सचिन, अखेर तू आपली बॅट म्यान केलीसच. तू आता निवृत्तीची घोषणा करावीस असे माझ्यासारख्या तुझ्या असंख्य चाहत्यांना खरोखरच मनापासून वाटत होते. त्याला कारण एकच की, आम्हाला तुला मानाने पायउतार होताना पाहायचे होते!
मी मनापासून सांगतो की, भारतवर्षांत कुणा खेळाडूच्या निवृत्त होण्याने समाजमानसात इतकी आवर्तने उमटली होती ती १९८७ साली, जेव्हा सुनीलने सर्व क्रिकेटरसिकांवर बेसावध असताना निवृत्तीचा बॉम्बगोळा टाकला होता! आणि.. आता तू वेळ साधलीस! (अर्थात आता आम्ही बेसावध नव्हतो.) पण सचिन, तुम्ही दोघांनी क्रिकेट साम्राज्यात विक्रमांची इतकी बेगमी करून ठेवली आहे की, भारताच्या पुढील कित्येक पिढय़ा बसून खातील! एक मनापासून वाटते की, तुझी अखेरची दोनशेवी कसोटी मुंबईच्या मदानावरच खेळली जावी. सुनीलने लॉर्ड्सवर निरोप घेतला, निदान तू तरी खरा मुंबईकर असल्याचे सिद्ध कर! आणि.. हो.. तमाम क्रिकेटरसिकांची शेवटची फर्माईश म्हणून होऊन जाऊ दे १०१ वी शतकी खेळी!  ..पण एक दु:ख मात्र नक्कीच होतंय की, ‘सभ्य’ गृहस्थांच्या खेळातून खरोखरच एक ‘सभ्य’ गृहस्थ निघून जातोय!
मििलद रामचंद्र देवधर, गिरगाव

अजित तेंडुलकरला द्रोणाचार्य पुरस्कार मिळावा
घराणेशाहीचा सर्वत्र उदोउदो चालू असताना मुंबापुरीतील एक महान साहित्यिकाच्या घरात मोठय़ा भावाने ३५ वर्षांपूर्वी जे आपल्यातील क्रिकेटचे स्वप्न धाकटय़ा भावात उतरविले त्या अजितने घडविलेल्या व आचरेकर सरांनी आकारलेल्या ‘सचिन’ नावाच्या भारतीय क्रिकेटला पडलेल्या स्वप्नाने पूर्णविराम जाहीर केला.  १२० कोटी भारतीय हृदयांची धडकनं तेव्हा काही क्षणांकरिता थांबली. मोठमोठाल्या भूखंडांचे श्रीखंड लाटणाऱ्या या युगात फक्त २२ यार्डात खडतर परिश्रम, संयम आणि कर्तृत्वाची जोड देऊन चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनता येते, हे गेली २४ वर्षे सिद्ध करून दाखवून सचिन हा भारतीयांचे रत्न बनला आहे. हा हिरा कोंदणात बसविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन पडद्यामागून पणाला लावणारा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर यास द्रोणाचार्य पुरस्कार मिळावा.
प्रवीण आंबेसकर, ठाणे

का बरे सचिनला आपण देवत्व बहाल करतोय?
‘सुफळ संपूर्ण’  ही बातमी वाचली. सचिन तेंडुलकरने बीसीसीआयला पत्र पाठवून आपला निवृत्तीचा इरादा व्यक्त केला तो काय..  लगेच तमाम भारतीय नागरिक, माध्यमे व्याकूळ होऊन गेली. सर्वच वृत्तपत्रे, वाहिन्या या सचिन या खेळाडूच्या बातम्यांनी नखशिखान्त न्हाऊन निघाल्या. का बरे सचिनला आपण देवत्व बहाल करतोय? आणि पुन्हा हाच रतीब आपण १९  नोव्हेंबरलाही घालणार, कारण त्या दिवशी तो खरंच निवृत्त होणार. गेले अनेक सामने सचिन वाईट खेळतोय. तो बऱ्याच वेळा आता त्रिफळाचितही व्हायला लागला आहे. तेव्हा लौकिकदृष्टय़ा सचिन निवृत्त झालेलाच आहे. आताही होणाऱ्या दोन सामन्यांत त्याची खेळी अशीच राहिली तर? आपली वृत्तपत्रे आज आपला खरा चेहरा घेऊन पुढे आली, कारण बऱ्याच ठिकाणी त्याला देव मानून बातम्या दिल्या गेल्या. एकीकडे आपण दाभोलकरांच्या विज्ञाननिष्ठेचे गोडवे गातो आणि आपले पारंपरिक मन मात्र कुणा तरी खेळाडूत, कलाकारात देव शोधत राहते आणि देव म्हटला की प्रश्न नाही, चिकित्सा नाही. सचिनवर हे असे आततायी, भ्रामक आणि भंपक प्रेम दाखवून आपण आपल्याच विवेकवादाचा नाश करत आहोत.
शुभा परांजपे, पुणे

