News Flash

‘तयार’ मसाला!

ज्यांना आजकाल ‘नॅशनल बेस्टसेलर’ असं म्हटलं जातं, त्यापैकी या दोन कादंबऱ्या आहेत. त्यांची फक्त ओळख करून देणं, हा ‘लोकसत्ता- बुकमार्क’चा हेतू अर्थातच नाही.

| May 24, 2014 01:18 am

ज्यांना आजकाल ‘नॅशनल बेस्टसेलर’ असं म्हटलं जातं, त्यापैकी या दोन कादंबऱ्या आहेत. त्यांची फक्त ओळख करून देणं, हा ‘लोकसत्ता- बुकमार्क’चा हेतू अर्थातच नाही. वाचायला सोप्पी, उत्कंठा कायम ठेवून वाचणाऱ्यांना एखाद्या क्षेत्राची थोडीफार माहितीदेखील देणारी आणि तरीही साचेबंदच असल्यामुळे ‘त्रास न होता’ वाचता येणारी.. अशीच ही पुस्तकं असतात ना, याचा हा ताळाच. पण, साहित्याचा खप आणि ग्राहकता यांबद्दल पुढली गणितं मांडायला उद्युक्त करणारा..
पुस्तकांतील कथा उचलून त्याचा चित्रपट बनवण्याचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये प्रचलित आहे. चेतन भगतच्या तीन पुस्तकांवरून बनलेले चित्रपट याचंच उदाहरण आहे. त्याआधीही अनेकदा कादंबरी किंवा पुस्तकातील कथा चित्रपटाचे सूत्र बनल्याचे दाखले देता येतील. पण कादंबऱ्या काही चित्रपट बनावा यासाठी लिहिल्या जात नाहीत. नीरज पांडेंच्या ‘गालिब डेंजर’बाबत मात्र नक्की म्हणता येईल की चित्रपट डोक्यात ठेवूनच ही कादंबरी लिहिली गेली असावी. याचं पहिलं कारण म्हणजे, पुस्तकाचा लेखक म्हणजेच नीरज पांडे हे बॉलीवूडमधील एक प्रथितयश दिग्दर्शक आहेत. दुसरं म्हणजे, हे पुस्तक वाचकाला मुंबईच्या कुप्रसिद्ध अंडरवर्ल्डची सफर घडवतं आणि तिसरं म्हणजे, बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी एखाद्या चित्रपटाला हवा असलेला अ‍ॅक्शन, रोमान्स, सस्पेन्स असा सर्व मसाला या पुस्तकात भरला आहे.
‘गालिब डेंजर’चं कथासूत्र अजिबात नवीन नाही. अमिताभ बच्चन ‘अँग्री यंग’ असताना त्याने भूमिका केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये सर्रास आढळणारी कथा ‘गालिब डेंजर’ची कथा आहे. उत्तर प्रदेशमधील कासिमगढमध्ये राहणारा कामरान अली खान मुंबईत काम करून आपलं नशीब चमकवण्यासाठी येतो. येथे तो टॅक्सी चालवू लागतो आणि लवकरच त्याला प्रेयसीही भेटते. असं रोमँटिक वातावरण असतानाच कामरानच्या टॅक्सीत बसलेल्या एका प्रवाशावर गोळय़ा झाडण्यात येतात. कामरान तत्परता दाखवून त्या प्रवाशाला रुग्णालयात नेतो आणि त्याचे प्राण वाचतात. हा प्रवासी म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डचा बादशाह मिर्झा साहेब. मिर्झाच्या मर्जीमुळे कामरानचा अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश होतो आणि बुद्धिमत्ता व धाडसाच्या जोरावर तो अंडरवर्ल्डच्या आघाडीचा डॉन म्हणून ओळखला जाऊ लागतो. मिर्झाचे शायरीवरील विशेषत: गालिबच्या शायरीवरील प्रेम कामरानलाही गालिबच्या प्रेमात पाडते आणि मग कामरान अली खान ‘गालिब डेंजर’ नावानेच प्रसिद्ध होतो.
कादंबरीतील कथेमध्ये नवीन काही नाही. हा साचा घेऊन बॉलीवूडमध्ये असंख्य चित्रपट तयार झाले आहेत. त्यामुळे ‘गालिब डेंजर’चा प्रवास आधीच आपल्या लक्षात येत जातो. गरिबीतून आलेल्या तरुणाचा अपघाताने अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश, तेथे त्याचं वाढतं प्रस्थ, प्रेमत्रिकोण, अंडरवर्ल्डमधील स्पर्धा, सूड, हिंसाचार अशा साचेबद्ध सूत्रातून ‘गालिब डेंजर’ची कथा पुढे सरकते. पण तरीही नीरज पांडे यांच्या शैलीमुळे ती उत्कंठावर्धक बनते. कादंबरीतील दोन प्रमुख पात्रांचे गालिबवरील प्रेम अधोरेखित करण्यासाठी पांडे यांनी पुस्तकात अनेक ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार गालिबचे शेर पुरवले आहेत. त्यामुळे कादंबरी अधिक वाचनीय होते. मुंबईतील अंडरवर्ल्ड ऐन भरात असलेल्या ७०च्या दशकातून कथा पुढे सरकून आजच्या काळात पोहोचते. हा काळप्रवास पांडे यांनी सहजपणे टिपला आहे. कादंबरीत अनेक पात्रे आहेत. मात्र, पांडे यांनी महत्त्वाच्या तीन-चार पात्रांभोवती कथासूत्र फिरवत ठेवून वाचकांना भरकटवण्याचा प्रयत्न केलेला नाही.
आधीच म्हटल्याप्रमाणे ‘गालिब डेंजर’ हे ‘मसाला मूव्ही’चं पुस्तकरूप आहे. त्यात भरपूर मसाला आणि मनोरंजन आहे. वीकेण्डला डिशटीव्हीवर लागलेले तेच तेच चित्रपट बघण्याचा कंटाळा आला असेल तर ‘मसाला’वाचनासाठी हे पुस्तक हाती घ्यायला हरकत नाही. पण अर्थातच हेदेखील  तुम्हाला तेच ते वाटू शकेल.
‘गालिब डेंजर’पेंग्विन बुक्स आणि ब्लू सॉल्ट
लेखक : नीरज पांडे
पृष्ठे २५५ , किंमत २५०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:18 am

Web Title: ghalib danger by neeraj pandey
Next Stories
1 ‘आप’ला म्हणू नये आपला!
2 बदलत्या काळाशी हातमिळवणी
3 विशलिस्ट
Just Now!
X