ज्यांना आजकाल ‘नॅशनल बेस्टसेलर’ असं म्हटलं जातं, त्यापैकी या दोन कादंबऱ्या आहेत. त्यांची फक्त ओळख करून देणं, हा ‘लोकसत्ता- बुकमार्क’चा हेतू अर्थातच नाही. वाचायला सोप्पी, उत्कंठा कायम ठेवून वाचणाऱ्यांना एखाद्या क्षेत्राची थोडीफार माहितीदेखील देणारी आणि तरीही साचेबंदच असल्यामुळे ‘त्रास न होता’ वाचता येणारी.. अशीच ही पुस्तकं असतात ना, याचा हा ताळाच. पण, साहित्याचा खप आणि ग्राहकता यांबद्दल पुढली गणितं मांडायला उद्युक्त करणारा..
इंग्रजी कादंबऱ्यांचा हंगाम जोमात असल्याने कादंबरीचे भरघोस पीक आपल्याकडे आले आहे. पत्रकारांपासून ते हौशा-गवशा आयआयटियन्सपर्यंत, चित्रपट तंत्रज्ञांपासून ते टीव्ही मालिकांशी निगडित असलेल्या व्यक्ती आपल्या भवतालाला कादंबरीतून व्यक्त करीत आहेत. यामुळे वार्षिक साहित्योत्पदानात होणारी वाढ प्रचंड असली, तरी या स्वघोषित ‘नॅशनल बेस्टसेलर्स’ना गुणात्मक दर्जा अद्याप यायचा आहे. भगत-त्रिपाठी यांचा लौकिक हस्तगत करण्यासाठी निघालेला लेखकपंथ- किंवा फौजच- निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे हाती चांगले मिळविण्यासाठी मोठय़ा शोधमार्गाचा अवलंब करण्याशिवाय सामान्य वाचकाकडे पर्याय उरत नाही.
यंग अ‍ॅडल्ट, चिक लिट कादंबऱ्यांची परंपरा नसलेल्या आपल्याकडे एकाएकी वाढलेले बहुतांश देशी इंग्रजी साहित्य तरुण तुर्काना लक्ष्य करून येत आहे. कॉलेजवयीन रोमान्स, बंडखोरीचा पवित्रा, शिक्षणव्यवस्थेवरील राग, एकूण व्यवस्थेवरील राग, पिढीगणिक मानसिक अंतर यांनी भरलेले हे तरुण तुर्की साहित्य एकसुरी वाटेवर जाताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये कविता मंडाना यांची ‘नंबर नाईन ऑन द शेड कार्ड’ ही कुटुंबप्रेमाची तरुण तुर्की कादंबरी वाचनसुखाचे चार क्षण देण्याची किमया घडवू शकते.
‘नंबर नाईन..’चा विशेष हा की, ती भाषेच्या आणि कथाघटकांच्या अंगाने कमालीची सहज-सोपी आहे. कथावळणांत उगाच अडचणींची वादळे आणून वाचनउत्सुकता ताब्यात घेण्याचा तिचा हेतू दिसत नाही. शिवाय आजच्या तरुण तुर्की साहित्याने वाचकांना सवय लावलेल्या घटकांचाही त्यात सुरेख वापर केला आहे. ही व्हॉट्स अ‍ॅप काळातील उमद्या क्रीडापटूची कहाणी आहे, कुटुंबांच्या प्रत्येक सदस्यातील एकमेकांप्रति प्रेमाची गोष्ट आहे, यात एक छोटीशी प्रेमकथा आहे, पारंपरिक भारतीय चौकोनी कुटुंबात असूनही पिढय़ांमध्ये निर्माण  झालेल्या आगळिकीची कथा आहे, याशिवाय काळ्या रंगांप्रति द्वेष व सौंदर्याप्रति भ्रामक संकल्पनांचे आगर असलेल्या भारतीय मानसिकतेविरोधी चर्चा आहे.
