मधु कांबळे यांनी आंबेडकरी विचाराचे तरुण नक्षलवादी होत असल्याबद्दल ‘पुन्हा तोच प्रश्न’ या लेखात (२ जून) चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या प्रतिक्रियासुद्धा वाचल्या. खरे तर बाबासाहेबांना हिंसक पद्धतीने समाजपरिवर्तन कधीच मान्य नव्हते, कारण त्यांनी मार्क्‍स नाकारून बुद्ध स्वीकारला होता. हा इतिहास सगळ्यांना माहीत असूनही पुन्हा तीच चर्चा वर्तमानपत्रातून होताना दिसते. त्यावर जे उपाय बाबासाहेबांनी सांगितले त्याची अंमलबजावणी कोणीही करताना दिसत नाही.. मग स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणारे असले तरी. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादच फुले वा आंबेडकरांना मान्य नव्हता, त्यांना समानता प्रस्थापित करायची होती, असा युक्तिवादही लेखात कांबळे यांनी केला आहे. मुद्दा हा आहे की, एकतर्फी विचार करून देशात समानता प्रस्थापित होणे शक्य नाही. त्याला दुसऱ्या बाजूने (किंवा अन्य सर्व बाजूंनी) प्रतिसाद मिळणे गरजेचे असते. त्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक असते. तसे या देशात आजपर्यंत झालेले दिसत नाही.
या विसंवादातूनच अगदी टोकाचे वाद- दहशतवाद, नक्षलवाद निर्माण होतात आणि जे जन्मजात विषमतेची शिकार झालेले आहेत ते मग अशा मार्गावर विश्वास ठेवून त्यांना साथ देतात आणि या चळवळींना लोकांचाच आश्रय मिळतो.
 सरकार, सामाजिक कार्यकत्रे, वर्तमानपत्रे आणि जागृत नागरिक यांनी पुढाकार घेऊन ही विषमता नष्ट करण्यासाठी दीर्घकालीन उपाय करून लोकप्रातिनिधिक सरकार, कायदा यावर लोकांचा विश्वास निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जगात शांतता पाहिजे असेल तर बुद्धविचाराशिवाय पर्याय नाही, हे या रस्ता चुकलेल्या आपल्याच बांधवांना समजावून सांगितले पाहिजे आणि तशी कृती समाजातून झाली पाहिजे तरच लोकशाहीच्या झाडाला लागलेली ही विषारी फळे गळून पडतील आणि ते सगळ्यांच्या फायद्याचे आहे.
– प्रमोद गोसावी, पनवेल

हिरव्या जागा नि राजकारणी.. तिथले आणि आपल्याकडले!
‘तुर्कस्तानातील सेक्युलर िस्प्रग’ हा अन्वयार्थ (४ जून) वाचल्यावर ताजमहालासमोर मॉल बांधण्याच्या आपल्याकडच्या मायावतींच्या उपद्व्यापांची आठवण झाली. पंतप्रधान एर्दोगन यांनीही असाच उद्योग तिथे सुरू केला आहे. त्याविरुद्ध जनता उभी राहिली आणि हे आंदोलन तुर्कस्तानच्या अनेक शहरांत पसरले. ‘गेझी पार्क’ या नावाच्या बागेच्या बचावासाठी इस्तंबूलच्या ताक्सिम चौकात चाललेले हे आंदोलन निव्वळ पर्यावरण रक्षणासाठी नाही. एर्दोगन यांनी बरीच वर्षे चाललेल्या उपद्व्यापांविरुद्ध असंतोषाचे ते फलित आहे. (असले उपद्व्याप करणाऱ्यांना आपल्याकडे ‘विकासक’ म्हटले जाते आणि विकासकप्रेमी एर्दोगन यांनी इस्तंबूलमधल्या अनेक हरित जागांवर कुऱ्हाड चालवली आहे.)
गेझी पार्कला काही इतिहास आहे. १ मे १९७७ या दिवशी तिथे काही अज्ञात मारेकऱ्यांनी कामगार कार्यकर्त्यांची हत्या केली होती. हे मारेकरी अद्याप अज्ञात आहेत. त्यानंतरच्या काळात अनेक वर्षे मे दिनाच्या सभा व निदर्शनांना तिथे बंदी होती. पुढे २०१०मध्ये ही बंदी उठवण्यात आली. आता असे ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण एर्दोगन यांना जणू सार्वजनिक स्मृतीतून नष्ट करायचे आहे असा याचा अर्थ होतो. असे करू गेले तर काय होते ते जनतेने दाखवून दिले आहे.
आपल्याकडे महालक्ष्मी रेसकोर्सच्या संदर्भात वेगळे मुद्दे आहेत. आपल्याला घोडय़ांच्या शर्यतींच्या जुगाराच्या दु:खद स्मृती नको आहेत, पण त्याजागी तज्ज्ञ वास्तुविशारदांच्या सल्ल्याने (राजकारण्यांच्या दु:खद स्मृती व वर्तमान वगळून) आपण मुंबईत काही नव्या हिरव्या जागा निर्माण करू शकू काय? आरे कॉलनीवरील बांधकामांचा इतिहास लक्षात घेता जनतेच्या दबावाखेरीज असे काही घडणे कठीण आहे.
– अशोक राजवाडे, मुंबई</strong>

