उत्सुकता ताणत न्यायची आणि प्रत्यक्षात करायची वेळ येते तेव्हा ‘शक्य नाही’ म्हणत माघार घ्यायची.. भारतीय रिझव्र्ह बँकेच्या या अगतिकतेला आपण गेली अडीच-तीन वर्षे चांगलेच सरावलो आहोत. पण जगभरातील तज्ज्ञांनी केलेली सारी भाकिते झूट ठरवीत अमेरिकेची मध्यवर्ती पतनियामक यंत्रणा – फेडरल रिझव्र्हनेही हे चकवातंत्र सध्या अनुसरलेले दिसते. दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर बहुचर्चित रोखे खरेदी कार्यक्रम तूर्तास गुंडाळणार नसल्याचे फेडने स्पष्ट केले. चलनवाढ आणि रोजगाराबाबत चित्रही अपेक्षेप्रमाणे सुधारलेले नसणे वगैरे तेथील अर्थव्यवस्थेच्या वाढीस ग्रहण लावणारी अंधूकशी छायाही दिसू नये, अशी काटेकोर दक्षता फेडच्या या निर्णयामागे आहे. म्हणूनच अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी जवळपास कवडीमोल बनलेल्या सरकारी रोख्यांची, तीही दरमहा तब्बल ८५ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी खरेदी यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय फेडच्या या बैठकीअंती घेण्यात आला. त्याबाबत आढावा आता फेडच्या दीड महिन्यानंतर येणाऱ्या पुढच्या बैठकीत आणि बहुधा फेडच्या अध्यक्षपदावरून बेन बर्नान्के पायउतार झाल्यावर घेतला जाईल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे हित पाहून घेतल्या गेलेल्या या निर्णयाचा परिणाम मात्र भारतासारख्या कडेलोटाला पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेसाठी तात्पुरता दिलाशाचा ठरला आहे. कारण याचा दुसरा पैलू असा की, जगभरातील भांडवली बाजारातील द्रवता अर्थात डॉलरचा ओघ सुरू राहील याची खबरदारी फेडच्या ताज्या निर्णयातून घेतली गेली आहे. आपल्या शेअर बाजारात निर्देशांकाने मोठी उसळी घेत दिलेल्या सलामीने याचा प्रत्यय दिला. तर डॉलरपुढे नांगी टाकलेल्या रुपयाला चांगलीच बळकटी मिळाल्याचे दिसून आले. शेअर बाजारातील हर्षोल्हासाने देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे उभ्या आव्हानांचा विसर स्वाभाविकच पडताना दिसतो आणि तो तसा मात्र होऊ नये. आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फेडच्या या निर्णयाचे साद-पडसाद काय हे आज रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन आपल्या पहिल्या पतधोरणातून नेमके पुढे आणतील. किंबहुना फेडच्या निर्णयाची राजन यांनाही उत्सुकता होती. म्हणूनच त्यांनी फेडच्या बैठकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर आपले हे पतधोरण मांडणे पसंत केले. बाह्य़ जगतातील ही साधी घडामोडही आपल्या सबंध अर्थव्यवस्थेत उलटफेर निर्माण करते, अशा नाजूक वळणावर आपण येऊन ठेपलो आहोत याची ही कबुलीच म्हणावयास हवी. अत्यंत वाईट तऱ्हेने फरफट आणि मार रुपयाने गेल्या काही दिवसांत खाल्ला आहे. रुपयाला सावरायचे तर दुर्लभ झालेला विदेशातून भांडवलाचा ओघ सुरू राहील असा दिलासा फेडच्या बेन बर्नान्के यांनी राजन यांना दिला आहे. ढासळत्या रुपयाकडून, राजन यांचे लक्ष हे चांगल्या पावसानंतरही आटोक्यात न येणारी महागाई, चिंताजनक बनलेले तुटीला सांधणारे ठिगळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा शोचनीय बनलेला दर उंचावण्यासारख्या आव्हानांकडे वळवण्याची उसंत मिळाली आहे. पुढील काही महिन्यांत केंद्रातील सरकार निवडणूकमय बनेल. तेव्हा सुस्ती व अनास्थेचे खाचखळगे वाढत जाण्याआधी अर्थव्यवस्थेला निश्चित गती देणारा घाव घालण्याची संधी आणि निमित्तही राजन यांना आयतेच मिळाले आहे. अमेरिकी फेडच्या या कृपामर्जीचे ‘पांग’ ते कितपत व कसे फेडतात हेच आता पाहायचे.