X

चित्रभाषा

प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे.

प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द  विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे. या सगळ्यांमुळे प्रबोधनकाळातील चित्र-परंपरेपेक्षा किंवा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा स्वत:ची एक वेगळी ‘चित्रभाषा’ त्याने विकसित केली..

आपल्याकडे असं म्हटलं जातं की, ‘चित्र बोलतं’? बोलतं म्हणजे काय? कसं बोलतं? चित्रकला ही दृक्कला आहे असं म्हटलं जातं. ते दिसतं व दर्शकाने बघावं यासाठीच निर्माण केलं जातं. चित्र आपल्याला सुरुवातीला त्याच्या एकत्रित परिणामाने तयार झालेलं एक दृश्य म्हणून दिसतं. चित्रं फोटोप्रमाणे एका क्षणात ‘पूर्ण’ घडत नाही, घडवता येत नाही. ते हळूहळू तयार होतं. ते रंगवायला काही तास, दिवस, आठवडे, महिने, र्वषही लागू शकतात. चित्र जरी टप्प्याटप्प्याने तयार होतं असलं तरीही चित्रकाराला, चित्र पूर्ण झाल्यावर जाणवणारा, दिसणारा समग्र, अखंड, एकत्रित दृश्य परिणाम महत्त्वाचा वाटत असतो. आपण जेव्हा चित्रं पाहतो तेव्हा चित्राचा हा समग्र, अखंड परिणाम आपल्यासमोर असतो.

आपल्या डोळ्यांच्या मर्यादांमुळे आपण चित्रांचं अखंड, समग्र दृश्य, हळूहळू नजर व मान फिरवत, तुकडय़ा-तुकडय़ांत काही क्रमाने पाहतो. अशा तुकडय़ांना पाहत असताना मनात त्यांना जोडून चित्राचं रूप आपण पूर्ण करतो.

चित्रं तुकडय़ा-तुकडय़ांत पाहत असताना त्यातील एखादाच आकार, रंगछटा, रेषा- तिची लय असं तपशिलात पाहता येतं. अगदी स्वतंत्रपणे, जणू काही ते समग्र चित्राचे घटतच नाहीयेत. अशा रीतीने स्वतंत्ररीत्या पाहिल्यानंतर रंगछटा, रेषा, आकार आपल्या मनात काही प्रतिसाद निर्माण करतात. ते भावनिक-वैचारिक असू शकतात. असे प्रतिसाद देत देत जेव्हा आपण चित्राचं संपूर्ण रूप जाणतो, तेव्हा, त्या समग्र रूपाच्या बाबतचा प्रतिसाद अगदी सहज मनात निर्माण होतो. आपल्या मनात चित्रं पाहिल्याने, प्रतिसाद निर्माण झाल्याने आपण चित्रं ‘बोलतो’ असं म्हणतो. चित्र पाहण्याच्या अशा सवयी, पद्धती, अनुभवांमुळे चित्राची भाषा ही रंग, रेषा, आकार यांची आहे असं आपण मानू लागतो. महाराष्ट्रात त्याविषयी अगदी काव्यात्मकपणे बोललं जातं.

पण खरं म्हणजे, रंग, रेषा, आकार ही चित्राची, चित्रभाषेची अक्षरं आहेत. फक्त अक्षरांना कोणी भाषा म्हणू शकतं का? रंग, रेषा, आकारांचा एकत्रित दृश्य परिणाम हा अक्षरांनी तयार झालेल्या वाक्यरचनेप्रमाणे आहे असं फार फार तर म्हणता येईल. त्याला भाषा म्हणता येईल का? कारण कुठच्याही भाषेचं स्वरूप फक्त अक्षरं, त्यांची रचना, त्यातून तयार होणारा अर्थ इतका मर्यादित असू शकेल का?

जसं कुठच्याही भाषेतून प्रथम तात्कालिक अर्थ व नंतर हळूहळू दृष्टिकोन, विचारव्यूह कळू लागतो तीच गोष्ट चित्रभाषेलाही लागू होते. रंग, रेषा, आकार यांनी तयार झालेलं दृश्य, चित्र हे तात्कालिक अर्थासारखं असतं. जिथपर्यंत त्यामागील दृष्टिकोन कळत नाही, तिथपर्यंत जे दिसतं ते चित्रं फार मर्यादित राहतं. कारण ‘प्रतिमा संवाद’ रेखात म्हटल्याप्रमाणे चित्रकार त्याला जे म्हणायचंय, सांगायचंय, मांडायचंय ते आपल्याला परिचित ओळखरूपाचा आधार घेऊन त्याद्वारे मांडतो. त्याला केवळ रंगवता येतं म्हणून माणसांची, निसर्गाची, वस्तूंची किंवा पुराणकथा, इतिहासातील प्रसंग आदी रंगवत नसतो. त्यामागे काही दृष्टिकोन हवा. इथे दृष्टिकोन व ‘अर्थ’ याची गल्लत व्हायला नको.

चित्रकार त्याने चित्र का रंगवलं याचं एक किंवा अनेक कारणं सांगेल, लांबलचक म्हणणं मांडेल. या कारणांमुळे त्याने चित्र रंगवणं या कृतीमागील कारणं व त्याद्वारे त्या कृतीचा ‘अर्थ’ कळेल.

पण असे अर्थ, कारणं अनेक असू शकतात व या अर्थ, कारणांतून एक सूत्र निघेलच असं नाही. दृष्टिकोन स्पष्ट होईल असं नव्हे.

