15 August 2020

News Flash

संघमार्गदर्शकप्रदीप!

संघ थोर का आहे हेच सांगण्याचा प्रस्तुत पुस्तकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याचे शीर्षक ‘सिक्रेट्स ऑफ आरएसएस’ (संघाचे रहस्य) असे असले तरी, त्यातून काही सुरस आणि

| June 22, 2013 12:24 pm

संघ थोर का आहे हेच सांगण्याचा प्रस्तुत पुस्तकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याचे शीर्षक ‘सिक्रेट्स ऑफ आरएसएस’ (संघाचे रहस्य) असे असले तरी, त्यातून काही सुरस आणि धक्कादायक हाती लागण्याची अपेक्षा नाही. संघाविषयी उत्सुकता असणाऱ्यांना संघाचा चेहरा समजून घेण्यासाठी आणि संघभक्तांना आपलाच चेहरा आरशात पाहण्यासाठी, आक्षेपांची जळमटे झटकून लावण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे आणि तेच याचे वैशिष्टय़ आहे.
संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे. ती मूलतत्त्ववादी आणि जातीयवादी आहे. चातुर्वण्र्याची पुरस्कर्ती आहे. स्वातंत्र्य चळवळीत संघाचा सहभाग नव्हता. फाळणीच्या वेळी संघाने फक्त विरोधाच्या गप्पाच मारल्या. केले काहीच नाही. झालेच तर संघाची ‘कुजबुज आघाडी’ असते. संघ ही अंतिमत: राजकीयच संघटना आहे..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच्या आक्षेप-आरोपांची यादी अशी बरीच मोठी आहे. असे आरोप करणारी माणसेही बरीच आहेत. ती जशी ‘झोत’कार         प्रा. रावसाहेब कसबे यांच्यासारखी संघाबाहेरची आहेत, तशीच गंगाधर इंदूरकर यांच्यासारखी संघनिकटवर्ती अशीही आहेत. रंगपटाच्या दोन्ही टोकांवरची माणसे जेव्हा सारख्याच प्रकारचे आक्षेप घेत असतात, तेव्हा ते असेच झटकून टाकता येत नाहीत. पण संघाचे वैशिष्टय़ हे की, संघ ते आक्षेप-आरोप झटकूनही टाकत नाही आणि त्यांना पटकन उत्तर देण्याच्याही भानगडीत पडत नाही. गंमत म्हणजे संघ स्वयंसेवकांना त्याचाही अभिमान असतो. अर्थात हे आरोप दुर्लक्षिणे वगरे केवळ बाहेरच्यांच्यासाठी. संघाच्या शाखांवर, प्रामुख्याने प्रदोष शाखांवरील बौद्धिकांतून मात्र अशा टीकारोपांचा सुयोग्य समाचार घेतला जातो. हल्ली ते काम समाजमाध्यमांतूनही केले जाते.
आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा संघाची भूमिका (खरे तर संघ स्वयंसेवकांची ‘वैयक्तिक’ भूमिका. संघ अधिकृतपणे फारच कमी वेळा बोलतो.) दोन प्रकारची असते. एक म्हणजे हे आरोप करणारे लोक संघद्वेष्टे, िहदूधर्मविरोधी, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी, जडवादी, भौतिकवादी वगरे वगरे आहेत, असे म्हणायचे आणि काय म्हणतो यापेक्षा कोण म्हणतो यावर बोट ठेवून ते म्हणणेच चुकीचे ठरवायचे. हा अ‍ॅड होमिनम नामक तर्कशास्त्रीय दोष झाला. पण साध्या संभाषणातही लोक तो सर्रास वापरतात, तेथे संघ स्वयंसेवकांनाच त्याबाबत नाव का ठेवायचे?आपल्यावरील आरोपांबाबत संघाची दुसरी भूमिका अशी असते, की लोकांमध्ये फारच अज्ञान, अंधकार आहे. संघाबद्दल त्यांना काहीच माहीत नसते. मुंबईतल्या विश्व अध्ययन केंद्राचे संस्थापक आणि संघ स्वयंसेवक रतन शारदा यांची तक्रार हीच आहे. संघ ही भारतातली एक जुनी जनसंघटना आहे. जगातील एक सर्वात मोठी ‘एनजीओ’ म्हणून तिची ओळख आहे. असे असतानाही तिच्याबद्दल लोकांना फार माहिती कशी नाही, याचे शारदा यांना आश्चर्य वाटते. ते लिहितात की, संघाबाबत फारच गोपनीयता वगरे पाळण्यात येते म्हणून लोकांना त्याबद्दल काही माहिती नसते, असे टीकाकार म्हणतात. पण ते काही खरे नाही. मुदलात टीकाकारांनाच संघ समजून घ्यायचा नसतो. पण ते काहीही असो. संघावर हा जो गोपनीयतेचा आरोप करण्यात येतो, तो खोडून काढायचा आणि टीकाकारांना असा आरोप करायची संधीच ठेवायची नाही, या हेतूने शारदा यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
