आज जगात लोकसंख्येच्या मापाने सगळ्यात मोठे असलेले दोन धर्म म्हणजे अनुक्रमे ‘ख्रिश्चन’ व ‘मुसलमान’ हे होत. यांचा जगभर प्रसार मुख्यत्वे तलवार आणि आक्रमणांच्या जोरावर झालेला आहे. हे दोन्ही धर्म ज्या ज्यू धर्मातून निर्माण झाले तो ज्यू धर्म मूलत: आशिया खंडाच्या पश्चिम टोकाला पॅलेस्टाइनमधील सेमिटिक वंशाच्या हिब्रुभाषिक इस्रायली किंवा ज्यू लोकांचा धर्म होय.

मानवजात आफ्रिका खंडात एका विशिष्ट मर्कट जातीमधून केव्हा आणि कशी उत्क्रांत झाली व तिथून बाहेर पडून जगभर वेगवेगळ्या खंडांमध्ये माणूस केव्हा व कसा पसरला, हे पहिल्या दोन प्रकरणांत आपण अगदी थोडक्यात पाहिले. अनेक अडचणींना तोंड देत देत मानवजात जगभरच्या अनेक भूखंडांतील जमिनींवर sam08पोहोचली, पसरली. ही मानव-विजयाची पहिली पायरी होती. जग व्यापताना जिथे जिथे पिण्याच्या पाण्याची व सुपीक जमिनीची-जंगलांची भरपूर उपलब्धता होती तिथे तिथे स्थायिक होऊन मानवजातीने त्या त्या भूखंडातील सूर्यप्रकाश आणि हवा, वारा, पाऊस, वनस्पती इत्यादींच्या दृष्टीने ‘सर्वाना सोयीस्कर अशा जीवनपद्धती’ म्हणजे ‘संस्कृती’ स्थापित केल्या व ते तिथे तिथे सुस्थापित, सामाजिक, सुसंस्कृत जीवन जगू लागले. ही मानव-विजयाची दुसरी पायरी होय. जगातील या प्राचीन मानवी संस्कृती मूलत: आफ्रिकेत जन्मलेल्या मानवाने ‘ज्या मार्गाने’ जगभर पसरायला सुरुवात केली, त्याच मार्गावरील मुख्यत्वे मोठमोठय़ा नैसर्गिक नद्यांच्या काठी निर्माण झाल्या. त्यात आफ्रिकेतील इजिप्तमधील नाईल नदीनंतर मध्यपूर्वेतील इराकच्या आसपासच्या टायग्रिस व युफ्रेटिस या नद्या व त्यानंतर भारतातील सिंधू नदी येथपर्यंतचा सर्व परिसर आधी येतो आणि याच भूभागात जगातील प्राचीनतम मानवी संस्कृती पाच ते आठ हजार वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असाव्यात, असे मानववंशशास्त्रज्ञ व इतिहास संशोधक सांगतात.
या प्राचीनतम संस्कृती निर्माण होण्यापूर्वी भूपृष्ठावरील अनेक भूभागांत असाही काळ येऊन गेला, की तिथे त्यावेळी मनुष्य अर्धरानटी अवस्थेत जीवन जगत होता. निसर्गातील ऊन, वारा, पाऊस, ढगांचा गडगडाट, वीज इत्यादींना भीत होता. भीतीपोटी डोंगर, नदी, वृक्ष इत्यादींना तो संरक्षक देव मानीत होता. देव हे कुणी जादूगार आहेत व ते निसर्गनियमांच्या पलीकडे असून ते निसर्गावर प्रभुत्व गाजवू शकतात, असे त्यांना वाटत होते. निसर्गपूजेनंतर बहुदेवता पूजा आल्या व त्याच्या पुढील पायरीवर माणूस जातीला त्याच्या सांस्कृतिक वाटचालीत एकेश्वरवाद सुचलेला आहे असे म्हणता येईल.
