स्वयंप्रेरणेतून येणाऱ्या शिस्तीवर चालणारा समाज म्हणजे ‘स्वराज्य’ होय. पण माणसे कर्तव्यनिष्ठेत कमी पडतात. तरीही त्यांच्यात पुरेसे सहकार्य घडवून आणण्यासाठी सक्तीची गरज पडते व सत्तेला मान्यता मिळते. पण हा उपायही निष्प्रभ ठरतो. कारण कोणी सत्तेने माजून कर्तव्यच्युत होते, तर कोणी सत्तेखाली चेपले जाऊन! सत्तेचा पुरवठा, तिच्या द्वेष, वैर व युद्धखोरी या कार्यबाह्य़ स्रोतांमुळे तिच्या कार्यात्मक गरजेपेक्षाही जास्त होत राहातो.
सत्ता ही गोष्ट एकदाची सज्जनांकडे आली की मग सारे कसे छान होईल, असे वाटत राहाणे म्हणजे भाबडेपणाची कमाल आहे. कारण सत्ताही टिकवणे आणि सज्जनताही टिकवणे हे फार तर क्वचित योगायोग म्हणूनच घडू शकते.
संसर्गजन्य रोगाप्रमाणे बेजबाबदारपणा फैलावत चालला आहे, याची चिंता सर्वानाच वाटते आहे. असे का होते? व हे कसे रोखता येईल? याचा विचार, कोणताही सुटसुटीत उपाय शोधण्याच्या फंदात न पडता, शांतपणे व सद्धान्तिक पातळीवर केला पाहिजे. म्हणूनच  आज आपण राजकीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा सिद्धान्त (थिअरी) समजावून घेऊ. कारण या सिद्धान्ताचे आकलन नसल्यामुळे, बऱ्याच गल्लती व गफलती होत राहातात. आजचा ‘तास’ थिअरीचा आहे, क्षमस्व!
कर्तव्यनिष्ठा का कमी पडतात? व कर्तव्यच्युती का होत राहातात? हे समजण्यासाठी आपल्याला, प्रथम कर्तव्यांचे तीन मूलभूत प्रकार लक्षात घ्यावे लागतील.
१) आत्मोद्धारक : माणसाला असणाऱ्या कर्तव्यांपकी पहिले कर्तव्य हे स्वत:प्रती असते व ते वैकल्पिक (ऑप्शनल) असते. म्हणजेच त्यात कमी पडण्याबाबत, प्रौढ व्यक्तीवर बाहेरून काही लादण्याचा उपाय, प्राय: अशक्य असतो. पालक-बालक संबंधात, स्वत:प्रती असणारी कर्तव्ये शिकवणे, हा भाग येतो. स्वत:प्रती कर्तव्य म्हणजे, स्वत:च्या लहरीनुसार कसेही वागणे नसून, आत्मघात टाळणे आणि आत्मोद्धारासाठी झटणे होय. यावर असे वाटेल की माणूस स्वार्थी असल्याने तो हे कर्तव्य आपोआपच करेल! पण हे खरे नाही. जे प्रिय वाटते, ते जर आपोआपच श्रेयस्करही असते, तर अजून काय पाहिजे होते!
२) देय-आपूर्तीकारक : कर्तव्यांचा दुसरा प्रकार म्हणजे, मर्यादित इतरांसाठी अटींनिशी (कंडिशनल) करावयाची सकारात्मक कर्तव्ये. ही तुम्ही उक्त/अनुक्त, लिखित/अलिखित असे जे करार मान्य केलेले असतात त्यातून उद्भवतात. या कर्तव्यांत पारस्परिकता असते. वादा पूर्ण करणाऱ्यालाच दावा सांगता येतो. ही कर्तव्ये व त्यातून मिळणारे हक्क या दोन्ही गोष्टी, पोषणात्मक स्वरूपाच्या व पुरवठय़ावर अवलंबून असणाऱ्या असतात. म्हणजेच कितीजणांसाठी किती कर्तव्य करायचे? याच्या प्रेरणाच नव्हे तर क्षमतासुद्धा मर्यादित प्रमाणातच उपलब्ध असतात.
३) सार्वकि-पथ्यकारक : तिसऱ्या प्रकारची कर्तव्ये ही सर्वाप्रती व विनाअट (अनकंडिशनल) बंधनकारक असतात. पण ही न-करणात्मक, म्हणजे काही गोष्टी करण्यापासून स्वत:ला रोखण्याची (टु रिफ्रेन फ्रॉम) कर्तव्ये असतात. तिसऱ्या प्रकारच्या कर्तव्यांना ‘अनाक्रमण’ असे एकत्र नाव देता येईल. इतरांना, हानी/इजा/क्षती न पोहोचवणे हे कर्तव्य आणि इतरांकडूनही अनाक्रमण पाळले जाईल हा अधिकार, यात मिळतो. यात किती पुरवठा? हा प्रश्न नसतो. एका नागरिकाला अन्य नागरिकावर आक्रमण करण्यापासून रोखताना लागेल तितकीच सक्ती करण्याचा नतिक अधिकार राज्यसंस्थेला असतो. हे तिचे रक्षणात्मक कर्तव्य होय.  
