News Flash

इतिहासाचे अखंड वर्तमान

जबाबदार वरिष्ठ पदावरील व्यक्ती जोवर गतकाळातील घटनांबद्दल माफी मागत नाही, तोवर त्या घटनांमागचे विचारप्रवाह जिवंतच आहेत, असे मानले जाते.

| April 12, 2014 01:10 am

जबाबदार वरिष्ठ पदावरील व्यक्ती जोवर गतकाळातील घटनांबद्दल माफी मागत नाही, तोवर त्या घटनांमागचे विचारप्रवाह जिवंतच आहेत, असे मानले जाते. इतिहास अखंड ठेवून वर्तमानात शांतता शोधायची, तर मानापमान विसरावे लागतात, हे आर्यलडच्या अध्यक्षांना मात्र कळले.
इतिहासापासून दूर न पळता आम्ही झाल्या प्रकाराबद्दल माफी मागतो, असे एखाद्या राष्ट्रप्रमुखाकडून ऐकावयास मिळणे हा ऐतिहासिक आणि दुर्मीळही क्षण असतो. असा दुर्मीळ क्षण आर्यलडचे अध्यक्ष मायकल हिगिन्स यांच्या सरत्या आठवडय़ातील ब्रिटन-भेटीत आला. हिगिन्स म्हणाले की – इतिहासापासून आम्हाला दूर जायचे नाही, कारण ज्या लोकांनी आप्तजन गमावले आहेत, ज्यांचे नुकसान झाले आहे, ते लोक इतिहास विसरूच शकणार नाहीत. मात्र या हानीची जबाबदारी आमची असल्याने त्याबद्दल माफी मागूनच आम्हाला ब्रिटनशी पुन्हा संबंध सुधारायचे आहेत. वास्तविक आर्यलड आणि ब्रिटनचे सख्य अगदी आत्ता-आत्तापर्यंत विळ्याभोपळ्याचेच होते. इंग्रजीपेक्षा निराळी आयरिश भाषा बोलणारा आर्यलड १९४८ पर्यंत ब्रिटनची वसाहत होता. भारत आर्यलडच्या एक वर्ष अगोदर सार्वभौम देश झाला. या पारतंत्र्यातून किमान स्वयंशासनाचा अधिकार तरी द्या, अशी मागणी करणारी होमरूल चळवळ आर्यलडमध्येच सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झाली आणि अ‍ॅनी बेझंट यांच्या रूपाने भारतात आली. बेझंटबाईंच्या मायदेशात आयरिश रिपब्लिकन ब्रदरहूड या संघटनेने, होमरूल-स्वराज्याऐवजी प्रांतिक सरकारच देणाऱ्या ब्रिटनविरुद्ध सशस्त्र लढा पुकारला होता. त्याच्या परिणामी १९२२ साली आर्यलडला वसाहतिक स्वराज्य मिळाले आणि त्याच वेळी, उत्तर आर्यलडच्या प्रांतिक सभेमार्फत मतभेदाचा ठराव करवून घेऊन, वसाहतवादी ब्रिटिशांचे फाळणीखोर राजकारणही सुरू झाले. हा उत्तर आर्यलड आजही ब्रिटनचाच भाग आहे आणि नकाशात पाहिल्यास आयरिश बेटाचा लचका तोडल्यासारखाच तो दिसतो. स्वतंत्र झाल्यावर आर्यलडने प्राधान्य दिले ते उत्तर आर्यलड परत मिळवून अखंड आर्यलड स्थापण्याच्या लढय़ाला. उत्तर आर्यलडमधील आयआरए- आयरिश रिपब्लिकन आर्मी- या हिंसक संघटनेने गेल्या दशकापर्यंत, म्हणजे सुमारे ५० वर्षे थयथयाट चालवून शेकडो माणसे मारली. कावा असा की, याच वेळी शिन फेन हा आयआरएचा राजकीय मुखवटा असलेला पक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरून, उत्तर आर्यलडच्या प्रांतिक सभेत आणि ब्रिटनच्याही पार्लमेंटावर आपले प्रतिनिधी पाठवत राहिला. एक ना एक दिवस ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य हिसकावून