News Flash

मोदी यांचे तर्कशास्त्र!

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांना होणारा विरोध राजकीय किंवा सत्तास्पर्धेच्या स्वरूपाचा असला, तरी त्यांच्या वक्तृत्वाबद्दल, भाषेबद्दल विरोधकांनीही आक्षेप घेतलेला नाही.

| July 30, 2013 01:01 am

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांना होणारा विरोध राजकीय किंवा सत्तास्पर्धेच्या स्वरूपाचा असला, तरी त्यांच्या वक्तृत्वाबद्दल, भाषेबद्दल विरोधकांनीही आक्षेप घेतलेला नाही. तर्कशास्त्राच्या आधारे पाहिले तर मात्र मोदी यांच्या भाषेवर आणि अर्थसूचन करण्याच्या त्यांच्या पद्धतीवर आक्षेप घेतले जाऊ शकतात..
‘रॉयटर्स’ या अमेरिकन वृत्तसंस्थेला गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीमधील वक्तव्ये तर्काच्या कसोटीला उतरणारी नाहीत, सबब ती सुतर्कित नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते. ‘तुमचे खरे रूप कोणते? हिंदू राष्ट्रवादी नेते की व्यापारी वृत्तीचे मुख्यमंत्री?’ या प्रश्नाला त्यांचे उत्तर पुढीलप्रमाणे होते- ‘मी हिंदू धर्मात जन्माला आलो. मी राष्ट्रवादी आहे. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे तुम्ही मला हिंदू राष्ट्रवादी म्हणू शकता.’ ‘जनतेने प्रगतिशील, विकासोन्मुख काहीही म्हणू दे. हे सर्व एकच गुण आहेत.’ सदर वक्तव्यातील पहिली चार विधाने शब्दश: खरी वाटली तरी त्यातील युक्तिवाद मात्र तर्कसुसंगत नव्हता, हे कुणीही सजगपणे विचार केल्यास जाणवावे. त्यातली मेख आहे ती ‘हिंदू’ आणि ‘राष्ट्रवाद’ या शब्दांच्या अर्थनिर्णयनाबाबत. ‘हिंदू’ या शब्दाचे नाना अर्थ संभवतात. इतका आशयघन, वादग्रस्त असा हा शब्द आहे. ‘हिंसेने दु:खी होतो तो हिंदू’ असा ‘हिंदू’ या लघुरूपाचा व्यापक मानवतावादी अर्थ आचार्य विनोबा भावे यांनी एके काळी मांडला होता. विविध धर्माचा त्यांचा सखोल अभ्यास आणि ‘जय जगत्’ या त्यांच्या भूमिकेला तो साजेसाच म्हणावा लागेल. गुरुदेव टागोरांचा तर राष्ट्रवादालाच मुळात विरोध होता. त्यांच्या मते राष्ट्रवाद हा राष्ट्राराष्ट्रांमधील सामंजस्याला आणि विश्वबंधुत्वाला आडकाठी करतो. वैश्विक मानवतावादाची पायरी म्हणूनच केवळ विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रवाद स्वीकारण्याजोगा असतो. मथितार्थ हा, की गर्वाने मिरवावे असे राष्ट्रवादात काहीही नसते- ना हिंदू असण्यात! असते ती जबाबदारीच. व्यापक अशा या उपरोक्त भूमिकांच्या पाश्र्वभूमीवर विचार करता मोदींना यातील कुठलाच अर्थ अभिप्रेत नसावा.
याच मुलाखतीत ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे भारताला सर्वोच्च प्राधान्य. सर्वाना समान न्याय’ अशी आपली भूमिका त्यांनी मांडली आणि तरीही स्वत:ला ‘भारतीय राष्ट्रवादी’ असे आवर्जून म्हणून घेतले नाही हे अन्वर्थक म्हणावे लागेल. गुजरातमध्ये झालेल्या दंगलींविषयी बोलताना अल्पसंख्याकांच्या बाबतीत ‘कुत्र्याचे पिल्लू आपल्या गाडीखाली आल्यावर वाईट वाटणारच, पण आम्ही योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले’ अशी ग्वाही त्यांनी दिली, यात आश्चर्य वाटायला नको. स्वत:ची ‘विकासोन्मुख’ ही प्रतिमा निर्माण करण्याच्या नादात आपल्या भरधाव राज्यशकटाखाली अल्पसंख्याकांच्या हिताचा बळी गेल्यावर हळहळण्यापलीकडे ते तरी काय करणार होते म्हणा! परंतु इथे धर्मनिरपेक्षतेच्या आपल्याच व्याख्येशी विसंगत भूमिका घेत, बहुसंख्याकांच्या म्हणजे हिंदूंच्या हिताला आपली निष्ठा वाहिल्याची आपण त्यातून अप्रत्यक्षपणे कबुली देत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. व्यापक मानवतावाद सोडाच, निदान भारतीय राष्ट्रवादात अभिप्रेत धर्मनिरपेक्षता जपण्याची आपली जबाबदारी होती, असणार आहे- नव्हे पंतप्रधानपदाचे संभाव्य दावेदार म्हणून तरी नक्कीच असायला हवी हे व्यवधान, परदेशी वृत्तसंस्थेसमोर बोलताना तरी मोदींनी बाळगणे अपेक्षित होते. परंतु तसे घडले नाही.