कल्याणकारी राज्य मात्र, पोषणात्मक कर्तव्येदेखील अंगावर घेते. या राज्याला लोकप्रियतेसाठी, पोषणात्मक हक्क बहाल करत सुटण्याचा मोह होतो. स्वयंस्फूर्तपणे तर सोडाच, पण सक्तीचा अधिकार वापरूनही, जर तेवढी पोषणात्मक कर्तव्ये करवून घेता आली नाहीत, तर हे हक्क पोकळ राहतात व ते दिल्याचा देखावा जपण्यासाठी भ्रष्टाचार आवश्यक होऊन बसतो. तसेच राज्याची सक्तीची क्षमतासुद्धा मर्यादित असल्याने व ती पोषणात्मक कर्तव्यांत खर्ची पडल्याने, मूळ रक्षणात्मक कर्तव्यात ते कमी पडू लागते!
दुष्टचक्र का व कसे निर्माण होते?
देय-आपूर्ती प्रकारच्या कर्तव्यात चुकारपणा करणारे (इव्हेडर्स) आणि सार्वकि-पथ्ये तोडून इतरांवर अतिक्रमण करणारे (इन्व्हेडर्स) असतातच. आत्मोद्धारक कर्तव्यातील कर्तव्यच्युतीला, आत्मघातकीपणा (सेल्फ-हाìमग) व आत्मोद्धाराचा अभाव (लॅक ऑफ सेल्फ एनहान्समेंट) असे म्हणता येईल. तीनही दोषांचे दुष्टचक्र बनते. दुष्टचक्र म्हटल्यावर ते सुरू कोठून का होईना! पण जिथे तोडायची संधी मिळेल तिथे ते तोडायचे, हे महत्त्वाचे.
स्वत:प्रती कर्तव्य ही कल्पना राजकीय-तत्त्वज्ञानात उपेक्षित राहिली आहे. तेव्हा मुद्दाम तिच्यापासून सुरुवात करतो. आत्मघातकी दुर्गुण कितीतरी आहेत. आसक्ती (व्यसन), घृणा, ढिलाई, गहाळपणा, अज्ञान, अंधश्रद्धा, अनावर-सवयी (ऑब्सेशन्स), गोंधळलेपणा, भित्रेपणा, लाज, आखडूपणा, अल्पसंतुष्टता, दैववाद आणि विविध सांस्कृतिक भंपकपणा; ही यादी बरीच वाढवता येईल. येथे मुख्य मुद्दा असा आहे की, या दुर्गुणांमुळे माणूस स्वत: दु:स्थिती भोगतोच. पण स्वत:ला अक्षम करून घेतल्याने, इतरांप्रतीच्या (देय-आपूर्ती) कर्तव्यांबाबत कर्तव्यच्युत होतो. अर्थात आत्मोद्धारक सद्गुण ही शक्ती विरुद्ध दिशेने कार्यरत असते. हे सद्गुण कोणते? ते तुम्ही दुर्गुणांवरून तर्काने (इन्फरन्स) ओळखू  शकता.
करार मोडले जाऊ लागले की संबंधित पक्ष ‘त्यांनी तरी का पाळायचे?’ अशा पवित्र्यात जातात. कलह, वितुष्टे, वाढत जातात व एकूण समृद्धीच घटते. कलह सोडविण्याची व्यवस्था कमी पडू लागली, की कलह सोडविण्याचे आक्रमक मार्ग अवलंबिले जाऊ लागतात.
येथे कर्तव्यच्युती तिसऱ्या प्रांतात शिरते. गुन्हेगारी, दंगली, युद्धे वाढू लागतात.
परंतु ‘सर्वाचे सर्वाशी युद्ध’  ही जीवनातील सामान्यस्थिती म्हणून टिकूच शकत नाही. त्या त्या पातळीवरचे दुर्बल एकमेकांशी एकजुटी (अलायन्सेस) करून, आणि/किंवा सबलांच्या आश्रयाला(पॅट्रनेज) जाऊन, एक पिरॅमिडल बलरचना स्थिरावते. त्याचवेळी अनाक्रमणाचे महत्त्व सर्वानाच पटून ‘अनाक्रमण राखणाऱ्या बलवानांना’ अधिमान्यता (लेजिटिमसी) प्राप्त होते. अधिमान्यताप्राप्त बल म्हणजे राजसत्ता होय. अधिमान्यता प्रत्यक्ष संमतीने मिळवणे म्हणजे लोकशाही होय. राजसत्तेने लोकांना तिसऱ्या व दुसऱ्या प्रकारच्या कर्तव्यच्युती करण्यापासून वठणीवर आणण्याचा प्रयत्न करणे अभिप्रेत असते. पण आत्मोद्धार करणे व आत्मघात टाळणे, हे मात्र नागरिकांनी स्वत:च करायचे असते.