ईशान्य आफ्रिकेत नाईल नदी असलेल्या इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्सचे पुरावे हे सुमारे इ.स.पू. ३-४ हजार म्हणजे आजपासून पाच-सहा हजार वर्षांच्या पूर्वीचे आहेत. इजिप्तच्या राजाला फॅरोह म्हणत व त्यालाच देव म्हणजे रक्षणकर्ता मानीत असत. परंतु देवाधिदेव म्हणजे परमोच्च देव म्हणून ‘री’ या सूर्यदेवतेला तेथील लोक मानीत असत. ते लोक केवळ फॅरोहच नव्हे तर इतरही पुष्कळ लहान देवदेवता मानीत असत. उदाहरणार्थ, वनस्पती व धनधान्याची देवता ‘ओसिरिस’ ही होती. नंतर आजपासून सुमारे चार हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.पू. २०००च्या आसपास बॅबिलॉन-टिग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात वसलेला भूभाग- येथे एक संस्कृती निर्माण झाली होती. या संस्कृतीला काही इतिहासतज्ज्ञ, मानवी संस्कृतींची जननी मानतात. येथील एक राजा हम्मुराबी (इ.स.पू. १८वे शतक) याची इतिहासाने नोंद घेतलेली आहे. त्याच्या राज्यात काही टोळीप्रमुख, उच्चभ्रू समाज आणि विविध देवतांचे पुजारी, दीनदुबळ्या प्रजेच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटत व छळत होते. त्याबाबत असे समजले जाते की हम्मुराबीने ईश्वराज्ञेने उपद्रवी उच्चभ्रूंच्या विरोधात सामान्य जनतेची बाजू घेतली व लोकांनी बहुदेवतांची पूजा न करता ‘मर्डूक’ या एकाच सर्वश्रेष्ठ ईश्वराची पूजा करावी असे सांगितले. त्याने त्या मर्डूक या आद्य ईश्वराचे भव्य मंदिर बांधले व त्याच्या पूजेला प्राधान्य दिले. पण इतर देवांच्या पूजाही लोकांमध्ये चालू राहिल्या. हम्मुराबीच्या एकेश्वरपूजनाचा व इतर कायदे जे त्याने दगडी खांबांवर कोरून ठेवले होते ते शिलालेख उत्खननात १९०२ साली सापडले आहेत.
बॅबिलोनच्या हम्मुराबीनंतर सुमारे एक हजार वर्षांनी असेल, एका वेगळ्याच ठिकाणी ‘इराणमध्ये’, कदाचित मध्य आशियातून येऊन तिथे स्थिर झालेल्या, आर्याच्या एका शाखेतील ‘झरथ्रुष्ट’ या प्रेषिताने ‘अहुरमज्द’ हा एकमेव आणि सर्वथा चांगला असा ईश्वर असून ‘अहरीमन’ हा दुष्ट वृत्तीचा त्याचा विरोधक आहे व या दोघांमध्ये जगभर सतत युद्ध चालू असते असे सांगितले. त्यानंतर फार पुढील काळात मुसलमान धर्म स्थापन होऊन त्यांची आक्रमणे सुरू झाल्यानंतर झरथ्रुष्टाचे अनुयायी इराण सोडून इतर देशांत गेले. भारतात आलेल्या त्याच्या अनुयायांना ‘पारशी’ म्हणतात. हे लोक अग्नीपूजक आहेत. अवेस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नसून तो आठवणीने पुनर्लिखित केलेला आहे. आज जगात लोकसंख्येच्या मापाने सगळ्यात मोठे असलेले दोन धर्म म्हणजे अनुक्रमे ‘ख्रिश्चन’ व ‘मुसलमान’ हे होत. यांचा जगभर प्रसार मुख्यत्वे तलवार आणि आक्रमणांच्या जोरावर झालेला आहे. हे दोन्ही धर्म ज्या ज्यू धर्मातून निर्माण झाले तो ज्यू धर्म मूलत: आशिया खंडाच्या पश्चिम टोकाला पॅलेस्टाइनमधील सेमिटिक वंशाच्या हिब्रुभाषिक इस्रायली किंवा ज्यू लोकांचा धर्म होय. यांचा एक मोठा ईश्वरनिष्ठ प्रेषित (ईश्वरी हुकूम व देणगी प्राप्त झालेला अपवादात्मक पण माणूसच) आब्राहम हा होऊन गेला.
