क्षमतेपेक्षा किती तरी अधिक पटीने जमणारे भाविक, सर्व प्रकारच्या गैरसोयी आणि त्यात मंत्र्यासंत्र्यांच्या पुण्यकर्माच्या हव्यासाने त्रस्त झालेली सुरक्षा यंत्रणा, यामुळे गेल्या काही दिवसांत, ओरिसातील जगन्नाथ पुरी आणि आंध्र प्रदेशमधील राजमुंद्री येथे चेंगराचेंगरीत कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. नाशिकमध्ये सुरू झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान होणाऱ्या महास्नानाच्या काळात नेमके असेच काही होण्याची भीती असल्याने, महाराष्ट्र शासन वेळीच दक्ष राहिले नाही, तर यापूर्वी घडले, तसेच पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रद्धावानांच्या वाटय़ाला असा मृत्यू येणे यास प्रशासकीय यंत्रणा आणि गर्दीचे मानसशास्त्र कारणीभूत असते, हे वास्तव स्वीकारून अशा ठिकाणी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यात बहुतेक वेळा अपयशच पदरी का येते, याचाही विचार करायला हवा. दहा वर्षांपूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यातील यात्रेत सहभागी झालेल्या साधूंनी भाविकांच्या दिशेने फेकलेल्या नाण्यांमुळे अशी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात ३३ जणांना जीव गमवावा लागला होता. गर्दीचा अंदाज घेऊन व्यवस्था उभारण्यात कोठे तरी कमी असल्याचेच हे लक्षण होते. या वर्षी नाशिकला कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने भेट देऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून शासनानेही तसा निर्णय घेतला आहे. अशा दुर्घटना घडण्याचे ते एक मोठे कारण असते. ‘लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा न मरो’ अशा बावळट कल्पना लोकशाहीतही टिकवून ठेवण्याचे कर्म सत्ताधारी करत असतात. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या जाण्याने अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. भाविकांना सांभाळायचे की सत्ताधाऱ्यांना, अशा कचाटय़ात सापडणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला ‘जी हाँ’ करण्याशिवाय पर्याय नसतो. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील पुष्करुलू मेळ्यात नेमके हेच घडले. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही याच काळात तेथे सहकुटुंब डुबकी घेण्याची इच्छा झाल्यावर त्यांच्या संरक्षणार्थ कडेकोट बंदोबस्त करण्यात आला, त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना जिवाला मुकावे लागले. हा आकडा आता २९ पर्यंत पोहोचला आहे. दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील साताऱ्यानजीक मांढरदेवीच्या यात्रेतही किमान तीनशे जण दगावले होते. गर्दीची मानसिकता आणि तिला काबूत ठेवण्याचे मार्ग याबाबत गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतरही फार काही बदल झाले नाहीत, असेच ताज्या घटनांमुळे दिसून येते. जगन्नाथ पुरी येथे नभकालेवर रथयात्रेदरम्यान श्वास कोंडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. किमान सातशे जणांना श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला. हे सारे गेली अनेक वर्षे भारतातील विविध भागांत घडते आहे. भारतीय मानसिकतेमध्ये गैरहजर असलेला शिस्तीचा गुण अशा वेळी अधिक प्रकर्षांने जाणवतो. किमान शिस्त आणि गर्दीच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी यावर आपल्या श्रद्धा मात करतात. हे टाळण्यासाठी आधीपासूनच सर्व प्रकारची तयारी करणे एवढाच मार्ग आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यातील महास्नाने अद्याप व्हायची आहेत. त्या वेळी प्रशासनाने अधिक काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. कोटय़वधी रुपये खर्चून होणाऱ्या या धार्मिक उत्सवांमध्ये भाविकांना मृत्यू येणे ही किरकोळ दुर्घटना नाही, तर प्रशासकीय यंत्रणेचे आणि गर्दीच्या मानसिकतेचे अपयश आहे. वेळीच खबरदारी घेण्यासाठी भाविकांसह शासनाने योग्य ते नियोजन केले, तर हे टाळता येऊ शकेल.