प्रापंचिक साधक असो की वरकरणी प्रपंच नसलेला साधक असो, सुरुवात कुठूनही आणि कोणत्याही स्थितीतून असो, मुक्काम तर एकच असतो! त्या मुक्कामाकडे जाण्यासाठीचे प्रयत्न वरकरणी सुरुवातीला भिन्न भासले तरी अखेरीस ते एकाच तऱ्हेचे होऊन जातात. भगवंताविषयीची तळमळ ही एकाच प्रकारची असते आणि एकदा ही तळमळ उत्पन्न झाली की बाह्य़रूपातले भेदही मावळून एकच स्थिती आकारू लागते. तेव्हा साधनेच्या सुरुवातीला कोण कसा आहे, याला महत्त्व नाही. अखेरीस कोण कसा झाला, मुक्कामाला पोहोचला का, यालाच महत्त्व आहे. मग या घडीला कुणी गरीब असेल, कुणी श्रीमंत असेल, कुणी प्रापंचिक असेल कुणी प्रापंचिक नसेल, कुणी नोकरीधंदा करीत असेल, कुणी व्यवसाय करीत असेल.. बाह्य़स्थिती आणि बाह्य़ कर्माची धाटणी वेगवेगळी असली तरी त्यात न अडकता अंतस्र्थिती आणि आंतरिक एकत्वासाठीच्या कर्माची धाटणी एकच असते. स्वामी स्वरूपानंद संकलित ‘श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओव्या हेच मार्गदर्शन करतात. यातील पहिली ओवी अशी-
अगा जया जें विहित। तें ईश्वराचें मनोगत। म्हणौनि केलिया निभ्रांत। सांपडे चि तो।।२२।। (अ. १८ / ९११)
प्रचलितार्थ : अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर नि:संशय प्राप्त होतो.
विशेषार्थ विवरण : आपल्या वाटय़ाला आलेलं कर्म हे खरं तर आपल्याच पूर्वकर्माचं फलस्वरूप आहे. आपला जन्म कुठे होणार, कोणत्या स्थितीत होणार, कोणत्या माणसांत होणार, हे सारं काही प्रारब्धानुसार ठरलेलं आहे. त्या जन्मानुरूप आणि भवतालच्या परिस्थितीनुरूप आपल्यावर संस्कार होतात. आपले प्रयत्न आणि प्रारब्धाचे फासे यातून आपण वाट काढत असतो. या वाटचालीतच आपण कर्म करीत असतो. आपल्याच वाटय़ाला हे कर्म का, आपल्याच वाटय़ाला ही परिस्थिती का, आपल्याच वाटय़ाला ही माणसं का, असा प्रश्न माणसाच्या मनात अधेमधे डोकावतो. जे प्रतिकूल भासतं ते बदलण्यासाठी तो प्रयत्नही करतो. सुखासाठी, अनुकूलतेसाठी, परिस्थिती आणि व्यक्ती आपल्या मनाजोगत्या व्हाव्यात यासाठी तो धडपडतो. तरीही त्यातून जे वाटय़ाला येतं ते स्वीकारून जगण्यावाचून त्याला गत्यंतर नसतं. आपल्या जीवनात अनेकदा हा अनुभव आपण घेतला आहे. साधी माणसं म्हणतात की, जशी देवाची इच्छा! तेव्हा माझ्या वाटय़ाला जे जीवन आलं आहे, जे विहित कर्म आलं आहे ती ईश्वराचीच इच्छा आहे. तो माझी परीक्षाही पाहात असेल, परिस्थितीशी झुंजायला लावून मला अधिक कणखरही बनवत असेल, माझ्या माणूसपणाची पडताळणी करीत असेल, माझ्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगणाऱ्यांविषयी माझ्यात सहवेदना आली का, त्याच्यासाठी लढण्याची प्रेरणा आली का, हे पाहात असेल. तेव्हा आहे त्याच परिस्थितीत मी पशुवत नव्हे, माणसासारखं जगू लागलो तर ईश्वराची भेट झाल्यावाचून राहणार नाही.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !