दगडांनाही बोलकं करण्याची कला त्यांच्या हातात होती. एकाच साधनातून कला सादर करण्यापेक्षा वेगवेगळी साधने वापरण्याच्या प्रयोगांमुळे त्यांची शिल्पे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कलोपासक अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांच्या प्रशंसेस पात्र ठरली होती. त्यांचे नाव महेंद्र पंडय़ा. त्यांचे नुकतेच निधन झाले.

गुजरातमधील भरुच जिल्ह्य़ातील इंदोर या गावात १९२६ मध्ये पंडय़ा यांचा जन्म झाला. त्यांनी बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून अभिजात कला विषयात बीए पदवी घेतली. त्यानंतर याच विद्यापीठात या कला विभागाचे ते अधिष्ठाताही होते. त्यांनी भारतीय प्राचीन कथांवर आधारित कलाकृती सादर करताना त्यांची वर्तमानाशी सांगड घातली, ते चित्रकारापेक्षाही शिल्पकार म्हणून जास्त प्रसिद्ध होते. कांस्य, दगड, लाकूड, सिमेंट, धातूचे पत्रे ही सर्व कला साधने वापरून साकारलेली शिल्पे सुंदरतेची साक्ष देतात. त्यातील काही शिल्पे मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थेच्या संग्रहात कायमस्वरूपी ठेवण्यात आली आहेत. दिल्लीतील ललित कला अकादमी व द म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, युनिसेफ, हैदराबादचे सालारजंग संग्रहालय येथेही त्यांच्या कलाकृती आहेत. त्यांच्या शिल्पांमध्ये ‘क्युबिझम’ या पाब्लो पिकासो व जॉर्जेस ब्रॅक यांनी विकसित केलेल्या अमूर्त शैलीचे दर्शन घडते. कांस्य, संगमरवर अशा अनेक कला साधनांतून त्यांनी काम केले. अ‍ॅल्युमिनियम कलासाधनात फेरफुगडी खेळणाऱ्या मुलींचे त्यांनी साकारलेले शिल्प आकाराने लहान असले तरी त्यातील सुबकता, उत्कृष्टता कलाप्रेमी मनाला साद घालते. नाटक, नृत्य, संगीत अशा सर्व कलांची त्यांना आवड होती, पण सरतेशेवटी शिल्पकलेशी त्यांचे नाते कायमचे जुळले. त्यांची चित्रे व शिल्पे यांचा सुरेख संगम असलेले ‘क्षुधित पाषाण’ हे सिंहावलोकनी कलाप्रदर्शन २०१२ मध्ये रसिकप्रिय ठरले होते. बडोद्याच्या सौंदर्यात त्यांनी साकार केलेल्या कारंजाने मोठी भर टाकली. १९८० नंतर बडोद्यातील एम.एस. महाविद्यालयातून गुजरातीपणा निघून जातो की काय अशी स्थिती असताना पंडय़ा यांनी तो टिकवून ठेवला. के. जी. सुब्रमणियन, ज्योती भट्ट, नागजी पटेल, ध्रुव मिस्त्री व गुलाम शेख आदींनी घडवलेल्या बडोदा कला परंपरेचे पंडय़ा हे पाईक होते. मथुरेतील कुशाण यक्षी, गुजरातमधील मध्ययुगीन काळात सज्जांची असलेली रचना, पौराणिक कथा, जातक कथा ही त्यांची प्रेरणास्थाने होती. त्यांच्या कलाकृती प्राचीन कथांवर आधारित होत्या, त्यावर पाश्चात्त्य शैलीचा प्रभाव असला तरी त्यांनी भारतीयत्व सोडले नव्हते.