‘आपला टक्का किती?’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, २५ जुल) वाचला. चीनच्या कंपन्यांनी जगभर कसे हातपाय पसरले आहेत आणि त्यात आपण कसे कमी पडतो हे सांगताना टाटा समूहाचा उल्लेख व्हायला हवा होता असे वाटते. ज्या ब्रिटिश साहेबांनी आपल्यावर अनेक दशके राज्य केले त्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अनेक कंपन्या (जॅग्वार, लॅण्डरोव्हर, कोरस स्टील, टेटली चहा)अमेरिकेतील रिट्झ-कार्लटन हॉटेल, कोरियाची देवू, सिंगापूरची नॅटस्टील, दक्षिण आफ्रिका आणि चीनमधील दूरसंचार कंपन्या या आता टाटा समूहाचा भाग आहेत. ही यादी अजूनही खूप मोठी आहे. चीनच्या तुलनेत हे प्रमाण कमी असेलही, पण पोलादी पडद्याआड आणि सरकारच्या भक्कम पाठिंब्यावर चिनी कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या तुलनेत लोकशाही देशात प्रामाणिकपणे व्यवसाय करून टाटांनी मिळवलेले हे यश अनुल्लेनीय नक्कीच नाही असे वाटते.
विनिता दीक्षित, ठाणे

..तर लेख परिपूर्ण वाटला असता!

गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर (२५ जुल) वाचले. जागतिक अर्थव्यवहारात ‘आपला टक्का किती?’ असा रास्त प्रश्न विचारताना त्यांनी चीन आणि भारत यांची तुलना केली आहे. जगभरातील विविध क्षेत्रे पादाक्रांत करण्याची चीनची भूक किती राक्षसी आहे ते समजले. अफाट मनुष्यबळ आणि राजकीय इच्छाशक्ती, तसेच प्रसंगी आवश्यक असणारी हुकूमशाही यांच्या जोरावर चीन पुढे जात आहे. परंतु ही तुलना करताना भारताचा टक्का कितीही कमी असला तरी जी काही खरोखरीच दखल घेण्यासारखी उदाहरणे आहेत, तीही या लेखात यायला हवी होती. टाटा समूहाने ब्रिटनमधील टेटली या बलाढय़ चहा कंपनीचे तसेच अमेरिका, दक्षिण आफ्रिका व पूर्व युरोपमधील अनेक चहा कंपन्यांचे अधिग्रहण केले. यातील बऱ्याच कंपन्या आकाराने टाटापेक्षाही बलाढय़ होत्या. बिर्लातर्फे नॉव्हेलीस, ओएनजीसीकडून इम्पीरियल एनर्जी, रिलायन्सकडून ‘शेल’, एचसीएलकडून ब्रिटिश अ‍ॅक्सॉन अशी अनेक उदाहरणे आहेत.
तुलना करताना एक जी महत्त्वाची गोष्ट पाहणे आवश्यक आहे, ती म्हणजे अशा अधिग्रहणानंतर मूळ कंपन्यांच्या आíथक परिस्थितीत सुधारणा झाली का व त्याचा लाभ भारतीय व चिनी कंपन्यांना झाला का. ही माहिती दिली असती तर लेख अधिक परिपूर्ण वाटला असता.
अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

लोकांचा बुद्धिभेद कशासाठी?

याकूब फाशी गेल्यानंतर लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करण्याचे प्रयोजन कळेल काय? याकूब मेमनचा या कटात काय प्रकारचा सहभाग होता हे वेगवेगळ्या कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. या सज्जन सनदी लेखापालाने आपल्या भावाला चांदीच्या तस्करीबद्दल वेळीच पोलिसांत का दिले नाही? यांचा संत बाप गुन्हेगार मुलाला चोपण्यासाठी २५७ जणांचा बळी जाण्याची वाट बघत होता का? बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस आधी कटाबद्दल कुणकुण नसूनही अख्खं कुटुंब देश सोडून जातं यावर फक्त तुमच्यासारखा विचारी माणूसच विश्वास ठेवू शकतो. या नराधमांना स्वतची बाजू मांडायला २२ वर्षे मिळाली तरी आपल्या मते शासकीय तालावर चालणाऱ्या न्यायव्यवस्थेने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास वेळ दिला नाही आणि त्या २५७ निष्पाप जीवांना २२ सेकंदही मिळाले नाहीत. एवढे बळी गेले त्या कृत्यातील फाशी देण्याइतपत गुन्हा एकाचाच? की इथेही अर्थशास्त्राचा नियम.. पुरवठा जास्त आहे म्हणून जीव स्वस्त!
राजेश नाईक, विरार
अस्वस्थतेला आवाज दिला

