काँग्रेस काय आणि भाजप काय, या दोघांनी स्वत:स प्रादेशिक पक्षांस बांधून घेतल्यामुळे स्वत:चे तर नुकसान करून घेतलेच, परंतु राज्यासही मागे लोटले आहे. त्यामुळे ऊठसूट स्वबळाची भाषा करणाऱ्यांसाठी उगाच आणखी गुऱ्हाळ न घालता भाजप आणि काँग्रेस यांनी आपापल्या प्रादेशिक संबंधांना तिलांजली देणेच हिताचे आहे.
आपल्या देशात प्रादेशिक पक्षांचे तण माजले ते काँग्रेसच्या संवेदनशून्यतेमुळे. जे काही करायचे ते नेहरू घराण्याने या त्या पक्षाच्या आग्रहापायी स्थानिक भावभावना सतत पायदळी तुडवल्या गेल्या आणि त्यातून प्रादेशिक अस्मितांचा कोळसा पेटवला जाऊन त्याचे निखारे बनले. याबाबत काँग्रेसचे नेतृत्व इतके भावनाशून्य होते की आंध्रचे मुख्यमंत्री टी अंजय्या यांचा विमानतळावर सर्वाच्या देखत पाणउतारा करण्याचा बेमुर्वतखोरपणा राजीव गांधी यांनी दाखवला. एन टी रामाराव यांचा तेलुगू बिड्डा जन्माला आला तो त्यातूनच. महाराष्ट्रातही तेच झाले. फरक इतकाच की महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष ही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचीच गरज होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वास आव्हान देण्याइतकी हिंमत महाराष्ट्रात शड्डू ठोकणाऱ्या नेतृत्वात कधीही नव्हती. मग तो संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न असो वा मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाचा मुद्दा असो. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्या अतृप्त इच्छाआकांक्षा या स्वतंत्र प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून भागवून घेणे पसंत केले. शिवसेनेच्या जन्माची ही पाश्र्वभूमी आहे. ती समजून घेतल्याखेरीज राजकीय वर्तमानाचे आकलन होणार नाही. हे सर्व होत होते तेव्हा काँग्रेस हा सशक्त राष्ट्रीय पक्ष होता आणि स्थानिक प्रादेशिक पक्षांना खेळवण्याची ताकद त्या पक्षात होती. पुढे त्या पक्षाची जागा घेऊ पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गरज होती तोपर्यंत प्रादेशिक पक्षांची शिडी वापरली. त्याचमुळे आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम वा प. बंगालातील ममताबाईंचा तृणमूल काँग्रेस वा उत्तर प्रदेशात प्रसंगी मायावती वा मुलायमसिंग यांच्या पक्षांनाही भाजपने पदरी घेतले आणि पवित्र मानले. आता परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. काँग्रेस हा सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष देशभर जरत्कारू झाला असून भाजपने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. अशा प्रसंगी काँग्रेसची जी काही पापे दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत त्यात प्रादेशिक पक्षांचे तण साफ करण्यास भाजपने प्राधान्य द्यावे. तो पक्ष हे करू शकतो याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे राज्य स्तरावरील नेतृत्वाच्या कर्तृत्वास वाव देण्याचे त्या पक्षाचे धोरण असून शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे किंवा कल्याण सिंग वा रमण सिंग आणि अर्थातच नरेंद्र मोदी ही या धोरणास लागलेली फळे आहेत. भाजप महाराष्ट्राच्या बाबत मात्र करंटाच राहिलेला आहे.
याचे कारण शिवसेना. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या रेटय़ानंतर हा पक्ष काढला खरा, परंतु नंतर तो काँग्रेसच्या दावणीला बांधला. वसंतराव नाईक ते वसंतदादा पाटील यांच्यापासून ते अगदी विलासराव देशमुख यांच्यापर्यंत काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेचा परस्पर सोयीसाठीच वापर केला हा कटू असला तरी इतिहास आहे. अन्य राज्यांत प्रादेशिक पक्ष स्वबळावर सत्तेवर येत असताना या अप्रामाणिकपणामुळे महाराष्ट्रात शिवसेना तितक्या भव्य यशाच्या जवळपासदेखील पोहोचू शकली नाही. महाराष्ट्रात साहित्य वर्तुळात ज्याप्रमाणे लेखक-कवी एकमेकांच्या पाठी खाजवत एकमेकांभोवती कौतुकाच्या आरत्या ओवाळतात त्याचप्रमाणे नंतर शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांचे वर्तन होते. बाळासाहेब ठाकरे वा प्रमोद महाजन हयात होते तेव्हाही तेच होत होते आणि त्यांच्या पश्चातही तेच होत आहे. फरक इतकाच की बाळासाहेब ठाकरे – महाजन यांच्या काळात त्यात किमान सभ्यता आणि समंजसपणा होता. परंतु वडीलधाऱ्यांच्या पश्चात पोराटोरांनी कडाकडा भांडावे तसे आता या दोन पक्षांत होत असून अशा परिस्थितीत एकीचा देखावा करण्यात काहीही शहाणपणा नाही. त्यात ना आहे अभिनयकौशल्य ना संहितेचा प्रामाणिकपणा. असे झाले की प्रयोग पडतो. सेना-भाजपचे हे असे झाले आहे. ताज्या लोकसभा निवडणुकीतील कथित यशामुळे सेनेस स्वकर्तृत्वाचा भ्रम निर्माण होणे साहजिकच. परंतु तो भ्रम आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी भाजपची आहे. शिवसेनेला जे काही यश मिळाले ते भाजपशी संग असल्यामुळेच. तो नसता तर राजस्थान वा मध्य प्रदेशात जे काही झाले ते झाले नसते. तेव्हा अशा परिस्थितीत हा अनैसर्गिक संसार आणखी पुढे रेटण्याचा व्यभिचार भाजपने करू नये.