माणुसकीची दरकार वाहनचालकांनी ठेवावी
‘बेदरकार पादचाऱ्यांवर कारवाई हवीच’ हे राम गोगटे (वांद्रे) यांचे पत्र (लोकमानस, ५ जून) वाचले. इअरफोन लावून रस्ता ओलांडणाऱ्या त्या १७ वर्षांच्या कोवळ्या मुलीचा प्राण गेल्यामुळे प्रथम कुटुंबीयांना सहानुभूती दर्शविण्याऐवजी पत्रलेखकाला बसचालकाबद्दल वाटलेली सहानुभूती अचंबा देणारी होती.
पूर्वी (पादचाऱ्यांकडे) भ्रमणध्वनी नसल्यामुळे वाहन चालविणे किती सोपे होते, उलट आज ते फार कठीण जात आहे याचे वर्णन करताना त्यांनी अशी समजूत करून घेतली की पूर्वी व आजचे वाहनचालक यांच्या मनोवृत्तीमध्ये काडीमात्र फरक झालेला नाही. विरुद्ध बाजूला असलेल्या रस्त्यावर आपले वाहन बेदरकारपणे आणून लोकांचा नाहक बळी घेणारे निद्रिस्त वाहनचालक, वाटेल तशी नागमोडी वळणे घेणारे दुचाकीस्वार, मोकाट असताना या पत्रातील ‘पादचाऱ्याने पदपथ न वापरता रस्ता वापरणे वा रहदारीला अडथळा होईल असे वागणे हा दंडनीय गुन्हा आहे व त्याला एक दिवसाचा तुरुंगवास व्हावा’ हे त्यांचे वाक्य निव्वळ कायदेशीर बाजू मांडणारे आहे. मुंबई शहरातील असे किती पदपथ प्रामाणिक पादचाऱ्यांसाठी मुक्त आहेत, जिथे फेरीवाले व रस्त्याच्या कडेला मनमानीपणे उभ्या केलेल्या वाहनांचा विळखा नाही? रस्ता हा प्रथम पादचाऱ्यांचा आहे व नंतर तो वाहनांचा आहे हे लक्षात ठेवूनच वाहनचालकाने वाहन चालवावे. चूक कुणाचीही असो, गेलेला जीव परत येत नाही एवढा साधा पण संवेदनशील विचार प्रत्येकाने जगवला तरच तुम्ही-आम्ही सारेच जगू. अन्यथा एकमेकांना नियम दाखवून आपला कार्यभाग साधणे, अशी जीवनाची नवीन व्याख्या तयार होईल.
– सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

कोणती माहिती घ्यायची!
‘माहिती महापुराची मौज’ हा खुसखुशीत अग्रलेख (५ जून) वाचला.. आता माहितीचा हा महापूर केव्हा येतोय याचीच वाट पाहात बसणे आपल्या हाती आहे! परंतु या संदर्भात एक अत्यंत चिंतादायक बातमीही वाचावी लागल्याने मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बातमी अशी की, भारतातले अनेक राजकीय पक्ष माहिती अधिकार कक्षेत यायला तयार नाहीत. त्यात काँग्रेस, समाजवादी, मार्क्‍सवादी आणि इतर अनेक चिल्लर पक्षही आहेत. अपवाद फक्त भाजपचा आहे. आज भाजप माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास सकृद्दर्शनी तरी तयार दिसतो. त्यांची ही तयारी अखेपर्यंत राहील याची शाश्वती धरावी का? तूर्तास जनतेने कोणत्या राजकीय पक्षाकडून कोणती माहिती मिळवायची त्याची यादी करायला सुरुवात करायला हरकत नाही. यादी फार लांबणार असेल तर थोडी पदरमोड करून गरजू तरुणांना कामाला लावावे म्हणजे त्यांना कामही मिळेल व अनेक भानगडी माहीत झाल्याने पुढच्या आयुष्यात कोणती भानगड कामास येईल याचा अभ्यास होईल!
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

‘वाइन-निर्मितीचे संशोधन’ संतापजनक
बुद्धी हे मानवाला लाभलेले वरदान मानले जाते, पण कधीकधी माणूस बुद्धीचा वापर आपल्याच नाशासाठी करतो हे पाहून वाईट वाटते. सोलापुरातील व्ही.जी. शिवदारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केळीपासून स्वस्त दारू मिळवण्याचे संशोधन केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली आणि तळपायाची आग मस्तकात गेली.
संशोधनासाठी कित्येक क्षेत्रे खुली पडलेली असताना त्यांनी केवळ वाइननिर्मितीचेच संशोधन का करावे? सध्या अनेक समस्या अशा आहेत की त्यांवर संशोधन करून तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे. उदा. दारूपासून मुक्ती मिळवण्याबाबत एखादे संशोधन केले असते तर ते मानव जातीवर मोठे उपकारक ठरले असते, पण इथे उलटे संशोधन झाले आहे!  
– वाघेश साळुंखे

आत्मपरीक्षण करणे योग्य
‘मराठी पर्यटन संस्थांचा प्रवास कोणत्या देशी!’ ही लोकसत्तामधील बातमी वाचली आणि मन खिन्न झाले. पर्यटन क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या दोन संस्था एक सचिन आणि दोन केसरी ट्रॅव्हल्स, पण सद्य परिस्थिती बघता असे वाटले की, त्यांनी खरोखरीच आत्मपरीक्षण करावे. आजच्या ग्लोबल जमान्यात मार्केटिंगला अनन्यसाधारण असे महत्त्व असले तरी सचिन ट्रॅव्हल्सच्या रोज पानभर येणाऱ्या जाहिराती, टीव्ही इतर माध्यमांतून होणाऱ्या जाहिराती पाहता त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनाबद्दल संशयाची पाल मनात चुकचुकायची आणि तसेच झाले. त्याचा आर्थिक डोलारा कोसळला. त्यानुसारच केसरी ट्रॅव्हल जाहिरात, कौटुंबिक प्रश्न, ‘निक्ता’सारखे पुरस्कार यावर होणारा वारेमाप व अनावश्यक खर्च लक्षात घेता त्यांनीसुद्धा गांभीर्याने विचार  करावा.
-पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली (पूर्व)