संगणकाने संकलनाची आणि ‘व्हिज्युअल इफेक्ट्स’ची कामे सहजसोपी होण्याआधीच्या काळात मात्र सिनेमॅटोग्राफर या कलावंताची सिनेमात दृश्यजीव ओतण्याची तारेवरची कसरत भीषण होती. हॉलीवुड स्टूडिओजची सद्दी उताराला लागण्याच्या, जगातील सिनेमामध्ये ‘न्यू वेव्ह’पासून विविध प्रवाही चित्रपटांचे आक्रमण होत असण्याच्या व प्रस्थापित संकल्पनांना धक्के देण्याची संकल्पनाच ‘प्रस्थापित’ होत असण्याच्या काळपटलावर गॉर्डन विलिस यांच्या धारदार सिनेमॅटोग्राफीच्या कारकिर्दीचा जन्म झाला. १९७१ साली ‘क्लूट’ या ‘फिल्म न्वार’ चित्रपटातील गडद सिनेमॅटोग्राफीच्या शिदोरीवर विलिस यांच्याकडे १९७२ साली आणखी एक गडद चित्रपटाचा प्रस्ताव आला.. तोच फ्रान्सिस फोर्ड कपोला यांचा ‘गॉडफादर’. १९७०च्या दशकाला परिणामकारकतेने दृश्यबंद करण्यामध्ये विलिस यांचे कार्य पाहायचे झाल्यास ‘गॉडफादर’ मालिका, वुडी अ‍ॅलनच्या शहरप्रेमाची कहाणी मांडणारे ‘मॅनहटन’, ‘अ‍ॅनी हॉल’, राष्ट्राध्यक्षांचा सातबारा उतरवून दाखविणारा ‘ऑल द प्रेसिडेण्ट्स मेन’ या महासिनेमांची नावे समोर येतात. दरएक चित्रपट दृश्यसाक्षर सिनेप्रेमींच्या डोक्यात (अन् आता हार्ड डिस्कमध्ये) मानाचे स्थान मिळविणारा आहे. एकोणीसशे सत्तरच्या दशकांत त्यांनी काम केलेले बहुतांश चित्रपट ऑस्कर स्पर्धेत गर्दी केलेले दिसतात. वडील हॉलीवूडचे वेषभूषाकार, पण गॉर्डन विलीस यांनी फोटोग्राफीची आवड. नौदलात काम केल्यावर जाहिरातक्षेत्रात दृश्यसंकल्पना विकसित करताना त्यांना चित्रपटाचा मार्ग सापडला.
गडद सावल्यांचा खेळ, दृश्याला अधिक परिणाम करताना तीव्रतम अंधाराचा वापर करत सिनेमॅटोग्राफीच्या नवसंकल्पना त्यांनी हाताळल्या. गॉडफादर चित्रत्रयीचा पहिला भाग या गडदचित्रणाच्या लाटेवरच यशाची नवी परिमाणे उभारून गेला. रंगीत चित्रपट दाखल होऊन दोन दशकांचा काळ लोटल्यानंतरही दृश्य अधिक ठाशीव करण्यासाठी कृष्णधवली अंधाराच्या प्रयोगांच्या अट्टहासामुळे त्यांना ‘प्रिन्स ऑफ श्ॉडो’ची उपाधी बहाल केली गेली. संगणकाने चित्रपटांचे दृश्यतंत्र सुधारण्याच्या गेल्या दोन दशकांत जगभरातील चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी ही आज लखलखीत दिसते. तरीही जोएल शूमाकरपासून ते हाँगकाँगच्या जॉनी टो या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये विलिस यांची प्रयोगी दृश्यपरंपरा जिवंत आहे. १९७०च्या दशकात दोन ‘गॉर्डन’अमेरिकी कलाप्रांत उजळून काढत होते.. पहिल्या ‘कॅप्टन फिक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी कथा-कादंबरी गॉर्डन लीश, तर दुसरे गॉर्डन विलिस.. त्यांनी सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये वारसदारांची न संपणारी फौज तयार केली.
विलिस यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने या वारसदारांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.