02 March 2021

News Flash

ओ. पी. मुंजाल

भारतात सायकल म्हटले की ‘एच’ हे आद्याक्षर आणि ‘हिरो’ हे नावच गेल्या सहा दशकांपासून लाखो आबालवृद्धांच्या नजरेसमोर तरळविणारे व्यक्तिमत्त्व महिन्याभरापूर्वीच चर्चेत आले होते.

| August 14, 2015 04:55 am

भारतात सायकल म्हटले की ‘एच’ हे आद्याक्षर आणि ‘हिरो’ हे नावच गेल्या सहा दशकांपासून लाखो आबालवृद्धांच्या नजरेसमोर तरळविणारे व्यक्तिमत्त्व महिन्याभरापूर्वीच चर्चेत आले होते. ३००० कोटी रुपयांच्या हिरो मोटर्स समूहाची धुरा पुत्र पंकज मुंजाल यांच्याकडे सुपूर्द करत हिरो सायकल्स लिमिटेडचे केवळ नाममात्र मानद अध्यक्षपद स्वत:कडे ठेवणाऱ्या सहसंस्थापक ओ. पी. मुंजाल यांचा हिरो समूहातील गेल्या सहा दशकांचा प्रत्यक्ष कार्यरत प्रवास तब्येतीच्या सातत्यातील कारणास्तव थांबला होता. लहान-मोठय़ांच्या हाती देशी बनावटीची पहिली सायकल देण्याचे श्रेय लाभलेले व्यक्तिमत्त्व ओ.पीं.च्या गुरुवारच्या निधनाने उद्योगपटलावरून धूसर झाले. भारतीय सायकल उद्योगाचे पितामह म्हणून ओळखले जाणाऱ्या ओम प्रकाश मुंजाल यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आयात विदेशी सायकलींच्या गदारोळात हिरोच्या रूपात अनोखी नाममुद्रा उमटवली.
पंजाबातील अमृतसरमध्ये १९४४ मध्ये ओ.पीं.नी अन्य तीन बंधूंसह सायकलच्या सुटे भाग व्यवसायात शिरकाव केला. त्यानंतर हिरो नावामार्फत ते थेट सायकल निर्मितीच्या मैदानात उतरले. १९५६ मध्ये लुधियानात हिरो समूह व तिची हिरो सायकल्स लिमिटेड ही भारतातील पहिली सायकल उत्पादक म्हणून नावारूपास आली. या काळात भारतात देशी सायकल बनविणारी हिरो ही एकमेव कंपनी होती व अन्य होत्या त्याही निवडक व विदेशी आयात कंपन्या. अशा स्थितीतील हिरो सायकल्स १९८६ मध्ये जगातील सर्वाधिक सायकल उत्पादन करणारी कंपनी म्हणून गिनिज बुकपर्यंतही धावली. अवघ्या २५ सायकलची उत्पादन क्षमता असणाऱ्या हिरोची झेप गेल्या ५९ वर्षांमध्ये प्रतिदिन १९ हजारावर गेली.
भारतीय दुचाकी क्षेत्रात मुंजाल कुटुंबीयांचा वरचष्मा उदयापासूनच राहिला आहे. हिरो समूह ३००० कोटी रुपयांचा समूह आहे. ओ.पीं.चे सामाजिक दायित्व म्हणजे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेले व उभारलेले डीएमसी हिरो हार्ट सेंटर. अनेक शैक्षणिक आणि रुग्णालय उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. समूहात ओ.पीं.नी कालापरत्वे वाहनांच्या सुटय़ा भागाची हिरो मोटर्स, झेड हिरो चेसिस सिस्टीम्स तसेच आदरातिथ्य व आलिशान गृहसजावट उत्पादन (ओमा लिव्हिंग्ज) विभाग जोडले. हिरो सायकल आणि दुचाकी हे कौटुंबिकदृष्टय़ा आज स्वतंत्र व्यवसाय असले तरी सायकल ते मोटरसायकल आणि तेही जागतिक स्तरावर अव्वल म्हणून पोहोचविण्यात ओ.पीं.चे मार्गदर्शन तमाम मुंजाल कुटुंबीयांना राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 4:55 am

Web Title: hero cycles founder chairman op munjal
Next Stories
1 गीता चव्हाण
2 प्रा. राघवेंद्र गदगकर
3 सुनील दास
Just Now!
X