उन्मादी वातावरणात सत्य आणि आपली रोखठोक भूमिका मांडणारा ‘एक शोकान्त उन्माद’ हा अग्रलेख (३० जुलै) वाचला. त्या दिवशी एकूणच समाजमाध्यमातील उथळ प्रतिक्रिया आणि उतावीळ ‘देशप्रेमीयांच्या’ भावना पाहाता खूप अस्वस्थ वाटत होते. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखाने त्या अस्वस्थतेला आवाज दिला. एकूणच यापुढील काळ चिंता वाढवणारा असेल, हे मात्र निश्चित.
उल्का महाजन

प्राचीन मडक्यांची चिकित्सा करणे गरजेचे

‘वादविवाद म्हणजे मडक्याची टिमकी’ हे डॉ. रविन थत्ते यांचे पत्र (लोकमानस, ३१ जुल) वाचले. ‘मुळात या जनुकांमधले इंधन महत्त्वाचे. त्या इंधनाला चतन्य म्हणता येते आणि चतन्य म्हटले की, बळ ही गोष्ट अपरिहार्य ठरते.’ असा तिरपगडा वळसा घेण्यापेक्षा ‘इंधन म्हटले की, बळ ही गोष्ट अपरिहार्य ठरते’ अशी सरळ मांडणी का नाही? मध्येच ‘चतन्य’ असा शब्द/टप्पा घुसडण्याचे प्रयोजनच काय, ते मला समजलेले नाही.
‘व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हायरल विनोद वाचल्यामुळेच मोनालिसा स्मित करीत आहे’ असा या गूढ हास्यावर नवीन प्रकाश टाकल्याची ‘टिमकी’ समजा कोणी वाजविली तर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ किंवा ‘व्हायरल विनोद’ अशा संकल्पना चित्रकाराला त्या वेळी ज्ञात असूही शकतील एवढे तरी सुचविणारा पुरावा त्या ‘संशोधका’ने देणे गरजेचे राहील.
‘त्या इंधनाला आज चतन्य म्हणता येते’ आणि ‘त्या इंधनाला चतन्य म्हणता येते याचा त्या वेळीच अंदाज/कल्पना होती’ या दोन विधानांतील फरक स्पष्ट आहे.
सूर्य केंद्रस्थानी आहे, अशी जाणीव पाश्चिमात्य संशोधकांबरोबर आर्यभट्टाला दीड हजार वर्षांपूर्वीच प्राचीन काळी होती याचे पुरावे संशोधकांनी शोधले आहेत. ‘चतन्य’ हा शब्द वापरताना किंवा ‘तथाकथित विज्ञानातल्या तीन नाडय़ा किंवा सात चक्रे’ याबाबत सिद्धांत/विचार मांडताना शरीरप्रक्रियेचे नेमके काही एक ज्ञान त्या वेळी असू शकेल? याविषयी सप्रमाण माहिती नसेल तर ‘त्या वेळी उगाच हवेत इमले बांधले होते’ हा पर्याय (तो खोटा ठरेपर्यंत) स्वीकारणे उचित राहील. अर्थात ‘जीवसृष्टीचा हा मूलभूत प्रवाह अजून गूढच राहिला आहे’ यावरून हे दिसते की अजून(ही) म्हणजेच पूर्वापारकाळीसुद्धा हे गूढच होते, ‘प्रवाहा’चे कोणतेच ज्ञान त्या वेळीही झालेच नव्हते. त्यामुळे ‘चतन्य’ वगरे शब्दप्रयोग अंधारातच मारलेले बाण आहेत हे डॉ. थत्ते यांनासुद्धा मान्य आहे.
‘चतन्याचे वर्णन ‘सर्वत्र भरलेले’ असेच केलेले असून.. मडके फुटल्यावर त्याच्यातली पोकळी आणि त्याच्याबाहेरची पोकळी एकच असते आणि ती तशीच राहते.’ या उदाहरणावरून असे दिसते की, चतन्य म्हणजे एक ‘पोकळीच’ आहे. मडके ‘अखंड’ असताना त्यातील ‘जीवसृष्टीचा हा मूलभूत प्रवाह’ कसा सुरू राहात असेल? किंवा त्यातील ‘बळ ही गोष्ट अपरिहार्य’पणे कशी घडते? या प्रश्नाचे उत्तर मिळतच नाही.
‘बद्धकोष्ठ’ अवस्था म्हणजे काय? ही नेमकी स्थिती ज्ञात असते; पण ‘प्रकृती पित्तमय’ म्हणजे नेमकी अवस्था कशी असते? हे मला तरी ज्ञात नाही.
वादविवाद करणे घातक असते. एखादे सांगणे निमूटपणे ऐकावे आणि पाळावे ही मनोभूमिका सर्कशीतील जनावरांसाठी योग्य मानली गेली आहे, परंतु अशी मनोभूमिका ‘विचारी’ माणूस या संकल्पनेच्या विरोधात जाते. प्राचीन मडक्यांची चिकित्सा आजच्या मडक्यांनी करणे हे इतिहासात डोकी बुडवून बसलेल्यांसाठी गरजेचे असते.
राजीव जोशी, नेरळ