05 June 2020

News Flash

लोकमानस

गोंधळ हाच इतिहास! ‘गोंधळ आवडे सर्वाना’ हा आपला अग्रलेख (२३ नोव्हेंबर) या देशाच्या तमाम जनतेचे व्यथित मन उघड करणारा आहे. भारतातील १२० कोटी जनतेच्या कल्याणकारी योजना

| November 28, 2012 12:23 pm

गोंधळ हाच इतिहास!
‘गोंधळ आवडे सर्वाना’ हा आपला अग्रलेख (२३ नोव्हेंबर) या देशाच्या तमाम जनतेचे व्यथित मन उघड करणारा आहे. भारतातील १२० कोटी जनतेच्या कल्याणकारी योजना चर्चेद्वारे मार्गस्थ लावण्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींना जनता संसदेत पाठविते. परंतु हे प्रतिनिधी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भांडत असतात. पंतप्रधानांनी राजीनामा दिला की, देशाच्या सर्वागीण प्रगतीचे चाक धावू लागेल हे यांना सांगितले कुणी? एखादा गरीब कामगार कामावर जाऊ शकला नाही की त्याचा पगार बुडतो; पण संसदेचे कामकाज बंद पाडले तरी यांचे दरदिवशीचे भरमसाट भत्ते चालूच राहतात. मिळणाऱ्या भत्त्यांत वाढ करण्याचा प्रस्ताव होतो, तेव्हा मात्र शत्रुत्वाला मित्रत्वाचे रूप येते. हे असेच चालू राहिले तर काही प्रमाणात अजूनही लोकांची या प्रतिनिधींवर/पुढाऱ्यांवर असलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल. भारतीय लोकशाहीचे अशा कृत्याने दरदिवशी निघणारे वाभाडे पुढच्या पिढीला इतिहास म्हणून वाचावयास मिळतील. महापालिका, विधानसभा, लोकसभा ही संविधानाने निर्माण केलेली सभागृहे मग केवळ शक्तिप्रदर्शनार्थ कुस्तीचे आखाडे किंवा मनोरंजनाची नाटय़गृहे बनतील.
– सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

स्मारक, एक गुरुदक्षिणा!
सध्या दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून वेगवेगळ्या मोठय़ा नेत्यांमध्ये वाद रंगला असून त्यांची वक्तव्ये म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखा प्रकार आहे. ठाकरे कुटुंब बाळासाहेबांच्या निधनाच्या दु:खातून सावरले नसताना हा स्मारकाचा विषय काढायची काही जरुरी नव्हती, त्यामुळे माननीय उद्धवजी ठाकरे किती दुखावले असतील याची कल्पना त्यांनी त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवरून येते. तरीही अजूनही नेते आपापले घोडे पुढे दमटत आहेत.
बाळासाहेबांच्या मागे शिवसेना अशी असू नये असे प्रत्येक शिवसनिकाला वाटत असेल.
बाळासाहेबांमुळे आणि शिवसेनेमुळे आम्ही हे ऐश्वर्याचे आणि सन्मानाचे दिवस पाहिले, असे पूर्वीचे आणि सध्याचे शिवसेना नेते सांगत आहेत आणि ते शंभर टक्के खरे आहे. त्यामुळे स्मारकासाठी किंवा पुतळ्यासाठी संपूर्ण आíथक तरतुदीची जबाबदारी त्या सर्वानी मनोभावे उचलली पाहिजे. गुरुदक्षिणा म्हणून बाळासाहेबांच्या चरणी ती रुजू होईल.
– मोहन गद्रे, कांदिवली.