हाच युक्तिवाद काँग्रेसलाही लागू पडतो. आजमितीला राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व ही फक्त शरद पवार आणि कु टुंबीय यांचीच गरज आहे. पक्ष स्थापन करताना सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा सत्तेत सहभागाची संधी आल्यावर शरद पवार यांनी आनंदाने गुंडाळून ठेवला आणि सोनिया गांधी यांच्याच दरबारात मनसबदार होणे पसंत केले. ज्याप्रमाणे शिवसेना आपल्या प्रादेशिकत्वाबद्दल प्रामाणिक नाही त्याचप्रमाणे, किंबहुना अधिकच, राष्ट्रवादीदेखील आपल्या राजकारणाबाबत अप्रामाणिक आहे. काँग्रेसने केलेल्या अपमानाच्या भावनिक मुद्दय़ावर शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे अस्तित्व निर्माण केले खरे, पण सत्तेसाठी त्याच भावनेशी तडजोडी करीत गेल्यामुळे त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता कधीही रुजली नाही. एकाच वेळी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसचलित संयुक्त पुरोगामी आघाडी अशा दोघांशी बोलणी करण्याचे राजकीय चातुर्यदेखील त्यांच्या नावावर असल्यामुळे आज त्या पक्षाचे अस्तित्व आकुंचन पावू लागले आहे. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या त्यांच्या तयारीचे काँग्रेसने कौतुकच करावयास हवे. याचे कारण असे की आजघडीला काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीही नाही आणि राष्ट्रवादीबरोबर लावलेला त्यांचा पाट त्यांना काही कमावूनही देणार नाही. जे काही वाटोळे व्हायचे होते ते काँग्रेसने कधीच करून घेतले आहे. अधिक काही उरले असल्यास ती कामगिरी पार पाडण्यास चि. राहुलबाबा गांधी समर्थ आहेत. तेव्हा वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटले तरी खाणारच अशी त्या पक्षाची अवस्था आहे. तेव्हा राष्ट्रवादीच्या कागदी वाघास माननीय वाघोबा म्हणून मान देत बसण्याचे काँग्रेसला काहीही कारण नाही. राष्ट्रवादीचा हा कथित वाघोबा निवडणुकीनंतर प्रसंगी काँग्रेसकडे ढुंकूनदेखील पाहणार नाही. तेव्हा आगामी निवडणुकोत्तर सत्तासोयरिकीत राष्ट्रवादीकडून तोंड फिरवले जायच्या आत राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या काँग्रेसने आधीच हे स्थळ नाकारावे आणि काही किमान शहाणपण आपल्यात शिल्लक आहे याचा प्रत्यय जनतेस द्यावा.

काँग्रेस काय आणि भाजप काय. या दोन्ही पक्षांनी स्वत:स प्रादेशिक पक्षांस बांधून घेतल्यामुळे स्वत:चे तर नुकसान करून घेतलेच. परंतु राज्यासही मागे लोटले आहे. या दोन्ही पक्षांसमोर प्रामुख्याने आज काम आहे ते आपापल्या प्रादेशिक पक्षांच्या नाकदुऱ्या काढत  बसणे हे. या तडजोडीच्या राजकारणामुळे राज्याचे अतोनात नुकसान झाले असून त्याचमुळे आज महाराष्ट्रास राज्यस्तरीय नेतृत्व नाही. यातील विरोधाभास हा की राज्याने पाहिलेला शेवटचा नेता म्हणजे शरद पवार. १९७८ साली व नंतर शरद पवार यांची महाराष्ट्रातील कारकीर्द ही त्यांच्याच नव्हे तर राज्याच्या इतिहासातील सर्वात प्रगतिशील कालखंड होता. त्यानंतर राष्ट्रीय राजकारण की प्रादेशिकता या द्वंद्वात शरद पवार अडकले आणि त्यांचे राजकारण आक्रसत गेले. राष्ट्रीय नेता म्हणून उभे राहण्यासाठी राष्ट्रीय राजकारणातच असावे लागते असे नाही. सलग पंचवीस वर्षे प. बंगालचे नेतृत्व करणारे ज्योती बसू हे त्यांच्या प्रादेशिक कर्तृत्वावरच मोठे झाले आणि सलग तेरा वर्षे फक्त गुजरात एकहाती हाकल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. राष्ट्रीय पक्षाचे प्रादेशिक नेतृत्व करण्यात काहीही कमीपणा नसतो.
तेव्हा उगाच आणखी गुऱ्हाळ न घालता भाजप आणि काँग्रेस यांनी आपापल्या प्रादेशिक संबंधांना तिलांजली द्यावी. त्यामुळे या पक्षांतून स्थानिक नेतृत्व तयार होईल. नाहीतरी या दोन्ही पक्षांच्या मित्रपक्षांना स्वबळाचा कंडू सुटलेला आहेच. तो कायमचा शमवावा. त्यातच त्या पक्षांचे आणि राज्याचेही हित आहे.