऑन इंडियन हिस्ट्री, कल्चर अ‍ॅण्ड आयडेंटिटी’ या पुस्तकात भारतीयांच्या वाद-संवाद करण्याच्या सामाजिक प्रेरणा स्पष्ट  केल्या आहेत.
अर्थात पारेख- सेन यांनी कौतुक केले म्हणून ही वादविवादाची पद्धती मोठी, श्रेष्ठ व दर्जेदार आहे, असे नसून ती मूलत: न्याय्य असल्याने तिचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोघांनी दाखवून दिले, असे म्हणणे रास्त आहे.
भिकू पारेख यांच्या मते वादविवाद व निषेध यांच्या पायावर भारतीय लोकशाही भक्कमपणे उभी आहे. परंतु त्याचबरोबर वादविवादांची ही परंपरा दिवसेंदिवस लुप्त होत चालली आहे, ही भिकू पारेख यांची खंत आहे. अमर्त्य सेन यांच्या मते, भारतासारख्या बहुधार्मिकच नव्हे तर संस्कृतिबहुल देशापुढील प्रश्न सोडविण्यासाठी सुसंवादाची प्रेरणाच सामाजिक व राजकीय पातळीवर योग्य ठरणारी आहे. तिचे यथार्थ पुनरुज्जीवन होणे, तिचा व्यापक प्रसार-प्रचार होणे आवश्यक आहे. इहवादी राजकारण, विषमता निर्मूलन आणि उपखंडीय शांततेसाठी भारतीय लोकशाही मजबूत होणे या उद्दिष्टांसाठी चच्रेची ही परंपरा उपयोगात येऊ शकते, असा युक्तिवाद सेन करतात.        
‘प्रत्येक माणूस ज्या एका विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक जमातीत जन्माला येतो तोच सांकृतिक परिसर त्या माणसाच्या जीवनाचा अर्थ आणि अस्मिता निश्चित करतो,’ यावर राजकीय तत्त्ववेत्ते चार्ल्स टेलर आणि भिकू पारिख यांनी भर दिला आहे. ही वस्तुस्थिती संस्कृतिबहुलता अभ्यासताना लक्षात घेतली पाहिजे, असा आग्रह अमेरिकन राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासक विदुषी आयरिन ब्लूमरॅड यांनी लक्ष वेधले आहे. (‘दि डिबेट ओव्हर मल्टिकल्चरॅलिझम : फिलॉसॉफी, पॉलिटिक्स अ‍ॅण्ड पॉलिसी’ हा निबंध इंटरनेट उपलब्ध आहे.) या संस्कृतिबहुलतेचा सामाजिक सामंजस्य आणि स्थलांतरितांच्या सचोटीवर नेमका काय परिणाम होतो, याची सखोल जाणीव विकसित केली पाहिजे, असे ब्लूमरॅड यांचे म्हणणे आहे.
मुंबई, दिल्ली यासारख्या महानगरांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक नोकरी-धंद्यासाठी येणार, तो त्यांचा हक्कआहे. विविध संस्कृतीच्या लोकांशी संवाद आणि संप, मोच्रे, आंदोलने, निषेध, दंगली, कुटुंब कलह इत्यादींवर यथार्थ सुसंवाद हाच मुख्य उपाय आहे. शासनाकडून, राजकीय पक्षांकडून किंवा जनतेकडूनही संवादाला नकार म्हणजे सामाजिक व व्यक्तिगत अशांतता आणि िहसेला आमंत्रण. नकोसे झालेले ! नको असलेले!!  
लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आणि तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आहेत.   

First Published on February 6, 2014 2:42 am

Web Title: criticism and discussion for democracy