एका अर्थी हे ठीकच झाले म्हणायचे! ‘आपण आत एक बाहेर दुसरेच असे काही करीत नाही, आपण स्पष्टवक्ते, प्रांजळ आहोत, वस्तुनिष्ठ आहोत. आपली भाषा पारदर्शी असते’ या आविर्भावात मोदी स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेताना प्रत्यक्षात मात्र भाषेशी आणि तर्काशी मनमानी करतात हे तरी दिसून आले. अर्थात ती ओळखण्यासाठी आधी भाषेचे स्वरूप समजून घेणे उचित ठरावे.
भाषा ही मानवी जीवनातील संप्रेषणाचे महत्त्वाचे साधन आहे. जसजसे मानवी जीवन उत्क्रांत होत जाते तसतशी भाषाही अधिकाधिक सूक्ष्म तरल आणि व्यामिश्र होत जाते. म्हणूनच भाषेची कल्पना करणे म्हणजे ती बोलणाऱ्या व्यक्तींच्या किंवा व्यक्तिसमूहांच्या जीवनसरणीची कल्पना करणे ठरते. माणूस भाषा निर्माण करतो हे खरेच, पण भाषासुद्धा ऐरणीसारखी माणसाला घडवण्याच्या कार्यात आपली भूमिका बजावत असते. त्याच्या जडणघडणीत ‘जग असे असे असते’ या धर्तीचे जगाविषयीचे वस्तुनिष्ठ आकलन अनुस्यूत असते- एवढेच नव्हे तर ‘जग कसे असावे?’ याविषयीचे मूल्याधिष्ठित आकलनही समाविष्ट असते. आपल्या भावभावना, वृत्ती-प्रवृत्ती, आशाआकांक्षा, भूमिका, पवित्रा, नीतिकल्पना तसेच अभिरुचीचे मानदंड इ.मधून जगाविषयीच्या माणसाच्या कल्पना आकाराला येतात, त्यात भाषेने घडविलेल्या संकल्पनांचा आणि त्यामागील वैचारिक कोटींचाही महत्त्वाचा वाटा असतो. तेव्हा जगात घडणाऱ्या घटनांचे, तथ्यांचे वर्णन करणे हाच भाषेचा एकमेव वापर नव्हे. मानवाच्या अंतरीच्या नाना कळा व्यक्त करण्याची भाषेची ताकद विलक्षण असते- त्यानुसार कृतिपर, आदेशपर, अभिव्यक्तिपर, मूल्यमापनपर असे विविध प्रकारचे भाषेचे वापर संभवतात हा एक मुद्दा आणि दुसरा म्हणजे भाषेतील काही शब्द बंदिस्त नसतात, त्यांचे अनेक अर्थ संभवतात. उदा. ‘खरे’ हा शब्द ‘खोटे’, ‘कृत्रिम’, ‘नकली’, ‘भासमान’, ‘कृतक्’, ‘असत्’ अशा अनेक शब्दांच्या विरुद्ध अर्थाचा म्हणून संदर्भाप्रमाणे अर्थ ठरणारा असतो, तर काही शब्दांमधून एकाच गोष्टीचा किंवा वस्तूचा निर्देश होतो. उदा. ‘नारी’, ‘महिला’, ‘वनिता’, ‘ललना’, ‘स्त्री’- अर्थात छटा भिन्न असूनही. तेव्हा भाषा नेहमीच पारदर्शी, वाच्यार्थाने घेण्याजोगी असत नाही, तर वक्त्याला काय सांगायचे आहे, काय दडवायचे आहे, काय साधायचे आहे, काय व्यक्त करायचे आहे या आणि अशा प्रयोजनांनुसार तिचे स्वरूप गढुळलेले, माखलेले, व्यामिश्र, संदिग्ध असे राहते. भाषेच्या या पैलूला आशयघनता किंवा अनेकार्थ सूचकता (intensionality) असे म्हटले जाते. भाषेचा हा पैलू तर्कशास्त्राचे काम काहीसे अवघड करून ठेवतो. तर्कशास्त्राला आपले नियम काटेकोरपणे भाषेतील युक्तिवादांना लागू करण्यासाठी भाषेचे सपाटीकरण करावे लागते आणि भाषेतील वर्णनपर वाक्यांवर म्हणजे विधानांवर आणि शब्दांच्या वाच्यार्थावर भिस्त ठेवत ‘जर.. तर.. म्हणून’ किंवा ‘अमुक, तमुक, त्यामुळे’ या साच्यात तिला बसवावे लागते. भाषेच्या या सपाटीकरणाला साजेशा पैलूला तिचा पसरटपणा किंवा व्यापकता (extensionality) म्हटले जाते. गफलत कुठे होत असेल तर भाषेच्या या दोन पैलूंची गल्लत करीत हवा तो निष्कर्ष काढण्यात आणि ‘यात काही चूक नाही’ असे मानण्यात!