सुंदर आणि गोरे बनण्याचा दावा करणाऱ्या क्रीमच्या जाहिरातीमध्ये हळूहळू  ‘तिचा’ चेहरा गोरा कसा होत गेला हे दाखविलेले असते. त्या जाहिरातीतल्या चित्राशी तुलना करताना रंगाच्या बाबत सर्वात शेवटच्या नवव्या स्थानी असलेली निवेदिका या कथेची नायिका आहे. ही नायिका कुळकुळीत असली तरी कुरूप नाही. ती शाळेत पारितोषिकांवर पारितोषिके मिळविणारी उत्तम धावपटू आहे. धावण्यामुळे आणखी काळी होशील, असे सांगत सौंदर्य लेपांचा मारा करणाऱ्या आजीविषयी तिचे फार चांगले मत नाही. आपल्या क्रीडा यशामुळे असुयाशक्ती वाढलेल्या भावावर तिचा राग मोठा आहे. कुटुंबात फारसे लक्ष नसलेल्या आणि आपल्याच जगात धुंद असलेल्या आई-वडिलांबाबतही तिला ओढ नाही. आपल्या धावण्याच्या एककल्ली कार्यक्रमात आणि एकुलत्या एक मैत्रिणीशी आपल्या छोटय़ाशा जगाला ‘शेअर’ करीत ती आनंदी आहे.
एकीकडे धावपटू म्हणून शाळेतील सर्व आघाडय़ांवर उत्कर्ष होणाऱ्या या नायिकेच्या घरातून तिच्या खेळाला निव्वळ वाढत्या काळेपणामुळे विरोध निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते. याच दरम्यान तिचे सर्वाशीच खटके उडू लागतात आणि त्याच वेळी आजी दुर्धर आजाराने काही दिवसांची सोबती असल्याचे तिच्या लक्षात येते. एकाएकी नायिकेच्या सर्व गरजांचा क्रम, आपल्या कुटुंबीयांविषयीच्या मतांमध्ये बदल होऊ लागतो आणि कुटुंबाशी विस्तारत चाललेली तिची दरी मिटण्यास सुरुवात होते.  
नायिकेपासून ते कथेतील सर्वच पात्रे ही सगळ्याच भारतीय कुटुंबांसमोर आरसा धरतात. आजची मुले-मुली करिअरविषयी, आपल्या आवडींविषयी आणि आपल्या भवतालाविषयी किती सुज्ञ आहेत, याचे चित्रण या छोटेखानी कादंबरीमध्ये आहे. दोन पिढय़ांची विचारसरणी भिन्न असली, तरी ती संकटकाळात एकत्र कशी येऊ शकतात याचा लेखाजोखाही यात आला आहे.
कादंबरीचा मुखपृष्ठापासून असलेला वरकरणी क्रीडाकथेचा चेहरा आणि नायिकेच्या काळेपणातूनच आलेले ‘नंबर नाईन ऑन द शेड कार्ड’  या अतिमहत्त्वपूर्ण घटकांना कुटुंबकथेत रिचविल्यामुळे ती क्रीडाकथा राहत नाही की काळेपण हा शाप नसल्याच्या सिद्धांताला विस्तारू पाहत नाही. ती निव्वळ कुटुंबाची, कुटुंबासाठी लिहिलेली  खुसखुशीत वर्णनांची सरळ-साधी कथा बनते. अर्थातच हा दोष नाही. कारण तरुण तुर्काच्या नजरेतून आदल्या पिढीविषयीची पक्की विखारी मते या कादंबरीतील नायिका व्यक्त करीत नाही. ती आजीच्या निकट जाताना आपल्या काळेपणामुळे होणारा आजीचा क्रीडाविरोध समजून घेते. तिला आपले क्रीडाप्रेम पटवून देण्यात यशस्वी होते. भावाशी असलेला तिढा, आई-वडिलांशी तुटलेले नाते यांच्याकडे पुन्हा एकदा नव्या नजरेतून पाहते आणि वाचकांसमोर अनोळखी असलेला तरुण तुर्क आदर्श ठेवते.
‘नंबर नाईन..’ ही थोर कादंबरी अजिबात नाही; मात्र आपल्याकडच्या कादंबरीपिकाशी तुलना करताना ती बऱ्याच अंगांनी उजवी ठरते. आधी लिहिलेल्या बालपुस्तकांचा आणि पत्रकार म्हणून बालसाहित्य पुरवणीच्या संपादनाच्या प्रदीर्घ अनुभवामुळे कविता मंडाना यांची खुसखुशीत, सोपी, वाचकांना गुंतवून ठेवणारी लेखनशैली आवडण्याजोगी आहे. केवळ तरुण तुर्कीच नाही, तर  वाचनअर्की मंडळीही या कादंबरीतून चांगले काही वेचू शकतात, हे नक्की.
‘नंबर नाईन ऑन द शेड कार्ड’
लेखिका : कविता मंडाना
रेड टर्टल/ रुपा , दिल्ली
पृष्ठे : १५३,
किंमत : १९५