भारतीय जनता पक्षाच्या अश्वमेध यज्ञाला सुरुवात झाली असून, त्या यज्ञाच्या रिवाजाप्रमाणे घोडा चौखूर उधळू लागला असल्याने या घोडय़ाला जो लगाम घालण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याशी युद्ध करायचे आणि जो सलाम करेल, त्याने मांडलिकत्व स्वीकारायचे, अशा इतिहासाची आपण पुनरावृत्ती करत असून आपल्याला श्रीरामाप्रमाणेच त्यामध्ये यश मिळेल, असा आत्मविश्वास भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना आहे. या आत्मविश्वासाला दर्प आहे, तो सत्तेच्या मदांधपणाचा. सारा भारत काँग्रेसमुक्त करून टाकण्याचा शहा यांचा संकल्प किती यशस्वी होईल, हे ठरण्यास आणखी काही काळ जाईल. समोर शत्रूच नसताना युद्ध जिंकल्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या कर्तृत्वावर आणि मतदारांच्या विश्वासावर पुन्हा सत्ता हस्तगत करू, असे म्हणणे यालाच विधायक राजकारण म्हणतात, हे अमित शहा यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. २०१९ मध्ये देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपला प्रचंड बहुमत मिळेल, असे वक्तव्य त्यांनी पक्षाच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केले. देशातील १२ राज्यांमध्ये पक्ष वाढत असून त्याची सदस्यसंख्या दहा कोटींच्या घरात गेली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष आता भाजपच, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या शहा यांना यापुढील काळात पक्षाचा ठोस कार्यक्रम काय असेल आणि त्यामधून आपण सामान्यांच्या स्वप्नातला भारत कसा निर्माण करणार आहोत, याचे चित्र रंगवण्याची आवश्यकता वाटत नाही. आणखी चार वर्षांनी होणारी निवडणूक जिंकायची असेल, तर ती होण्यापूर्वी काही दिवसांपुरते ‘अच्छे दिन’ दिसणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील गुणात्मक फरक तो कोणता? संपूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या भाजपने गेल्या काही काळात असे कोणते महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले, की त्यामुळे अशा सुंदर दिवसांची खात्री पटावी? मतदारांना ऐन वेळच्या स्वप्नांमध्ये झुलवत ठेवून सत्ता मिळवणे हे तर काँग्रेसनेही इतकी वर्षे केले. भाजपलाही त्याच वाटेने जायचे आहे काय? तसे असेल तर अन्यांपेक्षा आपण फार निराळे आहोत, असा आव आणण्याचेही कारण नाही. या पाश्र्वभूमीवर सत्तेचा दर्प कमी होता, तरी बरे झाले असते. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या निवडणुकीत भाजपला सत्तांकुश मिळवायचा आहे. तेथे सध्या सत्तेत असलेल्यांच्या क्षीणतेचा फायदा उठवणे एवढाच जर भाजपचा हेतू असेल, तर त्या पक्षाकडून अधिक अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. जातीय समीकरणे मांडून सत्ता मिळवण्यात काँग्रेसचा हात आजवर कुणी धरू शकलेला नाही. भाजपला आता त्याच वाटेने जायचे आहे. बिहारमधील ओबीसींना अमित शहा यांनी जी साद घातली आहे, ती याच प्रकारची आहे. सत्ता कशासाठी मिळवायची, याचे जे धडे भारतीय जनता पक्षासाठी धर्मगुरू मानल्या गेलेल्या कौटिल्याने सांगितले आहेत, त्याचा विसर अवघ्या काही महिन्यांत पडावा? सामान्यांनी ज्या अपार विश्वासाने या पक्षाला निरंकुश सत्ता दिली, त्याला जागायचे नाही, असेच जर या पक्षाने ठरवले असेल, तर त्या विश्वासाला जाणाऱ्या तडय़ाचे रूप भगदाडात होईल, हे आता तरी लक्षात घेण्याची गरज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2015 रोजी प्रकाशित
स्वप्नाळू भाजप
भारतीय जनता पक्षाच्या अश्वमेध यज्ञाला सुरुवात झाली असून, त्या यज्ञाच्या रिवाजाप्रमाणे घोडा चौखूर उधळू लागला असल्याने या घोडय़ाला जो लगाम घालण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याशी युद्ध करायचे आणि जो सलाम करेल,
First published on: 08-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musing bjp