घ्यायचेच आहे आणि अखंड आर्यलडचे स्वप्न साकारायचेच आहे, अशी राजकीय भूमिका आत्ता-आत्तापर्यंत हा शिन फेन पक्ष मांडत होता. या अखंडतावाद्यांच्या ऐतिहासिक जखमेवर फुंकर घालण्याचे किती तरी प्रयत्न आजवर व्यर्थ ठरले आहेत. अखंडतावादाचा आगडोंब साधासुधा नाही. उत्तर आर्यलडचा लचका तोडणे ब्रिटिशांना ज्यामुळे शक्य झाले, असे कलम त्या वेळच्या- म्हणजे १९१९ ते १९२२ पर्यंत चाललेल्या युद्धातील आयरिश रिपब्लिकन ब्रदरहूडचा सरसेनापती मायकल कॉलिन्स याने तहात राहू दिले होते. तहानंतर या मायकल कॉलिन्सचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्याबद्दल बोलणे सच्च्या आयरिश अखंडतावाद्यांना आजही आवडत नाही. एखाद्याच मृत्यूचे काय एवढे, असा त्यांचा प्रश्न. मायकल कॉलिन्स यांना अखंड आर्यलडला सुरुंग लावणारा फितूर ठरवूनच त्यांची हत्या केली गेली, हा आजही केवळ एक अंदाज आहे.
इतिहास हा असा असताना माफीची भाषा करणे म्हणजेच वर्तमानापासून इतिहासाला तोडणे नव्हे काय? ज्याबद्दल माफी मागितली जाते तो गतकाळ ठरतो. किंबहुना जबाबदार वरिष्ठ पदावरील व्यक्ती जोवर गतकाळातील घटनांबद्दल माफी मागत नाही, तोवर त्या घटनांमागचे विचारप्रवाह जिवंतच आहेत, असे मानले जाते. आर्यलडच्या विद्यमान अध्यक्षांनी आयरिश अखंडतावादाच्या गेल्या अर्धशतकाच्या ‘लढय़ा’तील घटनांबद्दल माफी मागण्याची तयारी दाखवून न थांबता, ब्रिटनला नुकतीच अधिकृत भेट दिली. हा १९४८ पासून आर्यलडच्या राष्ट्रप्रमुखाने केलेला पहिलाच ब्रिटन दौरा. एवढेच नव्हे तर, ब्रिटनच्या राणीला भेटण्यापूर्वी ब्रिटिश राजघराण्याच्या गोतावळ्याची थडगी जेथे आहेत त्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीमध्ये आयरिश अध्यक्ष पोहोचले आणि नेमके लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्याच थडग्यापाशी उभे राहून त्यांनी अभिवादन केले.  माउंटबॅटन आपल्याला भारताचे अखेरचे ब्रिटिश व्हाइसरॉय म्हणून माहीत असले, तरी आर्यलडमध्ये त्यांची निराळी ओळख आहे.. भारतातून आर्यलडमध्ये राणीचे सेवक म्हणून गेलेले माउंटबॅटन १९७९ मध्ये आयरिश अखंडतावाद्यांच्या हिंसेचा पहिला उच्चपदस्थ बळी ठरले होते. तेव्हा त्यांच्या थडग्यापुढे मान तुकवणारे, माफीची भाषा करणारे आणि ब्रिटनच्या राणीच्या राजवाडय़ात चहापाणी घेणारे मायकल हिगिन्स हे मायकल कॉलिन्सपेक्षाही मोठे गद्दार, घातक फितूर ठरवले गेल्यास नवल नव्हते. त्याहीपेक्षा, शिन फेनचे नेते मार्टिन मॅक्गिनीज हेही २०११ सालीच आयआरए व शिन फेन यांनी ब्रिटिश राजघराण्यावर घातलेला बहिष्कार विसरून हिगिन्स यांच्या स्वागतार्थ राणीने दिलेल्या मेजवानीसाठी राजवाडय़ात जातात, राणीशी हस्तांदोलन करतात, हे अधिक फंदफितुरीचे मानले जाण्यास प्रत्यवाय नव्हता.
