06 July 2020

News Flash

‘मर्द’च्या मर्यादा आणि ‘मावा’ची स्पंदनं

हिंदी सिनेसृष्टीतला आजचा आघाडीचा दिग्दर्शक व नट फरहान अख्तरने ‘मर्द’ अर्थात Men Against Rape and Discrimination अशी मोहीम सुरू केली आहे. यासाठी फरहानचे वडील आणि

| June 25, 2013 12:02 pm

हिंदी सिनेसृष्टीतला आजचा आघाडीचा दिग्दर्शक व नट फरहान अख्तरने ‘मर्द’ अर्थात Men Against Rape and Discrimination अशी मोहीम सुरू केली आहे. यासाठी फरहानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या कवितेचा मराठी अनुवादही झाल्याचे वाचले. मर्द स्थापन करण्यामागे स्त्री-पुरुष समानता रुजवण्याचा प्रयत्न असल्याचे फरहानने म्हटले आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे यात शंका नाही. पण यानिमित्ताने काही मुद्दय़ांची चर्चा व्हायला हवी. इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे चित्रपटसृष्टीतही स्त्री-पुरुष असमानता दिसून येते. शिवाय इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रात स्त्रियांच्या शोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे जगजाहीर आहे. हे शोषण अनेक स्तरांवरचे असते. मला वाटते, चित्रपटसृष्टीतले हे शोषण कमी करण्यासाठी फरहानने काम करायला हवे. कािस्टग काउचच्या रूपाने बायकांचे भीषण शोषण लोकांसमोर आलेले आहेच. त्याविषयीदेखील मर्दने काहीएक भूमिका घ्यायला हवी. ग्लॅमरच्या या दुनियेचे आकर्षण जोवर आहे तोवर संपूर्ण शोषणमुक्ती शक्य नाही. पण निदान याची व्याप्ती जरी कमी करता आली तरी खूप काही साध्य झाल्यासारखे होईल. समाजाला उपदेश करणे ठीक आहे किंवा समाज बदलावा यासाठी प्रयत्न करणेसुद्धा आवश्यकच आहे, पण आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत त्याचे काय? मला वाटते, खरी सुरुवात इथूनच व्हायला हवी. सिनेजगतातल्या स्त्री-शोषणावर मर्दने प्रकाशझोत टाकून ते कमी करण्यासाठी उपाययोजना केल्यास फरहान नक्कीच कौतुक आणि आदरास पात्र ठरेल.
पण हे होणार नाही. कारण स्त्री-शोषणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्वच कमीअधिक प्रमाणात सहभागी असतात. तेव्हा हे करणे सोपे नाही.
या ठिकाणी मावा अर्थात Men Against Violence and Abuse या मुंबई इथल्या स्वयंसेवी संस्थेचा विशेष उल्लेख करावा लागेल. प्रामुख्याने युवकांमध्ये काम करणाऱ्या या संस्थेच्या कामात समुपदेशन, युवा हेल्पलाइन, लिंगभाव जाणीव-जागृती अर्थात gender sensitization, युवा मत्री, युवा संवाद, मानुष अशा अभिनव उपक्रमांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष समानता- लंगिकता व आरोग्य यावर संवाद घडवून आणण्याचे कार्य युवा मत्रीमार्फत केले जाते; तर लिंगभाव समानतेचे परिपाठ युवा संसदमध्ये दिले जातात. मानुष म्हणजे पुरुषाचे माणूसपणाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणता येईल. तसेच युवकांसाठी gender and masculinity यावरही उद्बोधन करण्यात येते. ग्रामीण भागात संस्था लिंगभावावर आधारित िहसा या प्रश्नावर प्रामुख्याने कार्य करते. १९९६ पासून ‘माणूसपणाच्या वाटेवरची पुरुष स्पंदनं’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.
फरहानच्या मर्दच्या निमिताने, महाराष्ट्र/मुंबईत एक संस्था करीत असलेले मूलभूत कार्यही लोकांसमोर यावे!
– प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक

सहन करणे हा जालीम उपाय
‘केमिस्ट असोसिएशन’ने औषधांची दुकाने (मेडिकल्स) दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या केमिस्ट असोसिएशनची स्वार्थी हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी जी कारवाई सुरू केली, त्याच्या निषेधार्थ औषध विक्रेत्यांचं हे आंदोलन आहे. केमिस्ट असोसिएशनने आजतागायत प्रचंड अनागोंदी कारभार करून आपणा ग्राहकांना आणि काही प्रमाणात औषधनिर्मात्या कंपन्यांनाही लुटले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने केमिस्ट असोसिएशनचा हा सगळा गोलमाल बाहेर काढून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू केल्यानंतरच नागरिकांना वेठीला धरणारे हे आंदोलन सुरू झाले. मला वाटते, आपण ग्राहकांनी थोडा त्रास सहन करूनही चांगल्या कारवाईच्या पाठीशी आपण उभे राहिलो तर निश्चितपणे त्यांना बळ मिळेल आणि अनागोंदी थांबवण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांना हुरूप येईल!
रवींद्र पोखरकर, कळवा (ठाणे)