परिणामी अशा चित्रांना रंगवण्याची पद्धती, शैली असू शकते, पण त्यातून चित्रभाषा म्हणजे काय, ती कशी असते, ते कळणार नाही.

चित्रकार वास्तवाकडे काय दृष्टीने पाहतो, जीवनाकडे कशा दृष्टीने पाहतो व त्यामध्ये चित्र रंगवण्याच्या कृतीकडे कशा दृष्टीने पाहतो, चित्रं रंगवण्याची कृती केल्याने त्याला जीवन समजण्यास, कळण्यास मदत होते का? कशी होते? अशा प्रश्नांच्या उत्तरातून चित्रभाषा तयार होते. ही प्रक्रिया खूप जटिल व गुंतागुंतीची आहे. त्याचमुळे बहुसंख्य चित्रकार शैलीपर्यंत जातात, पण त्यांच्या चित्रांना त्यांची स्वत:ची वेगळी ‘चित्रभाषा’ नसते, पण ते असो..

चित्रकार वास्तवाकडे कुठच्या ‘वृत्तीने’ पाहतो, त्याला जे मांडायचं, सांगायचं आहे ते सांगायचा त्याचा ‘स्वभाव’ काय व तो चित्राच्या दृश्य व्याकरणामध्ये किती पारंगत आहे यातून चित्रभाषा विकसित होते.

वास्तवाकडे आपण अनेक वृत्तीने पाहत असतो. त्यात कधी तत्त्वचिंतकाच्या, कधी विश्लेषक-निरीक्षकाच्या, कधी उपभोग घेणाऱ्याच्या, तर कधी केवळ तटस्थपणे.. अशा वृत्तींमुळे वास्तवाविषयी आपल्या मनात विविध भावभावना उत्पन्न होतात. या वृत्तींमुळे आपण व्यक्त होतोय, की मांडतोय, की अभ्यास करतोय, की सौंदर्यास्वाद घेतोय, अशा सांगण्याच्या स्वभाव-पद्धतीही तयार होतात.

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्ची किंवा विन्सी. तो त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या जीवनाविषयी वाचल्यास असं लक्षात येतं की, तो वास्तवाकडे तटस्थपणे, निरीक्षक-विश्लेषकांच्या, काहीसं वैज्ञानिकाप्रमाणे, तत्त्वचिंतकाप्रमाणे पाहतो. त्यामुळे त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे. या सगळ्यांमुळे प्रबोधनकाळातील चित्र-परंपरेपेक्षा किंवा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा स्वत:ची एक वेगळी ‘चित्रभाषा’ त्याने विकसित केली. त्याकरिता वैद्यकशास्त्राप्रमाणे मानवी शरीररचनांचा सखोल अभ्यास, मानवी भावभावनांचं निरीक्षण व त्या काळी प्रचलित नसलेली अभ्यास पद्धती- प्रत्यक्षातील व्यक्तींचं निरीक्षण करून त्यांची दृश्यं टिपणं घेणं, त्याकरिता रस्त्यांवर, बाजारात वगैरे फिरणं (ज्याला आज स्केचिंग करणं असं म्हणतात.) यथार्थ दर्शन (परस्पेक्टिव्ह), छाया-प्रकाशाचा अभ्यास, तैलरंगासारख्या माध्यमांत प्रयोग अशा चित्र-व्याकरणाच्या अनेक घटकांचा अभ्यास-विकास केला. यातूनच त्याची चित्रभाषा त्याने विकसित केली.

लिओनार्दोचा वैयक्तिक दृष्टिकोन हा प्रबोधनकालीन एकंदरीत वैचारिक वातावरणात मिसळणाराच आहे. धार्मिक विचारापेक्षा व्यक्तिकेंद्रित, वैज्ञानिक वृत्तीने जगाकडे, जीवनाकडे पाहत त्याचा अर्थ लावायचा हा तो दृष्टिकोन..

अशा दृष्टिकोनामुळेच लिओनार्दोने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत मानवी भावभावनांचं, चित्रामध्ये चित्रण कसं करायचं याचा सतत विचार, प्रयोग, अभ्यास केला. याचमुळे व्यक्तिचित्रणामध्ये केवळ मानवी चेहरा, शरीर यांचंच फक्त चित्रण करण्यापेक्षा, त्यापलीकडे जाऊन मानवी मनाची, मूडची, भावनिक अवस्थेचं चित्रण करावं याचा त्याने प्रयत्न केला. चित्रात तीव्र भावना व त्यामुळे तयार होणारे चेहऱ्याचे हावभाव दर्शवणं सोपं असतं. कारण ते स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतात. अगदी हळुवार, तरल भाव चेहऱ्यावर दर्शवणं खूप कठीण असतं. त्याचा प्रयत्न त्याने मोनालिसामध्ये केला. त्यामुळे ऐतिहासिकदृष्टय़ा ते चित्र महत्त्वाचं ठरतं. ते चित्र अनेक प्रकारे झालेल्या चर्चानी लोकप्रिय ठरलंय.

लिओनार्दोसारखं ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ व त्यासोबत येणारं अभिव्यक्तिस्वातंत्र्य असणाऱ्या चित्रकारांची चित्रभाषा वेगळी होती, असते. हे व्यक्तिस्वातंत्र्य जेव्हा नव्हतं, राजा, धर्मगुरू, राजकीय नेते आदी चित्रकाराला सांगत होते की त्याचं चित्र कसं दिसायला पाहिजे, त्यात काय दिसायला हवं, तेव्हा चित्रभाषा वेगळ्या पद्धतीने विकसित व्हायची. त्याबद्दल पुढे बोलू..

*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.

    

  • Tags: pictures,