पुस्तकाचे शीर्षक ‘सिक्रेट्स ऑफ आरएसएस : डीमिस्टिफाइंग द संघ’ असे मोठे सनसनाटी आहे. ते पाहताच असे वाटावे की, हे संघाची चिरफाड करणारे पुस्तक आहे. पण तसे अजिबात नाही. शारदा लिहितात, त्यांचा हेतू सनसनाटी निर्माण करणे हा नाही; तर संघाचे रहस्य आम्हाला ठाऊकच नाही, असे म्हणण्याचा वाव टीकाकारांना न ठेवणे, हे  उद्दिष्ट आहे. आता असे उद्दिष्ट ठेवून पुस्तक लिहायला बसल्यानंतर त्याचे स्वरूप ‘संघमार्गदर्शकप्रदीप’ वा तत्सम असणे हे स्वाभाविकच होते. या पुस्तकाने ते अगदी निष्ठेने केले आहे. म्हणजे संघाच्या घटनेतील प्रास्ताविकाचा आणि भूमिकेचा काही भाग, संघाच्या सार्थ प्रार्थना, संघटनात्मक रचना, भ्रातृसंघटना, प्रचारक नामक ‘संस्था’ यांची सखोल माहिती या पुस्तकातून मिळते. संघशाखा हा तर संघाचा आत्मा. शाखेतल्या प्रार्थना, खेळ आणि बौद्धिके या संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. त्यातली बौद्धिके हा अ-संघीष्ठांचा नव्हे, तर अनेकदा संघीष्ठांच्याही कौतुकाचा आणि विनोदाचा विषय असतो. यावर शारदा यांनी तब्बल ११ पाने खर्च केली आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना अक्षरश: घडवण्यासाठी संघामध्ये किती मेहनत घेतली जाते हे पाहिले की, तुम्ही भलेही संघविरोधक असा, पण संघाविषयी साक्षात नतमस्तक व्हावे, याखेरीज अन्य भावनाच तुमच्या मनात येऊ शकत नाही. केडर उभे करणे हे शिकावे तर संघाकडून किंवा साम्यवाद्यांकडून. संघासारखे निष्ठावंत कार्यकत्रे आपल्याकडे असावेत, असे बाळासाहेब ठाकरे यांनाही वाटत असे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. पण शाखा उभ्या करता येतात, बौद्धिकांचे वर्ग नाही. संघाचे बळ या बौद्धिकांमध्ये आहे, शाखांमध्ये दिल्या जाणाऱ्या मानवी संबंधांच्या व्यवस्थापन प्रशिक्षणात आहे, हे सेनेलाच काय, समाजवाद्यांनाही उमगले नाही. त्यांच्याही शाखा होत्या. त्या पुढे पूर्णपणेा खालसा झाल्या आणि कार्यकत्रे होते, ते जन्माचे गोंधळले.
संघशाखांतील बौद्धिकांमध्ये असे काय शिकवले जाते, हे पाहायचे असेल तर या पुस्तकातील अन्य मजकूर वाचलाच पाहिजे. संघाच्या सर्व तत्त्वज्ञानाचे सार येथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संघावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो बाळबोध आहे. प्रसंगी नाक्यावरच्या गप्पांमध्ये होणाऱ्या उथळ वादविवादांसारखाही आहे. म्हणजे संघावर जातीयवादाचा आरोप होतो ना, तर मग त्याविरोधात महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांचे प्रमाणपत्र पुढे करा. गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे संघशाखांना भेट दिल्यानंतर तेथील मागास जातींचे लोक पाहून कसे प्रभावित झाले, वगरे कहाण्या सांगा. आणि संघ कसा कर्माधिष्ठित वर्ण मानतो वगरे गोलगोल तर्क मांडा, असा प्रकार यात आहे. संघाचा ४२च्या चळवळीतील अ-सहभाग, फाळणीच्या वेळची भूमिका, सरदार पटेल यांची संघाबाबतची भूमिका, संघावरील बंदी याबाबत या पुस्तकात खुलासेवार लिहिलेले आहे. सरदार पटेल संघाचे सहानुभूतीदार होते की नव्हते हा आता वादविषय राहिलेला नाही. तरीही संघ स्वयंसेवकांनी सरदारांना आपलेसे मानलेले आहे. ‘दादाभाई गोपबन्धु: तिलको गान्धिरादृता:’ अशा प्रकारे गांधीजींचा वगरे संघाच्या प्रात:स्मरणीय एकात्मतास्तोत्रात समावेश आहे. तेथे पटेलनाम का नाही, असा प्रश्न पडावा इतके आपलेसे मानले आहे. तेव्हा संघ-पटेल-नेहरू या विषयावर या पुस्तकात एक प्रकरण असणे स्वाभाविकच होते. तसे ते परिशिष्ट म्हणून जोडलेले आहे. गोळवलकर गुरुजी यांच्या रंगा हरि लिखित चरित्रातील एका प्रकरणातील काही भाग असे त्याचे स्वरूप आहे. त्याचे वैशिष्टय़ असे की, ते संपूर्ण प्रकरण, पटेल यांच्या मनी संघाप्रती सहानुभूती होती हा समज पूर्ण पुसून काढणारे आहे. असे धक्के हे पुस्तक अधूनमधून देते पण तितकेच. संघ थोर का आहे हेच सांगण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुस्तकाचे नाव ‘सिक्रेट्स ऑफ आरएसएस’ (संघाचे रहस्य) असे असले तरी, मुळातच त्यातून काही सुरस आणि धक्कादायक हाती लागण्याची अपेक्षा नाही. संघाविषयी उत्सुकता असणाऱ्यांना संघाचा चेहरा समजून घेण्यासाठी आणि संघभक्तांना आपलाच चेहरा आरशात पाहण्यासाठी, आक्षेपांची जळमटे झटकून लावण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आणि तेच त्याचे वैशिष्टय़ आहे.
सिक्रेट्स ऑफ आरएसएस –
डीमिस्टिफाइंग द संघ : रतन शारदा,
मानस पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : २६४, किंमत : ५९५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 12:24 pm

Web Title: guide to rss
टॅग Rss
Next Stories
1 माहितीचे मारेकरी..!
2 ‘जीव’घेणा अधिकार
3 वाळूत मारल्या रेघा..
Just Now!
X