परंपरेचा निर्बुद्ध स्वीकार न करता अगदी वेदांनाही विवेकाची कसोटी लावूनच जगा, हे सांगणारा संतविचार आजही महत्त्वाचा आहे आणि उपयुक्तसुद्धा. तो अंगी बाणवल्यास आजच्या जगाकडेही आपण डोळसपणे पाहू..
‘परंपरा’ नावाचे एक जे भले थोरले संचित आपल्याबरोबर सतत चालत असते त्याची व्यवस्था नेमकी कशी लावायची याचा उलगडा आपल्याला अनेकदा होत नसतो. परंपरेने जे काही चालत आलेले आहे त्याचा स्वीकार करायचा की धिक्कार, या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपण बहुतेकदा गोंधळलेले असतो. परंपरा जपायची म्हणजे नेमके काय जपायचे, हा प्रश्न तर इतका जटिल आहे की, त्याला थेट भिडण्याचे आपण बव्हंशी टाळतोच! त्यामुळे, गोंधळ अधिकच वाढतो. त्यातून दोनच गोष्टी संभवतात. परंपरेचे पूर्ण अंधानुकरण, ही त्यातील एक. तर, परंपरेचा संपूर्ण अव्हेर, ही त्यातील दुसरी. दोन्ही भूमिका जवळपास सारख्याच सदोष ठरतात. कारण, कोणत्याही परंपरेचा आंधळा स्वीकार अथवा नकार या दोहोंत विवेकाच्या अधिष्ठानाचा मागमूसही दिसत नाही. परंपरा, मग ती ज्ञानाची असो वा लोकाचाराची, तिची चिकित्सा झालीच पाहिजे, याबद्दल संतविचार विलक्षण आग्रही आणि तितकाच दक्ष आहे.
आपल्या पूर्वसुरींपासून चालत आलेला आचार-विचार, जनरीत, श्रद्धा-संकेत हे मुळात अपरिवर्तनीयच आहे, या भावनेने आपल्या अबोध मनात कोठे तरी ठाण मांडलेले असते. त्यामुळे, कोणत्याही पूर्वसंचिताचा चिकित्सक लेखाजोखा मांडण्याच्या भानगडीत आपण पडतच नाही. परंपरेतील कालसापेक्ष अंश किती, तो अंश तसा कालसापेक्ष असल्यामुळे आजच्या बदललेल्या काळाशी तो सुसंगत आहे अथवा नाही; नसेल तर कालबाह्य ठरलेल्या भागाचे काय करायचे.. यांसारख्या कळीच्या मुद्दय़ांना आपण कधी हातच घालत नाही. परिणामी, काळाच्या ओघात अप्रस्तुत ठरलेल्या अनेकानेक प्रथा-परंपरा-समजुती-विश्वास यांचे पुंजके आपल्या व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात ठायी ठायी पहुडलेले दिसतात. परंपरा जपण्याच्या नावाखाली तो सारा खुळचट ठेवा आपण सांभाळत राहतो. हे सारे बघितले की प्रश्न पडतो की, आपण परंपरेचे वारसदार आहोत का भारवाहक?
ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील पाच ओव्या या संदर्भात विलक्षण मननीय आहेत. संतविचाराचा सारा पीळ तिथे स्पष्ट दिसतो. ज्ञानी मनुष्याची व्याख्याच जणू ज्ञानदेवांनी त्या ठिकाणी श्रीकृष्ण मुखातून मांडलेली दिसते. ज्ञानदेवांची ती ओवी संपूर्णच बघायला हवी. जो खरा विवेकी अथवा ज्ञानी आहे, असा मनुष्य कोणत्याही संचिताचा, परंपरेने चालत आलेल्या ज्ञानठेव्याचा स्वीकार अथवा नकार विवेकावर पट्टी बांधून करत नसतो, हे मर्म अर्जुनाच्या मनावर ठसवण्यासाठी ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण उदाहरण देतो ते अपौरुषेय मानल्या गेलेल्या वेदांचेच. परंपरेने अति श्रेष्ठ आणि पूज्य मानलेल्या वेदांकडे विवेकी माणूस कोणत्या भूमिकेने बघतो, याचे विवरण करताना, ज्ञानदेवांनी त्यांच्या श्रीकृष्णाच्या मुखी जी ओवी घातलेली आहे. ती विलक्षण अर्थगर्भ आहे. निखळ ज्ञानी व्यक्ती कशी असते ते सांगत असताना श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना ‘‘तैसे ज्ञानीये जे होती। ते वेदार्थातें विवरिती। मग अपेक्षित तें स्वीकारिती। शाश्वत जें।।’’ अपौरुषेय मानले गेलेले वेदवाङ्मय तसेच्या तसे स्वीकारार्ह आहे, ते स्वरूपत: कालातीत आहे. असे खरा विवेकी माणूस कधीच मानत नाही. तो वेदार्थाचे विवरण करतो, त्यातील कालबाह्य अंश फेकून देतो आणि जो शाश्वत अंश खाली उरतो त्यातील त्याला त्यावेळी आवश्यक असणारा आणि त्याच्या अपेक्षांची पूर्तता करणारा भागच तो स्वीकारतो, हा या ओवीचा अर्थ.