तसे झाले नाही, याची कारणे ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या कार्यकाळापासून शोधावी लागतील. ऐंशीच्या दशकात थॅचर यांनी उत्तर आर्यलडच्या अखंडतावादाला दहशतवादच मानून कठोर कारवाई सुरू केली. अर्थात यामुळे नुकसानच अधिक झाले आणि थॅचर यांची लोकप्रियताही कमालीची घटली. परंतु दणका मिळू शकतो, हे समजले. त्यांच्यानंतर आलेले जॉन मेजर यांनी तातडीने सुरू केलेली शांततेची वाटाघाट थोडीफार पुढे जाऊ शकली. अगदी परंतु आयआरएने हिंसक कारवाया बंद करण्याचे ठरवले ते २००५ मध्ये, म्हणजे मजूर पक्षाचे टोनी ब्लेअर यांच्या कार्यकाळात. या ब्लेअर यांनी आयआरएचा ‘दहशतवाद’ हा अंतर्गत मामला न मानता आर्यलडला चर्चेत पूर्णत: सहभागी करून घेतल्याने चक्रे फिरली. उत्तर आर्यलडला अधिक स्वायत्तता मिळाली आणि मुख्य म्हणजे, गेल्या दहा वर्षांत ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आयआरएकडे दहशतवादी म्हणून पाहिलेले नाही. म्हणून उत्तर आर्यलडचा प्रश्न संपला असे नव्हे आणि अखंडतावादाचे गारूड तर पिढय़ान्पिढय़ा कायम राहणारेच असते. अस्मितावादी, भावनिक प्रश्न सहजपणे सांस्कृतिक होतात आणि त्यांचे राजकारण करणे नेहमीच सोपे असते. तसे आजही सुरू आहे, पण या राजकारणाची हिंसक नखे बोथटच ठेवण्यात दोन्ही बाजूंना यश आलेले आहे. उत्तर आर्यलडचा तिढा आर्यलडची मदत घेऊन त्रिपक्षीय मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न १९७०च्या दशकातही झाले, पण आर्यलडला त्रिपक्षातला एक पक्ष मानण्यावर न थांबता त्या देशाशी संबंधवृद्धी ब्लेअर यांनी सुरू केली. याचे फळ म्हणजे आयरिश अध्यक्ष हिगिन्स यांची ताजी ब्रिटनभेट. अशा भेटींनी प्रश्न संपत नाहीत. यापूर्वी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ २०११ च्या मे महिन्यात उत्तर आर्यलडला- म्हणजे ब्रिटिश इलाख्यातच- गेल्या तेव्हा मॅक्गिनीज यांनी शिन फेनचा आदेश बाजूला ठेवून राणीची भेट घेतली, म्हणून लोक उलट खवळलेच. परंतु अशा भेटी-दौऱ्यांतून शांततेची वाट रुंदावते हे खरे.
अखंडतावादाच्या इतिहासातून आपण स्वत:ची सुटका करून घेत नाही, तोवर इतिहासाची अखंडता आपल्या मानगुटीवर बसणार हे दोन्ही बाजूंच्या आयरिशांपैकी काहींना कळते, काहींना नाही. इतिहास अखंड ठेवून वर्तमानात शांतता शोधायची, तर मानापमान विसरावे लागतात, हे आर्यलडच्या अध्यक्षांना कळले. गतकाळापैकी काय म्हणजे इतिहास नाही, हे ठरवताना अस्मितावाद किंवा स्वाभिमानही आड आला, तर मात्र वर्तमानाशी सांधेजोड कठीण ठरते. त्या कचाटय़ात उत्तर आर्यलडचे अखंडतावादी आजही असतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2014 1:10 am

Web Title: finally irish president michael higgins visit to uk
Next Stories
1 वाळूत तापल्या रेषा..
2 माँ, माटी आणि मुजोरी
3 औषधांचा आजार
Just Now!
X