ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यावरही त्या पूर्वीच्याच छोटय़ा घरात राहतात. त्यांनी ही प्रतिमा जाणीवपूर्वक ठेवली आहे की त्यांची राहणीच (पांढरी साडी आणि पायात स्लीपर) तशीच आहे, याची उत्तरे शोधण्याचा चिकित्सक प्रयत्न पत्रकार डोला मित्रा यांनी ‘डिकोडिंग दीदी, मेकिंग सेन्स ऑफ ममता बॅनर्जी’ या पुस्तकातून केला आहे. ममतांच्या भोवती सध्या राज्याचे राजकारण फिरत आहे. आता राष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे लेखिकेने उघड केले आहेत. पत्रकारितेत अनेक वर्षे असल्याने मित्रा यांनी राज्याचे राजकारण जवळून पाहिले आहे. अनेक व्यक्तींशी वेळोवेळी त्यांनी चर्चा केली आहे.  त्यांची ममतांबाबतची मते, सामान्यांच्या सरकारच्या कारभाराबाबतच्या भावना या आधारे यांनी निष्कर्ष काढले आहेत.
या पुस्तकाकडे केवळ ममतांच्या कारभारावर टीकाच आहे, अशा दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. त्यांच्या आतापर्यंतच्या राजवटीने सामान्यांच्या जीवनात खरोखरच ‘परिबोर्तन’ घडले का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मित्रा यांनी केला आहे. मुळात एकहाती संघर्ष करीत साम्यवाद्यांची ३४ वर्षांची सत्ता खेचून घेणे सोपे नव्हते. ते ममतांनी डाव्यांच्या तुलनेत फारशी भक्कम संघटना नसतानाही करून दाखवले. ममतांनी मोठी स्वप्ने दाखवत सत्ता मिळवली खरी, पण खरोखरच बंगालच्या जनतेच्या दृष्टीने  डाव्यांची राजवट आणि तृणमूल काँग्रेसची राजवट यात काही फरक आहे काय, याची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पूर्वीचे आहे. ममतांनी ३३ जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. कुठलाही राजकीय पक्ष जोपर्यंत एकामागे-एक निवडणुका जिंकत जातो, तेव्हा स्वाभाविकच लोक त्या पक्षावर समाधानी आहेत असाच अर्थ असतो. मात्र हे चित्र काहीसे फसवे असल्याचे लेखिकेने उघड केले आहे.
ममतांना प्रतिवाद किंवा टीका आवडत नाही. त्यामुळे वरवर जरी दिसत असले तरी प्रसारमाध्यमांना सरकारवर टीका केली तर त्याचे परिणाम काय होतील याची धास्ती असते. सरकारवर टीका केली म्हणून काही सार्वजनिक ग्रंथालयातून संबंधित वृत्तपत्रेच हद्दपार करण्यापर्यंत ममता सरकारची मजल जाते. टीकाकारांना ममता ‘डावे’ किंवा ‘माओवाद्यांचा हस्तक’ असे लेबल लावून मोकळ्या होतात. त्यामुळे मूळ प्रश्नाला आपोआपच बगल दिली जाते, असे अनेक उदाहरणांवरून लेखिकेने दाखवून दिले आहे. दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून त्यांची संभावनाही ममतांनी ‘माओवादी’ अशी करून प्रश्नाचे उत्तर टाळले. दुसरीकडे माओवाद्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या लालगडमध्ये त्यांच्याबद्दल तृणमूलला कशी सहानुभूती होती, निवडणुकीतही त्याचा कसा फायदा झाला हेही दाखवून दिले आहे. मात्र त्यांना सहानुभूती दाखवणे पक्षाच्या प्रतिमेला मारक आहे हे ओळखून नंतर दुटप्पी भूमिका घेतली.
लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या यादीत मोठय़ा प्रमाणात चित्रपट तारे-तारका होते. त्याचे कारणही मोठे मार्मिक आहे. एक, पक्षातून विरोधाचा आवाज कमी व्हावा. पडद्यावरचे कलाकार आव्हान देण्याची शक्यताही नाही आणि त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी चमकल्याने आपली प्रतिमाही सुधारते, असा सरळ हिशेब ममतांनी ‘सेलिब्रिटीं’ना उमेदवारी देताना केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतच जुन्या जमान्यातील एका अभिनेत्रीने  ‘माझे चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. मात्र प्रचार सभेत तुम्ही मला मोफत पाहू शकता. आता मतांच्या रूपाने त्याची किंमत द्या.’ असे बोलून दाखवले!
या पुस्तकात ममतांचे केवळ नकारात्मक चित्रण नाही. त्यांनी राजकीय जीवनात केलेला संघर्ष, त्यांच्यावर अनेक वेळा झालेले जीवघेणे हल्ले, तरीही त्यांची कायम असलेली जिद्द, याचा आलेख लेखिकेने काढला आहे. पुरेशा उपचारांअभावी ममतांना त्यांच्या वडिलांना वाचवता आले नाही. सरकारी दवाखान्यात चांगले उपचार त्यांना मिळू शकले नाहीत. त्यामुळे सत्तेत येताच त्यांनी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कशी सक्षम होईल यासाठी धडपड चालवली. मात्र सहकाऱ्यांच्या गैरकारभाराकडे काणाडोळा करणे हा त्यांचा दोष आहे. वडिलांच्या निधनानंतर आईच ममतांसाठी सर्व काही होती. आईला ‘येते’ असे सांगून घराबाहेर पडणे हा त्यांचा शिरस्ता, मात्र एका आंदोलनात आईची नजर चुकवून त्या बाहेर पडल्या. ‘संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना धीर देण्यास गेले नाही तर राजकारणात राहून उपयोग काय?’, अशी ममतांची भावना होती. त्याच वेळी विरोधी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यातून त्या कशाबशा बचावल्या. मात्र आईला न सांगता बाहेर पडल्याचा हा परिणाम झाला अशी धारणा ममतांची झाली.   
लेखिकेने ममता यांच्या साधेपणाची अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यातलाच एक म्हणजे त्या कधीच वाढदिवस साजरा करत नाहीत. दीपककुमार घोष या ममतांच्या एके काळच्या निकटवर्तीयाने ‘दि गॉडेस दॅट फेल्ड’ या पुस्तकात ममतांचा रणजित घोष या व्यक्तीशी विवाह झाल्याचा दावा केला आहे. मात्र ममतांनी ही बाब लपवून ठेवली. अशा अनेक बाबी लेखिकेने उघड केल्या आहेत.
ममतांची पक्षात एकाधिकारशाही आहे हे काही नवे नाही. मात्र आता त्यांना खुशमस्कऱ्यांनी घेरले असून, त्याचा परिणाम सरकारच्या कामावर होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट केले आहे. ज्या ‘मा, माती आणि मानुष’ याचा नारा देत सत्तेवर आल्या त्यालाच तिलांजली देण्याचा हा प्रकार आहे. ममतांनी राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही.  
हे पुस्तक म्हणजे तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध समाजघटकांना भेटून केलेले चित्रण आहे. यात केवळ ममतांच्या कारभाराचा पंचनामाच आहे असे नाही, तर विविध प्रसंगांत त्यांची लढाऊ वृत्ती आणि जिगर कशी होती हेही दाखवून दिले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व, कारभार, पक्षसंघटना, सरकारची धोरणे आणि त्याचा राज्यावर झालेला परिणाम याच्या विश्लेषणासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
डिकोडिंग दीदी – मेकिंग सेन्स ऑफ ममता बॅनर्जी : डोला मित्रा,
रूपा पब्लिकेशन, नवी दिल्ली,
पाने : २२८, किंमत : २९५ रुपये.