आता, ही सगळी प्रक्रिया स्पष्ट व्हावी, यासाठी ज्ञानदेवांनी दिलेली दोन उदाहरणेही अतिशय मनोज्ञ आहेत. सूर्य उगवला की संपूर्ण विश्व प्रकाशमान होते. त्यावेळी, जगातले सगळे रस्ते डोळ्यांना दिसतात म्हणून प्रत्येक रस्ता आपण पायाखाली घालत नाही. तर, आपल्याला जिथे जायचे आहे त्या ठिकाणी पोहोचवणारा मार्गच आपण निवडतो. त्याच धर्तीवर, उद्या सगळी पृथ्वी पाण्याने भरून गेली तर, केवळ उपलब्ध आहे म्हणून ते सगळे पाणी काही आपण पिणार नाही. तर, आपली तहान भागवण्याइतपतच आपण पाणी त्या जलनिधीमधून ओंजळीने घेऊ. त्याच न्यायाने विवेकी मनुष्य वेदार्थाचा धांडोळा घेतो; त्यांतील कालसापेक्ष भाग वगळून जो शाश्वत हिस्सा आहे त्यांतील त्याला अपेक्षित तेवढाच भाग तो अंगीकारतो, असा ज्ञानदेवांचा दाखला आहे.
परंपरेकडे, पूर्वसंचित ज्ञानाकडे बघण्याची ही दृष्टी संतविचार आपल्याला अशी शिकवतो. परंपरेचा, पारंपरिक ज्ञानाचा स्वीकार विवेकनिष्ठ भूमिकेतूनच केला गेला पाहिजे, ही ती दृष्टी. इथे प्रश्न केवळ दृष्टीचा नाही तर धैर्याचाही आहे. संपूर्ण मध्ययुगीन जीवनपद्धतीवर ‘धर्म’ या संकल्पनेचा प्रगाढ पगडा होता. ‘धर्म’ याचाच अर्थ ‘वैदिक धर्म’ हेच तेव्हाचे व्यावहारिक समीकरण. त्यात वेदांची निर्मिती दस्तुरखुद्द विश्वनियंत्यापासून, या धारणेचा तत्कालीन समाज मनावर दृढ प्रभाव. वेद मुळात अपौरुषेय असल्यामुळे त्याच्या अधिसत्तेला आव्हान देणे, ही तर पाखंडीपणाची परिसीमा! अशा त्या सगळ्या विचारव्यूहात, वेदांमधील काही भागही कालबाह्य होऊ शकतो आणि म्हणूनच विचक्षणपणे तो निवडून फेकून दिला पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे मांडणे, याला प्रचंड धैर्य लागते. कोणत्याही प्रस्थापित विचारविश्वातील वैगुण्ये दाखवून मग नीरक्षीरविवेकानेच त्या विचारपरंपरेचा स्वीकार करण्याची ही दृष्टी आणि धैर्य संतविचारातून आपण शिकलो का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा.
आमच्या संपूर्ण संतपरंपरेतच हे भान जागृत आहे. वेद ढीग काहीही म्हणो, त्यातून आम्हांला अपेक्षित असणारा आणि आमची इच्छापूर्ती करणारा तेवढाच भाग आम्ही स्वीकारू, असे ठणठणीतपणे सांगणारा ‘‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकांचि साधिला। विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।’’ तुकोबांचा बाणा याच विवेकनिष्ठेवर अधिष्ठित आहे. वैदिक परंपरेसारख्या कोणत्याही वैचारिक अथवा कर्मकांडात्मक संचिताच्या सूक्तासुक्ततेबाबत प्रश्न उभे करण्याचे धाडस या अस्सल विवेकनिष्ठेमधूनच प्रसवते. हेच जाज्ज्वल्य भान तुकोबांचे शिष्यत्व मनोमन स्वीकारणाऱ्या बहिणाबाईंच्या ठायीही बिंबल्याचा ठोस पुरावा त्यांच्या एका आत्मचरित्रपर अभंगात सापडतो. स्त्री ही मोक्षाच्या मार्गावरची आणि म्हणूनच परमार्थातील एक मोठी धोंड होय, असे पुराणांचे दाखले आहेत. स्त्रियांच्या संगतीमुळे परमार्थसाधन होत नाही, असे हाकारे वेद-पुराणादी प्राचीन साहित्य वारंवार देत असते. स्त्री हीसुद्धा पुरुषासारखीच निसर्गाची निर्मिती. मग, जन्मजात स्त्रीदेह लाभलेल्या माझ्यासारखीने परमार्थ करायचा की नाही, असा रोकडा सवाल बहिणाबाई १७ व्या शतकात उपस्थित करतात. संतविचाराचा पीळ हा असा आहे. परंपरेचा, पारंपरिक ज्ञानाचा, एखाद्या वरचढ विचारव्यूहाचा स्वीकार हा ज्याने त्याने विवेकनिष्ठेनेच करायचा असतो, हा या सगळ्यातील गाभा आम्हांला उमगलेला आहे का?
हे सगळे केवळ परमार्थाच्या प्रांतापुरतेच लागू होते, असे समजणे ही तर अडाणीपणाची हद्द. ‘वॉशिंग्टन कन्सेन्सस्’ सारखी अर्थविचारातील धोरणात्मक चौकट जगातील अनेक देशांनी स्वीकारली ती जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या बलदंडांनी तिची भलामण केली म्हणून. तिची योग्यायोग्यता तपासून बघण्याचे धैर्य आणि विवेक दाखवणारे किती जण होते जगात?