मानवी विकृतीचा लोंढा..
जोशीमठपासून गोविंद घाट ते केदारनाथपर्यंत ढगफुटीने केलेला हाहाकार कोणाच्याही मनाला अस्वस्थ करणारा आहे. लष्करी जवानांचे मदतकार्य युद्धपातळीवरून चालू असूनही, दुर्घटना होऊन एक आठवडा लोटला जाऊनही त्या स्थळी अद्यापही जीवित असणाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. केदारनाथच्या पुरातन मंदिराची दशा आणि विशेषत: उद्ध्वस्त मंदिर परिसर पाहून परिस्थिती मानवी आवाक्याच्या किती बाहेर गेली असावी ते लक्षात येते.या दुर्घटनेला पर्यावरणाचा नाश, दैवी किंवा निसर्गाचा प्रकोप कारणीभूत आहे असे सांगितले जाते. परंतु जेव्हा केदारनाथमध्ये एकीकडे पाण्याच्या अजस्र लोंढय़ात हजारो जणांना जलसमाधी मिळत असताना दुसरीकडे मंदिरात भाविकांनी केलेले दान जेव्हा दानपेटय़ा फोडून लुटले जाऊन त्या पेटय़ा तेथेच फेकून दिल्या गेल्याचे दिसते तेव्हा मानवी मनाच्या विकृतीचा कसा प्रकोप होऊ शकतो ते ध्यानात येते!
डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)

आपत्ती‘भेट’.. कोणाची, कशी?
‘मोदी यांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आक्षेप’ या बातमीतील (लोकसत्ता, २३ जून) दोन मुद्दे शंभर टक्के पटणारे आहेत. ते असे :
१) लष्कर व उत्तराखंड प्रशासन भाविकांच्या सुटकेसाठी प्रयत्नरत आहे. त्यांच्या कामात अडथळा न आणता शक्य ती मदत देण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न.
२) कोणीही मंत्री तेथे गेल्यास स्थानिक यंत्रणेला नाहक अडकून पडावे लागते. त्याचा परिणाम मदत कार्यावर होतो.
आता न पटणारा भाग असा की, ‘फक्त मी गेल्यास उचित आणि अन्य कोणी गेल्यास अनुचित’ अशा मानसिकतेच्या सर्वानाच हा उपदेश मान्यवर छगन भुजबळांनी करावयास हवा होता. तसे झालेले नाही. या संदर्भात २२ एप्रिल २०१३ च्या लोकसत्तामधल्या बोस्टन बॉम्बस्फोटासंबंधी बातमीतील ओळी आठवतात- ‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या काळात केलेली भाषणे हीसुद्धा तेथील एकूण व्यवस्थेच्या प्रगल्भतेची द्योतक होती. घेराव घालून तोंडातच बूमचे दांडके कोंबणाऱ्या पत्रकारांना बाइट देत बसण्याऐवजी ते थेट लोकांसमोर गेले.’
मोहन शुक्ल, खामला, नागपूर.

देव रोकडा सज्जनी!
केदारनाथच्या बुडणाऱ्या शिवमूर्तीचा फोटो दाखवून  ‘आता कुठे गेला तुमचा देव’ असं विचारण्याची सध्या साथ आलीय.
मला वाटतं, जो बुडाला तो देव नव्हताच. ती फक्त देवाची मूर्ती होती. माणसांनी आपल्या समाधानासाठी ‘देवा’ला केदारनाथला नेऊन बसवलं एवढच्ां. त्यामुळे इथे दोष देवाचा नाही, तर आपलाच आहे.या अशा आपत्तीतदेखील चोरी आणि लुबाडणूक यांचे बरेच किस्से कानावर येताहेत. अशा कलुषित वातावरणात आपल्यातली माणुसकी ज्यांनी जपली अशा सन्याच्या जवा नात आणि इतर लोकांतच खरा देव आहे अन् तो अजून तरी पूर्णपणे बुडालेला नाही. शेवटी तुकोबा म्हणतात तेच खरं.. ‘तीर्थी धोंडा पाणी।  देव रोकडा सज्जनी॥’
अनिरुद्ध ढगे, उस्मानाबाद.

दंडवतेंचे नाव द्या
कोकणात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी लवकरच सहकारी साखर कारखाना सुरू होतो आहे. या कारखान्यास कोकणचे सुपुत्र व केंद्रीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष, दिवंगत प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा विचार भावी संचालक मंडळाने जरूर करावा.
दंडवते यांनी नि:स्वार्थीपणे केलेल्या कार्याचे हे योग्य स्मारक ठरेल!
नितीन ग. गांधी, बोरिवली

पैसे सरकारकडून  कुठे जाणार आहेत?
केदारनाथच्या आपत्तीनंतर आर्थिक मदतीसाठी माननीय पंतप्रधांनाचे आवाहन वाचून आश्चर्य वाटले. आज सरकारकडे कोणतीच आपत्कालीन योजना नाही? लोकांकडे का म्हणून पसे मागायचे? मागायचे झाल्यास अन्न, औषधे, गरम कपडे मागितले असते तर ठीक.
सरकारची आपत्ती निवारण योजना कोठे आहे? ती आता काय करीत आहे? या प्रश्नाची सरकारकडे उत्तरे आहेत? काहीही झाले की लोकांकडे पसे मागा. मी आवाहन करतो की, मदत करा, पण पशांची नको. पैशांना कसे पाय फुटतात ते साऱ्यांना माहीत आहे.
– सुनील सुदामे, डोंबिवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2013 12:02 pm

Web Title: mard men against rape and discrimination a social campaign
Next Stories
1 साऱ्यांचेच पाय मातीचे..
2 हिंदवी.. आंबेडकर.. हिंदुत्व.. आणि आठवलेंचे शहाणपण
3 भाविकांनीही विचार करावा!
Just Now!
X