..परंतु या सम हाच!
‘असा कसा दिलास देवा काळजात घाव तू..’ या गीताच्या ओळी सचिनच्या निवृत्तीच्या बाबतीत लागू होतात. ज्या लोकांना कधी थांबायचं हे कळतं तेच लोक कायम शिखरावर राहतात. सचिनने थांबायला जरासा उशीर केला असं जरी वाटत असलं तरी तो कायम शिखरावरच राहील हे मात्र नक्की. गावस्कर यांनीच म्हटल्याप्रमाणे. ‘लोकांनी रिटायर झालात का? हा प्रश्न विचारण्याऐवजी का रिटायर झालात?’ हा प्रश्न विचारणे कधीही चांगले. शेवटी सचिनने दिलेल्या असंख्य निरपेक्ष आनंदाच्या क्षणांचं ऋण म्हणून हेच म्हणता येईल की.. ‘झाले बहु. होतील बहु. परंतु या सम हाच!’    
अनिरुद्ध ढगे, उस्मानाबाद</strong>

टीका करणारे आता बेरोजगार होतील..!
अखेर सचिनने निवृत्ती पत्करली. एक पर्वच आता आठवणींच्या कप्प्यात कायमचं गडप होणार आहे. तो खेळत असताना जगण्याच्या लढाईत संघर्षरत असलेलो आपण दु:ख, कष्ट, चिंता काही काळासाठी तरी विसरायचो. ‘आपल्या कामाप्रति निष्ठा’ हा त्याचा गुण खरोखर सर्वानी अंगीकारावा असाच आहे. या निष्ठेमुळेच तो सामनानिश्चितीसारखे अनेक वाद होऊनही चिखलातील कमळाप्रमाणे पवित्र राहू शकला. आपल्याच माणसांची माती करण्याचा दुर्गुण आपल्याकडे सापडतोच. सचिनवरही अनेकदा तोफ डागली गेली, पण तो आपल्या कामातून प्रत्युत्तर देत राहिला. सचिनवर अनाठायी टीका करणारे व प्रसिद्धी मिळवणारे बरेच जण आता बेरोजगार होतील हे मात्र खरे.  दुसरा सचिन घडणे आता जवळपास अशक्यप्राय वाटते. आपण सचिनचे समकालीन होतो, असे गर्वाने पुढच्या पिढीला आपण सांगू शकू यातच किती आनंद आहे. सचिनला सलाम अन् शुभेच्छा.          
– रुपेश पाटील, भराडी, ता. जामनेर

‘वरून कीर्तन आतून तमाशा’
‘पुनर्बाधणीसाठी क्लस्टरशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही,’  हे  आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पत्र (लोकमानस, १० ऑक्टो.) वाचले.  हे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार आहे! अनधिकृत बांधकामे जर अशाच प्रकारे अधिकृत करायची असतील, घटनात्मक कायदे आणि नियम तोडणाऱ्याला जर अशाच प्रकारे कायदेशीर साहाय्य मिळणार असेल तर कशाला हवेत कायदे आणि नियम. काय त्याला अर्थ राहतो. आव्हाड म्हणतात, ठाण्यातील अनधिकृत बांधकामे माझ्या काळातील नाहीत. पण ही बांधकामे तुमचेच सरकार असताना झालीत. तेव्हा आव्हाड ही जबाबदारी कशी काय झटकू शकतात? तुमच्या आमदारकीच्या काळात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांची जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा देण्याची हिम्मत तुम्ही दाखवणार काय? समाजात काहीही विपरीत घडत असेल तर ते रोखण्यासाठी कायदे आणि नियम असतात, पण आता त्याचा उपयोग फक्त स्वत:च्या फायद्यासाठीच करून घेतला जातो हे यावरून स्पष्ट होते. हे म्हणजे ‘वरून कीर्तन आतून तमाशा, चेहऱ्यावर तळमळ आतून अभिलाषा’!
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

महिलांना धोरणस्वातंत्र्य हवे!
‘.. ती जगातें उद्धारी’ हा अग्रलेख (१० ऑक्टोबर) वाचला. खूप आवडला. अमेरिकी फेडच्या प्रमुखपदी जॅनेट येलन यांची नेमणूक होणे ही जगातील स्त्रियांच्या दृष्टीने अभिमानाची बाब होय. अमेरिकन व्यापारावर ज्यू लोकांचे प्राबल्य आहे व ते व्यवहाराला अतिशय पक्के आहेत. प्रचलित असलेल्या कायद्यांच्या चौकटीत बँका समाजहितेषी करणे व जागतिक अर्थव्यवहाराला चालना देण्याचे आव्हान बँकांपुढे आहे. राजकीय नेतृत्वाने सवंग घोषणांच्या मागे न लागता आर्थिक शिस्तीकडे लक्ष दिल्यास बँका खरोखरच चांगले काम करतील.
मोठमोठय़ा शहरांत पाळण्याची दोरी सांभाळणारी स्त्रीच संसाराचा गाडा सांभाळत असते. मात्र उच्चपदावर असलेल्या स्त्रियांना धोरणस्वातंत्र्य मिळाले पाहिजे. म्हणजे त्यांना कर्तृत्व सिद्ध करता येईल.
– एस. बी. काळकर, कल्याण