‘त्यांच्या शाळेतली मुले ब्लॉग लिहितात, वर्षांला ४० चांगली पुस्तके वाचतात, चांगली भाषणे ऐकतात, नवीन कल्पना सुचवतात, शाळेचे वाचनालय अद्ययावत आहे,’ असे त्या  सांगतात. लहानपणी त्यांना जे करायला मिळाले नाही ते त्यांनी लहान मुलांना करायला शिकवले. क्रमिक पुस्तकात त्या कधीच रमल्या नाहीत. त्यांनी वेगळे वाचन केले. या शिक्षणसंस्कारांमुळेच त्यांना शिक्षणाचा नोबेल मानला जाणारा १० लाख डॉलरचा ‘जागतिक शिक्षक’पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे नाव आहे नॅन्सी अ‍ॅटवेल.  वार्की फाऊंडेशनने दिलेला हा पुरस्कार दुबईत प्रदान करण्यात आला.
नॅन्सी अ‍ॅटवेल यांनी १९९० मध्ये अमेरिकेत  एजकॉम्ब येथे ‘द सेंटर फॉर टीचिंग अँड लर्निग’ ही शाळा सुरू केली. कमी शुल्क व जास्त शिक्षण हे त्याचे तत्त्व आहे. त्यांच्या शाळेतील विद्यापीठ शिक्षणापर्यंत पोहोचलेल्या मुलांची संख्या ९७ टक्के आहे. पुरस्काराच्या रकमेतून त्या शाळेचा बॉयलर दुरुस्त करून घेणार आहेत. किती अडचणींतून लोक मोठे काही करीत असतात याचेच हे उदाहरण. मुलांसाठी नवीन पुस्तके व शिष्यवृत्त्या सुरू करणार आहेत. त्यांच्या शाळेत दरवर्षी ८० मुलांना प्रवेश मिळतो व जगातील शिक्षक येऊन दर आठवडय़ाला मुलांमध्ये राहून शिकवतात. नॅन्सी अ‍ॅटवेल यांचा जन्म न्यूयॉर्क येथे १९५२ मध्ये झाला. त्यांच्या इन मिडल-रायटिंग रीडिंग अँड लर्निग विथ अ‍ॅडोलसेंट्स या पुस्तकाच्या ५ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. १९७३ मध्ये त्या शिक्षिका झाल्या. अलीकडेच त्यांना ‘रिव्हर ऑफ वर्ड्सचा टीचर ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. न्यू हॅम्पशायर विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली एनसीटीईचा पुरस्कार, डेव्हिड रसेल पुरस्कार असे अनेक  पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. नॅन्सी यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी शिक्षण पठडीबद्ध चौकटीतून बाहेर आणले. त्यांनी ‘लेसन्स दॅट चेंज रायटर्स’, ‘नेमिंग द वर्ल्ड – अ इयर ऑफ पोएम्स अँड लेसन्स कमिंग टू नो’, ‘द रीडिंग झोन’, ‘अंडरस्टँडिंग रायटिंग व साइड बाय साइड – एसेज ऑन टीचिंग अँड लर्न’ ही पुस्तकेही लिहिली आहेत. नॅन्सी स्वत: इंग्रजीच्या शिक्षक आहेत. ताप आल्याने लहानपणी रुग्णालयात ठेवले होते तेव्हा त्यांना वाचायची आवड लागली, ती त्यांनी आता मुलांमध्ये रुजवली आहे. मुलांच्या हातात योग्य वेळी योग्य ते पुस्तक पडले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांची मुलगी अ‍ॅनी अ‍ॅटवेल त्यांच्याच शाळेत शिक्षिका आहे. प्रयोगशील, नवप्रवर्तनशील शिक्षिका त्यांच्या अंगातच भिनली आहे असे म्हणायला हरकत नाही.