कोणतेही कार्यसंघटन जर विवेकपूर्णरीत्या चालायचे असेल, तर प्रत्येकाला जेवढी जबाबदारी दिली असेल, ती पार पाडण्याकरिता पुरतील इतके अधिकार दिलेच पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात अशी सममिती राहात नाही. जे बलवान असतात ते, जबाबदारी कमी आणि तिच्या मानाने अधिकार जास्त अशी स्थाने पटकावतात व शोषण करतात. जे बलहीन असतात ते, अशा स्थानांवर ढकलले जातात, जेथे पुरेसे अधिकार न मिळाल्याने जबाबदारी पार पडताना शोषित बनतात. बलवान हे माजल्याने कर्तव्यच्युत होतात तर बलहीन हे चेपले गेल्याने कर्तव्यच्युत होतात. अशा तऱ्हेने कर्तव्यच्युतीपासून सुरू झालेले चक्र कर्तव्यच्युतीतच परिणत होते. हेच मुख्य दुष्टचक्र होय.
आता प्रश्न असा येतो की ‘अधिकार=जबाबदारी’ हे समीकरण कधीच का जुळत नाही? हे समीकरण जुळवणे हा जर फक्त ‘संघटनाकौशल्याचा प्रश्न’ असता तर ठीक होते. पण हे समीकरण न जुळण्यामागे एक गंभीर कारण असते. ते असे की, सत्तेची जितपत कार्यात्मक गरज असते, तिच्यापेक्षा सत्तेचा पुरवठा नेहमीच वरकड असतो. असे का व्हावे? हे समजण्यासाठी अतिरिक्त बलाचा मूलस्रोत कोणता हे स्पष्ट असले पाहिजे.
द्वेष/वैर/युद्धखोरी हा बलाचा मूलस्रोत  
अंततोगत्वा (इन द फायनल अ‍ॅनालिसिस) युद्ध हाच बलाचा मूलस्रोत असतो. कारण बलवान-बलहीन हा संबंध प्राथमिकत: युद्धातील जेता व जित यांच्यातील संबंध असतो.  दुíभक्षजन्य युद्धे समृद्धीमुळे टळू शकतात. पण सत्तापिपासेचे समाधान कधी होऊ शकत नाही. कारण ती नेहमीच तुलनेने अतृप्त राहत जाते. यामुळे प्रत्येक जेत्याचा मत्सर करणारे संभाव्य जेते टपून असतात. विविध प्रकारचे द्वेष व वैर निर्माण केल्याशिवाय त्यांना युद्ध किंवा युद्धसदृश स्थिती आणता येत नाही. म्हणूनच अतृप्त सत्ताकांक्षी, द्वेष पेरण्याचे काम करतात. शोषण करणाऱ्यांपेक्षाही द्वेष पेरणारे जास्त घातक होत. कारण शोषकांना बलाचा पुरवठा तेच करत असतात.  जोपर्यंत आपण सत्तेचा अतिरिक्त पुरवठा कमी करत नाही तोपर्यंत, ‘माजून वा चेपले जाऊन’ कर्तव्यच्युती घडतच राहाणार व जबाबदारी-न्यून (रिस्पॉन्सिबिलिटी डेफिसिट) घटवण्याचे प्रबोधनात्मक उपाय यशस्वी होणार नाहीत. म्हणूनच शक्यतो शांतता व अिहसा राखणे आवश्यक ठरते.  हे सर्व लक्षात घेता, मूलगामी परिवर्तनाचा मार्ग, ‘चांगल्या माणसाकडे सत्ता येणे’ हा नाही. तर खरा मार्ग म्हणजे १. दुíभक्ष दूर करणे, २. स्वयंप्रेरिततेला झेपेल इतपतच कर्तव्ये स्वीकारून कर्तव्यच्युती रोखणे, ३. सक्तीकडून संमतीकडे असा प्रवास सर्वच संस्थांत घडविणे, ४. करार स्पष्ट करून कसोशीने पाळणे, ५. अन्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करणे व न करू देणे, ६. वैर, द्वेष, समूहवाद व अस्मिताबाजी गोष्टी कटाक्षाने टाळणे, ७. आत्मघातकी दुर्गुण कमी करणे व आत्मोद्धारक सद्गुण वाढीस लावणे.  
हा मार्ग ‘ढॅण्टडँड’ नाहीये, पण तोच खरा आहे! या सिद्धान्ताला उत्तरदायित्ववाद (रिस्पॉन्सिबिलिटेरियनिझम) असे नाव देता येईल.
लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!