बायबल (जुना करार) मधील जेनेसिसप्रमाणे आधी ‘आदम’, नंतर ‘नोहा’, नंतर आब्राहम यांच्यानंतर ‘मोझेस’ हा ज्यूंचा फार मोठा प्रेषित, येशू ख्रिस्ताच्या तेरा शतके आधी होऊन गेला. मोझेस ईश्वराला याहवेह (किंवा जेहोव्हा) म्हणत असे. इजिप्तमध्ये स्थलांतरित झालेले हिब्रू लोक, ज्यांचा तेथील राजाने अतोनात छळ केला होता त्यांना मोझेसने वाचविले. जेहोव्हा हाच साऱ्या जगाचा-विश्वाचा निर्माता आहे व त्याच सर्वश्रेष्ठ ईश्वराने, मानवाच्या कल्याणासाठी त्याला दहा धर्माज्ञा दिलेल्या आहेत असे त्याने सांगितले. जेहोव्हाने ज्यू या त्याच्या आवडत्या लोकांसाठी, व्यक्तीप्रमाणे बोलून स्वत: प्रकट केलेला हा धर्म आहे असे सांगितले. ज्यू, ख्रिश्चन व मुसलमान या तीन धर्माना सेमिटिक परंपरेतले धर्म असे मानले जाते; पण पुढील काळात यांच्यात आपापसात हेवेदावे, दुष्टावे, युद्धे आणि कत्तलीसुद्धा झालेल्या आहेत.
ज्यू धर्मानंतर आजपासून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पश्चिम आशियातच ‘येशू ख्रिस्त’ होऊन गेला. तो स्वत:ला आकाशातील प्रेमळ बापाचा एकमेव पुत्र म्हणवीत असे. त्यानंतर अरबस्तानातील टोळ्यांमध्ये इ.सनाच्या सहाव्या शतकात ‘महम्मद पैगंबर’ या प्रेषिताचा जन्म झाला. त्याने स्थापन केलेला धर्म हा मुसलमान (इस्लाम) धर्म होय. तो स्वत:ला एकमेव ईश्वर अल्लाचा ‘शेवटचा प्रेषित’ म्हणवीत असे. ज्यूंच्या प्रेषितांना ख्रिश्चन व मुसलमान धर्मीय लोक प्रेषितच मानतात. महम्मद यांच्या मते ‘येशू ख्रिस्त हा ईश्वराचा प्रेषितच होय, पण तो ईश्वराचा पुत्र नव्हे. ईश्वराचा पुत्र कुणीच नाही; ईश्वराला पुत्र असणे शोभत नाही.’
चीन या मोठय़ा आकाराच्या पण एकभाषिक देशात इ.स.च्या सहाव्या शतकापूर्वीसुद्धा ईश्वराला शोधून काढण्याला फारसे महत्त्व नव्हते. पण चीनच्या राजाला मात्र स्वर्गाचा पुत्र मानले जाई. तो स्वर्गाचा प्रतिनिधी असल्यामुळे प्रजेला त्याची आज्ञा शिरसावंद्य होती. पण तो आपली जबाबदारी नीट पार पाडीत नसल्यास, प्रजेला त्याची उचलबांगडी करण्याचा हक्क होता. इ.स.पू. सहाव्या शतकात लाओत्से आणि पाठोपाठ कन्फ्युशियस यांनी अनुक्रमे ताओइझम आणि कन्फ्युशिअ‍ॅनिझम हे आपले धर्म स्थापन केले. त्यांनीसुद्धा देव-ईश्वर आहे की नाही या वादात न पडता, पण ईश्वराला न नाकारता, गौतम बुद्धाप्रमाणे माणसांच्या गरजांकडे व दु:ख कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे बौद्ध धर्म चीनमध्ये गेला तेव्हा सर्वानीच त्याचे स्वागत केले व मिळतेजुळते घेतले.
याच इ.स.पू. सहाव्या शतकात भारतात महावीर जैन व गौतम बुद्ध हे दोन धर्म संस्थापक होऊन गेले. महावीराने ईश्वराचे अस्तित्व नाकारले व गौतम बुद्धाने त्याच्याविषयी बोलण्याचे नाकारले. परंतु या दोघांच्याही दोन हजार वर्षे अगोदर वेद रचणाऱ्या आर्यनिर्मित धर्म ज्याला आज हिंदू धर्म म्हणतात तो निर्माण झाला होता. त्याच्याविषयी पुढील प्रकरणात.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