व्यंगचित्रकला अकॅडमी स्वरूपातील स्मारकाचा विचार व्हावा
स्मारक कुठे, कसे याची चर्चा सध्या वर्तमानपत्रांतून व इतरत्र होताना दिसते. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या निधनानंतर ही चर्चा होत आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सेनाप्रमुखांची राजकीय मते पुढे सामान्यजनासमोर नेण्याची कामगिरी त्यांचे निकटवर्तीय करतीलच, पण गेली चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडणाऱ्या ठाकरे यांची केवळ शिवसेनाप्रमुख व राजकारणी अशी ओळख येणाऱ्या पिढीस कायमस्वरूपी करून देणे तितकेसे सयुक्तिक वाटत नाही. राजकारणात पदार्पण होण्यापूर्वी बाळ ठाकरे एक प्रभावी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. आज व्यंगचित्रकारांची नामावली करायची झाल्यास अग्रक्रमी आर. के. लक्ष्मण आणि बाळ ठाकरे स्वाभाविकपणे एकत्र दिसतात. केवळ व्यंगचित्र कलाकार नव्हे, तर तल्लखपणे विचार करण्याची क्षमता या दोघांत आढळते. राष्ट्रीय व जागतिक घडामोडी आणि राजकारण यावर नजर ठेवताना त्यातील बारकावे, त्रुटी, वादग्रस्तपणा हेरून त्यातील घटना येणाऱ्या दिवसांच्या आवृत्तीसाठी छोटय़ा चौकटीत काही रेषा आणि फटकारे यांच्याद्वारे व्यंगचित्र रूपात (वर्षांनुवष्रे इतर सर्व व्याप सांभाळून) साकारणे ही किमया केवळ बाळ ठाकरे करू जाणत!
कोणत्याही कला संस्थेत दाखल न होता केवळ उपजत अंगी असलेल्या कलेपासूनच कारकीर्दीला सुरुवात करून अगदी अल्पशिक्षित वाचकास व्यंगचित्रातून राजकारण आणि समाज याचे सुलभ दर्शन घडवीत कलेची अखेपर्यंत समरसतेने उपासना करणारे व्यंगचित्रकार ‘बाळ ठाकरे’ यांचे स्मारक नवोदित व्यंगचित्रकारांसाठी ‘व्यंगचित्रकला अ‍ॅकॅडमी’ स्थापून केल्यास ती त्यांच्यातील कलाकारास खरीखुरी मानवंदना ठरेल. एक श्रेष्ठ कलावंत ही त्यांची ख्याती कायम राहील. अशा प्रकारची ती एकमेव संस्था ठरेल असे वाटते. अशा ठिकाणी उत्तम कलाशिक्षण प्राप्त होताना भविष्यातील पिढीतल्या चित्रकलाकारांना ठाकरे यांच्या चिरंतन स्मृतीतून स्फूíतदायक प्रेरणा मिळत राहील.
– डॉ श्रीकांत परळकर, दादर

सदाचार व उत्कर्षांची संधी आता प्रत्येकाच्या हाती..
कॅप्टन भाऊराव खडताळे यांचे ‘राज्यघटनेमुळे मनुस्मृती कशी बदलणार?’ हे पत्र (१४ नोव्हें.) वाचले. मनुस्मृती हा भारताचा भूतकाळ आहे. तो बदलणे शक्य नाही. भूतकाळातील चुका दुरुस्त करून वर्तमानकाळाला आवश्यक असे बदल करणे आपल्या हातात आहे. चातुर्वण्र्य आणि जातिव्यवस्थेची त्या काळात गरज होती. कारण तेव्हा व्यावसायिक कौशल्ये वंशपरंपरेने जोपासली जात होती. आता आपल्या अंगी असलेल्या कौशल्ये शिक्षणाच्या साहाय्याने (संस्थेत शिक्षण घेऊन) वृद्धिंगत करण्याची सोय उपलब्ध आहे.
हिंदू कोड बिल तयार करताना याज्ञवल्क्य स्मृतीचा आधार घेतलेला असला तरी त्यात आधुनिक काळाला अनुरूप असे बदल केलेले आहेत. त्यामुळे भूतकाळात मनुस्मृतीने स्त्रिया व शूद्रांवर अन्याय केलेला असला तरी आज तो उगाळत बसण्यात काय अर्थ आहे?
त्यामुळेच, सध्या उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा घेऊन प्रत्येकाने आपला उत्कर्ष करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बुद्ध धर्माचा स्वीकार करून दलितांचे सर्व प्रश्न सोडवले ही समजूत भ्रामक ठरेल.  तशी समजूत खडताळे यांचीही नसावी. कोणताही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. सगळे  धर्म आपल्या अनुयायांना सदाचाराचीच शिकवण देतात. अनुयायांच्या स्वत:च्या वर्तनाने त्यांच्याविषयी आदर किंवा अनादर निर्माण होतो.
– सरोजिनी वांद्रेकर, खार (प.)

संयमी आणि विकासशील शिवसेनेची गरज
बाळासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला. पाच शतके महाराष्ट्रात राजकीय साम्राज्य गाजवणारे बाळासाहेब आपल्यात नाहीत हे ऐकून जो संयम दाखवला तो वाखाणण्यासारखा होता. हाच संयम शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपली संघटना वाढवण्यासाठी करावा. शिवसेनेला मोठे व्हायचे असेल तर महाराष्ट्रामध्ये संयमाने भावी वाटचाल करावी. बाळासाहेबांच्या भूतकाळातील भाषणांमध्ये महाराष्ट्राचा विकास आणि कायदा-सुव्यवस्था यांना प्राधान्य होते. महाराष्ट्रात संयम राखून महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण केल्यास शिवसेनेचे भवितव्य चांगले आहे. शिवसेनेची ही संयमी भूमिका महाराष्ट्रातील मराठी माणसाला आता आवडू लागली आहे.
– गोविंद र. परब, दहिसर (पूर्व.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2012 12:23 pm

Web Title: letters to editor 4
Next Stories
1 लोकमानस
2 दबाव असू दे, मृत्युदंड असावाच!
3 पोलिसांवर कोणाचा दबाव होता?
Just Now!
X