हृदयेंद्रच्या ओघवत्या कथनानं साऱ्यांची मनं जणू स्तब्ध झाली होती. ज्ञानेंद्र म्हणाला..
ज्ञानेंद्र – हृदयेंद्रनं जेव्हा त्या चक्राच्या अनुषंगानं भक्तीमार्गानं साधकाच्या अंत:करणात काय पालट होतो, हे सांगितलं तेव्हाच मी ज्ञानाच्या अंगानं विचार करू लागलो होतो. शेवटी डॉक्टरसाहेब भक्त असो की योगी असो, परमतत्त्वाचं म्हणा किंवा परमशक्तीचं म्हणा ज्ञान व्हावंच लागतं ना? ज्ञानाशिवाय एक पाऊल तरी कोणत्याही मार्गानं टाकता येतं का?
हृदयेंद्र – पण भक्त स्वत:ला ज्ञानी मानतोच कुठे? मी अज्ञानी आहे, मी शक्तीहीन आहे, असंच तो मानतो. सर्वज्ञ, सर्वशक्तीमान केवळ सद्गुरूच असतात. तेच मला उचलून कडेवर घेतात. मग मला दुसरं काय करायची गरज आहे?
ज्ञानेंद्र – बाबा रे, मी अज्ञानी आहे, हेसुद्धा कळावंच लागतं ना! तेवढं तरी ज्ञान लागतंच ना? माणूस स्वत:ला अज्ञानी समजतच नाही. इतरांपेक्षा आपल्यालाच काकणभर अधिक कळतंय, या तोऱ्यात तो वावरत असतो. पण माझा मुद्दा दुसरा आहे. मी या चक्रांचा आणि कुंडलिनीच्या प्रवासाचा ज्ञानाच्या अंगानं विचार केला तेव्हा जाणवलं, माझं सर्व ज्ञान हे स्थूल, भौतिकाच्या पसाऱ्यातच गुंतलं असतं. या ज्ञानाच्या जोरावरच तर माणसानं हजारो शोध लावले. दुधापासून तूप, दही, ताक बनतं का काय शोध नाही? या चराचरात दिसणारी कोणतीही गोष्ट घे. जी सृष्टीनिर्मित नाही, ती सगळी माणसाची निर्मिती आहे आणि केवळ ज्ञानाच्या जोरावर ती साध्य झाली आहे. मग तो दिवा असो की अग्निबाण! हृदू तुला कशाचं हसू आलं?
हृदयेंद्र – अरे मला एकदम ज्ञानेश्वरीतली ओवी आठवली.. ते श्रीशारदा विश्वमोहिनी नमिली मिया.. काही केल्या या ओवीचा अर्थ कळत नव्हता..
योगेंद्र – अरे शारदेचं म्हणजे सरस्वतीमातेचं स्तवन आहे ते!
हृदयेंद्र – ते कळतं रे पण जी विद्येची देवता आहे, ज्ञानप्रदान करणारी आहे ती ‘विश्वमोहिनी’ कशी असेल? ती विश्वाला मोहित म्हणजे भ्रमित कशी करेल? काही केल्या उत्तर सापडत नव्हतं. सद्गुरूंना मनातून वारंवार प्रार्थना करत होतो. याचं उत्तर सांगा. तर ‘स्वरूप चिंतन’ या सदरात ते उत्तर मिळालं. त्यात लिहिलं होतं की, प्रत्येक शोध हा प्रज्ञेच्याच म्हणजे ज्ञानप्रतिभेच्याच जोरावर लागतो, पण पुढे तोच जगाला भ्रमित करतो. साधी गोष्ट घ्या. दूरचित्रवाणी हा काय लहान शोध आहे? पण तो ज्यानं बनवला त्यानं  कल्पना तरी केली होती का, की याच दूरचित्रवाणीवर लोक भडक कौटुंबिक नाटय़ानं भरलेल्या मालिका वर्षांनुवर्ष पाहाण्यात गुंततील? त्यामुळे शोध तर अनंत लागले पण ज्याचा खरा शोध घ्यायला पाहिजे त्याचा शोध घेण्याचं भान उरलेलं नाही..
ज्ञानेंद्र – पण हे भानही येतं ते ज्ञान जाग आणतं तेव्हाच ना? मी माझ्या जगण्याकडे अंतर्मुख होऊन पाहू लागेन तेव्हाच मी कुठे कसा गुंततो ते कळतं ना? त्या दिवशी कर्मू तू म्हणालास की माझ्या जीवनातल्या अडचणी कृष्णमूर्ती सोडवणार नाहीत, त्या मलाच सोडवायला लागतात. खरंच आहे ते. कृष्णमूर्तीनी तरी कुठे दावा केला की माझ्याकडे या मी तुमच्या जीवनातल्या अडचणी सोडवतो! अडचणी ज्याच्या त्यालाच सोडवायच्या आहेत पण मुळात अडचण काय आहे, हेच त्याला कळत नाही, हीच खरी अडचण आहे! कृष्णमूर्ती मला फक्त खऱ्या अडचणी कशानं उत्पन्न होतात, ते दाखवतात. दारंखिडक्या बंद असल्यानं अंधार पसरलेली खोली आपण आवरू शकत नाही. आधी दारंखिडक्या उघडून प्रकाश आत येऊ द्यावा लागतो. मग पसारा आपोआप दिसतो. खोली आवरता येते. अंधारात खोली आवरण्याच्या भ्रमात आपण पसारा उलट वाढवतच असतो! तेव्हा कृष्णमूर्ती काय, निसर्गदत्त महाराज काय.. तो प्रकाश प्रथम स्वत:त आणायला सांगतात. एकदा प्रकाश हीच सहजस्थिती झाली की वेगळं काही करावं लागत नाही. नंतर त्या प्रकाशाचं भानही उरलं नाही तरी बिघडत नाही. रात्री प्रकाश नसल्याची जाणीव असते. पहाट होते तेव्हा उजाडतंय, हे समजू लागतं. पण एकदा लख्ख उजाडलं की दिवसभर ‘आता प्रकाश आहे’, हे भान कुठे असतं? तरी त्या प्रकाशाच्याच आधारावर सर्व व्यवहार होत असतात ना? तसंच ज्ञान आहे म्हणून तर सर्व तऱ्हेच्या उपासना सुरू असतात, नाही का?
चैतन्य प्रेम