जगातील सर्वोत्कृष्ट यंत्र कुठले, असा प्रश्न विचारल्यावर डॉक्टर किंवा एखादा अभियंता पटकन उत्तर देईल ‘माणसाचे शरीर’. निसर्गदत्त देणगी असलेल्या मानवी शरीराची वैज्ञानिकांनी कितीही चिरफाड केली तरी ते अद्याप त्याच्या मुळापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. परिणामी मानवी शरीररचनेतील गमक शोधण्यासाठी विविध अंगांनी संशोधन  सुरू आहे. त्यामधून मानवी जीवन अधिक सुसह्य़ करणारे नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. या कारणांमुळे आता कोणत्याही दुर्धर आजारावर उपाययोजना करणे शक्य होऊ लागले आहे.
वैद्यकशास्त्र हे सातत्यपूर्ण संशोधन सुरू असलेले शास्त्र मानले जाते. गेल्या काही दशकांमध्ये या क्षेत्रातील संशोधन खूप उच्च पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे विविध आजारांवर नियंत्रण मिळवण्यापासून ते अवयव प्रत्यारोपणापर्यंतची मजल मारणे शक्य झाले आहे. याच संशोधनाचा आढावा डॉ. अनिल गांधी यांनी ‘हाय-टेक लाइफलाइन’ या पुस्तकात घेतला आहे. सर्जन आणि लेखक अशी दुहेरी ओळख असेलल्या डॉ. गांधी यांनी अगदी सोप्या भाषेत वैद्यक क्षेत्रात सध्या काय काय संशोधन सुरू आहे, याची ओळख करून दिली आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात काय होणार आहे, याचाही अंदाज वर्तवला आहे.
या पुस्तकातून वैद्यकीय उपचारांसंदर्भात आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळतात. इतकेच नव्हे तर त्यामागची वैज्ञानिक आणि वैद्यकीय भूमिकाही समजून घेता येते. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीपासून ते पुनर्निर्मितीच्या कलेपर्यंत वैद्यकशास्त्र उलगडून सांगत सामान्य माणसाला वैद्यकशास्त्राचे ज्ञान देणारे हे पुस्तक ४५ छोटय़ा छोटय़ा प्रकरणांमध्ये विभागले आहे. यातील पहिले प्रकरण हे मानवी शरीराच्या निर्मितीबद्दल तर शेवटून दुसरे ‘व्हिजन २०५०’ हे प्रकरण भविष्यात वैद्यक तंत्रज्ञान आणि संशोधन आरोग्याला कोणत्या स्तरावर पोहोचवतील याविषयी आहे. विविध आजारांपासून ते मानवी शरीरातील विविध भागांवरील उपचारपद्धतींचा वैज्ञानिक ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकशास्त्रातील अनेक संज्ञांची माहिती होते. लेखकाने केवळ वैज्ञानिक सिद्धांत आणि त्यातून विकसित झालेले तंत्रज्ञान यामध्येच न अडकता वास्तव आयुष्यातील काही उदाहरणांची जोडही दिली आहे. त्यामुळे एरवी क्लिष्ट वाटणाऱ्या वैज्ञानिक संकल्पना सहजपणे समजावून घेता येतात.  
आधुनिक तंत्र कितीही विकसित झाले तरी त्याला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र अशा मूलभूत विज्ञानांची जोड लागतेच. सध्या सर्वत्र जनुक उपचारपद्धतीची चर्चा होत आहे. डीएनएचा शोध लागला नसता तर जनुकांची रचना शोधणे शक्य झाले नसते. त्यामुळे साठ-सत्तर वर्षांपूर्वी मूलभूत विज्ञानाने जे सांगितले आहे, त्याचा आधार घेतच हा अभ्यास पुढे जात आहे. या अभ्यासाच्या मदतीने पारंपरिक वैद्यकशास्त्राला आधुनिकतेची जोड देऊन डॉक्टर, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनी एक नवी किमया साधली आहे. ‘फिजिक्स इन मेडिसिन’ या प्रकरणात मायक्रोस्कोप, लेसर, इमेजिंग तंत्रज्ञान अशा विविध गोष्टींचा ऊहापोह केला आहे. या सर्व गोष्टी भौतिकशास्त्राचा आधार घेऊनच विकसित झाल्या आहेत.
डॉ. गांधी यांनी या पुस्तकात आनुवंशिक आजारांपासून ते कर्करोग, बायपास शस्त्रक्रियेपासून ते रोबोटिक शस्त्रक्रियेपर्यंत विविध बाबींवर प्रकाशझोत टाकला आहे. अवयव प्रत्यारोपणावर एका प्रकरणात विशेष भर दिला आहे. त्यात कोणते अवयव कशा प्रकारे दान केले जाऊ  शकतात आणि त्यातील कायदेशीर अडचणी आणि मार्गाचाही ऊहापोह करण्यात आला आहे. ही एक यशस्वी उपचारपद्धती आहे. ‘व्हिजन २०५०’ या प्रकरणात डॉ. गांधी यांनी भविष्यात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाविषयी लिहिले आहे. ते खूपच भारावून सोडणारे असले तरी नजीकच्या काळात शक्यतेच्या आवाक्यातले आहे, हेही तितकेच खरे. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे २०५० पर्यंत माणसाला निरोगी आणि आनंदी आरोग्य देण्याचा मानसही डॉ. गांधी यांनी व्यक्त केला आहे.
या पुस्तकातली ‘बायो इंक थ्रीडी प्रिंटिंग ऑफ ह्य़ुमन ऑर्गन’ ही संकल्पना आपल्याला थक्क करणारी आहे. या संकल्पनेनुसार आपण थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने एखादा अवयव हुबेहूब विकसित करू शकतो. थ्रीडी प्रिंटिंगचे तंत्रज्ञान जगभरात विकसित होत आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे जोडली आहेत. त्यामध्ये अवयव दान करण्यासाठीच्या संस्था, रक्तपेढय़ांची माहिती, नेत्रदानासाठीच्या विविध संस्था यांची नावे व पत्ते दिले आहेत. डॉ. गांधी यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की- ‘हे पुस्तक सामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करेलच, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांच्या नियमित डॉक्टरचा सल्ला न घेता कोणतेही पाऊल उचलावे.’
‘हाय-टेक लाइफलाइन’ : डॉ. अनिल गांधी,
इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई,
पाने : २९५, किंमत : ३०० रुपये.