‘भाषेतून शिकवणे आणि भाषा शिकवणे यात लोक घोटाळा करतात. म्हणजे इंग्रजी सुधारावे म्हणून त्या माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवले जाते, पण त्यामुळे इंग्रजी सुधारतेच असे नाही. कारण माध्यम म्हणून शिकवताना ती भाषा अगोदर आली पाहिजे, ही साधी गोष्ट लोक विसरतात आणि त्यामुळे अगदी लहानपणी मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवतात. हे म्हणजे ज्या मुलाला अजून धड चालता येत नाही, त्याला एकदम सायकलवर बसून जायला सांगण्यासारखे आहे’.. भाषेविषयीचा डॉ. अशोक केळकर यांचा हा दृष्टिकोन किती सहज पटण्यासारखा आहे. परंतु समाजाच्या जडणघडणीसाठी भाषेचे विज्ञान समजून घेण्याची आवश्यकताच समाजाच्या ठायी असत नाही. माणसाच्या पृथ्वीवरील आगमनानंतर संवादाचे साधन म्हणून भाषा निर्माण झाली. भाषेच्या निर्मितीनंतर त्याचे शास्त्र तयार झाले. हे शास्त्र विज्ञानाच्या अन्य कोणत्याही शाखेएवढेच व्यामिश्र आणि बहुपदरी असते, याचे भान डॉ. अशोक केळकर यांनी आयुष्यभर दिले. भाषेबरोबरच मानवाच्या मेंदूतून निर्माण झालेल्या सौंदर्याच्या कल्पनांचेही सौंदर्यशास्त्र बनले, एवढेच काय पण माणसाच्या भाषेच्या उच्चाराचेही उच्चारशास्त्र तयार झाले. भाषा आणि सौंदर्याशी निगडित असलेली ही सगळी शास्त्रे एकमेकांची भावंडे आहेत आणि परस्परपूरकही आहेत, याचे भान जगातील भाषावैज्ञानिकांनी दिले. डॉ. केळकर यांनी त्यातच आणखी पुढे जाऊन चिंतन केले आणि सिद्धान्तांची फेररचना केली किंवा काही ठिकाणी मोलाची भरही घातली. प्रत्येकाच्या जगण्यात अनिवार्य असलेल्या भाषेबद्दल सामान्यत: फारच थोडे आग्रही असतात. मग ते शुद्धलेखन असो की व्याकरण. सामान्यांसाठी हे दोन्ही विषय गणितासारखे असतात. कळत नाहीत किंवा कळून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. पण भाषेचे हे विज्ञान तेवढेच रंजक असते आणि त्यातून भाषा उपयोगात आणणाऱ्या प्रत्येकाला काही आनंदही मिळू शकतो. केळकर यांनी त्यामुळेच ‘भाषा आणि जीवन’ या नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारी समर्थपणे पेलली. पुणे विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज येथे भाषाविज्ञानाचे अध्यापन करणारे केळकर हे केवळ प्राध्यापक राहिले नाहीत. या विज्ञानाचा ध्यास घेणारा संशोधक अशी त्यांची ओळख झाली. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये तर त्यांची ग्रंथसंपदाच प्रसिद्ध आहे. परंतु गुजराती आणि फ्रेंच यांसारख्या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. भाषेचा विकास त्या भाषक समूहाच्या सांस्कृतिक उन्नयनासाठी अतिशय महत्त्वाचा असतो, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे भाषक व्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यातील गुंतागुंत सोडवणे त्यांना अधिक रसपूर्ण वाटत असे. शास्त्रकाटय़ाच्या कठोर कसोटीचा सतत आग्रह धरणारे अशोक केळकर हे अतिशय मर्मग्राही रसिक होते. कविता, नृत्य, संगीत, चित्रकला या सगळ्या प्रांतांत त्यांना कमालीची रुची होती.  ‘द फोनॉलॉजी अ‍ॅण्ड मॉफरेलॉजी ऑफ मराठी’ हे पुस्तक त्यांनी वयाच्या तिशीत प्रसिद्ध केले. भेदविलोपन, मराठी भाषेचा आर्थिक संसार, वैखरी, रुजुवात ही त्यांची ग्रंथसंपदाही विशेषत्वाने गाजली. वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या भाषेच्या तीन प्रवाहांबद्दल सविस्तर लेखन करणे हे त्यांचे जीवनसूत्र होते. पहिल्या दोन प्रवाहांवर त्यांनी लेखन केलेही. मात्र पश्यंतीबद्दल लेखन राहूनच गेले. अनेक जागतिक परिषदांमध्ये डॉ. केळकर यांचे निबंध नावाजले गेले. भाषाविज्ञानाच्या क्षेत्रात जगभरात मान्यता पावलेल्या डॉ. केळकर यांनी मराठी भाषेचा केलेला विविधांगी अभ्यास यापुढील संशोधनाची दिशा दाखवणारा आहे. पद्मश्री, साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळाले, पण त्यांच्या लेखी संशोधनातील आनंदच कैवल्यदायी होता. त्यांच्या निधनाने भाषेच्या अवकाशातील एक प्रखर तारा निखळून गेला आहे.