मोदींच्या युक्तिवादाकडे पुन्हा वळू या. ‘हिंदू’ हा आशयघन शब्द मोदींनी द्वय़र्थीपणाने वापरला. सुरुवातीला अगदी सहजपणे स्वत:चे जैविक आणि सामाजिकदृष्टय़ा वर्णन करण्यासाठी, पण नंतर मात्र शब्दाचा अर्थ ताणून ‘हिंदूुत्वनिष्ठ’ या अर्थाने आपली राजकीय बांधीलकी आणि विकसित राष्ट्राची आपली कल्पना व्यक्त करण्यासाठी निष्कर्षांत बेमालूमपणे जसाच्या तसा वापरला. स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेताना भारतीय राष्ट्रवादाच्या घडणीमधील स्वातंत्र्यलढय़ाचे स्थान, जवळजवळ शतकापूर्वी गांधी-जिनांच्या उपस्थितीत पार पडलेली हिंदू-मुसलमान ऐक्य परिषद, धर्माधिष्ठित राष्ट्रवादाच्या सिद्धान्तानुसार झालेली फाळणी, भारताची निधर्मी राज्यघटना इ. राजकीय, ऐतिहासिक संदर्भ मोदींनी व्यवस्थितपणे नजरेआड केले आणि ‘विकासोन्मुख हिंदुत्वनिष्ठ नेता’ अशी आपली प्रतिमा त्यांनी पद्धतशीरपणे निर्माण केली. त्यासाठी ‘हिंदू’ शब्दाच्या अनेकार्थसूचक शब्दाचा आशयघनतेचा लाभ उठवत त्यांनी ही शाब्दिक धूळफेक केलेली आहे असे म्हणावे लागते. अ‍ॅरिस्टॉटलच्या तर्कशास्त्रात अशा युक्तिवादाला ‘संदिग्धतेचा तर्कदोष’ किंवा ‘चतुष्पदी तर्कप्रमाद’ म्हटले जाते. त्यानुसार मोदींच्या युक्तिवादात ‘मी’, ‘हिंदू’ आणि ‘राष्ट्रवादी’ अशी केवळ त्रिपदी नसून ‘हिंदुत्वनिष्ठ’ या अर्थाचे चौथे छुपे पदही निष्कर्षांत अभिप्रेत दिसते, त्यामुळे निष्कर्ष पुराव्याबाहेर जात अवैध ठरतो.
भाषेची ताकद मतलबीपणे वापरत शब्दांशी केलेला मनमानी खेळ अशी या वक्तव्याची दखल भाषेच्या आधुनिक तत्त्वज्ञानातही घेता येते. भाषेच्या वर्णनपर वापराची भाषेच्या अभिव्यक्तिपर वापराशी गल्लत करण्याचा हा तर्कप्रमाद म्हणता येईल.
समांतर अशा एका उदाहरणाने मोदींच्या युक्तिवादातील तर्कप्रमाद पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. एखाद्या व्यक्तीने स्वत:विषयी ‘मी काळा आहे’ असे विधान केले आणि पाठोपाठ ‘मी पैसेवाला आहे, या म्हणण्यात काही चूक नाही’ असे म्हटले तरी केवळ यावरून ‘तुम्ही मला काळा पैसेवाला म्हणू शकता’ अशी सवलत ती व्यक्ती इतरेजनांना देणार नाही, अजिबात देणार नाही. कारण ‘काळा पैसेवाला’ या शब्दबंधाला असणारी आशयघनता (आर्थिक, कायदेशीर, राजकीय, नैतिक इ.) ‘काळा’ आणि ‘पैसेवाला’ याआधीच्या वर्णनपर विधानांमधील सुटय़ा शब्दांना नाही याची स्पष्ट जाणीव त्या व्यक्तीच्या ठिकाणी असते. जे (आधारविधानांच्या) आडात नाही ते (निष्कर्षांच्या) पोहऱ्यात असणार नाही हा तर्काचा साधा नियम सामान्य व्यक्तींकडूनही नकळत पाळला जातो. त्यायोगे अर्थाचा अनर्थ टळतो, तर्कप्रमाद टळतो. उलट मोदी मात्र आपल्या भाषापटुत्वाआधारे ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ हवा तसा ताणून आपला जुना व सर्वपरिचित अजेंडाच दामटताना दिसतात. ‘नरेंद्रा, अजब तुझे तर्कशास्त्र!’
* लेखिका तर्कशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.
* उद्याच्या अंकात सुहास पळशीकर यांचे    ‘जमाखर्च राजकारणाचा’ हे सदर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2013 1:01 am

Web Title: modis logic science
Next Stories
1 अणुऊर्जेची ‘बंद’ चर्चा!
2 पोलिसांनाच न्यायाधिकार?
3 सुंदर भिंतीपलीकडे..
Just Now!
X